मराठी संगीत रंगभूमीचा वारसा निष्ठेने जपणा-या किर्ती शिलेदार यांचा वाढदिवस

By Admin | Updated: August 16, 2016 09:09 IST2016-08-16T09:08:53+5:302016-08-16T09:09:53+5:30

मराठी संगीत रंगभूमीचा वारसा निष्ठेने जपणा-या स्वरसम्राज्ञी तथा अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा आज (१६ ऑगस्ट) वाढदिवस.

Happy Birthday to Marathi Music Theater | मराठी संगीत रंगभूमीचा वारसा निष्ठेने जपणा-या किर्ती शिलेदार यांचा वाढदिवस

मराठी संगीत रंगभूमीचा वारसा निष्ठेने जपणा-या किर्ती शिलेदार यांचा वाढदिवस

>प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १६ - मराठी संगीत रंगभूमीचा वारसा निष्ठेने जपणा-या स्वरसम्राज्ञी तथा अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा  आज (१६ ऑगस्ट) वाढदिवस.
कीर्ती शिलेदार ह्या जयराम, जयमाला शिलेदार यांच्या कन्या. आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले. कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४००० हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार आहेत. रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी स्वर ताल शब्द संगती या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून तीनपात्री सौभद्र सादर करतात.
 
कीर्ती शिलेदार यांची गाजलेली नाटके
‘अभोगी’, ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्र’, ‘द्रौपदी’, ‘भेटता प्रिया’, ‘मंदोदरी’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’, ‘ययाति आणि देवयानी’, ‘रंगात रंगला श्रीरंग’, ‘रामराज्यवियोग’, ‘रूपमती’, ‘विद्याहरण’, ‘शाकुंतल’, ‘शारदा’, ‘श्रीरंग प्रेमभंग’, ‘संशयकल्लोळ’, 
‘सौभद्र’, ‘स्वयंवर’, ‘स्वरसम्राज्ञी’ या नाटकांमध्ये शिलेदार यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत.
 
कीर्ती शिलेदार यांची ध्वनिमुद्रित झालेली नाट्यगीते आणि त्या नाटकांची नावे
अहो इथं मांडिला (संगीत स्वरसम्राज्ञी), एकला नयनाला विषय (संगीत स्वयंवर), एकलीच दीपकळी मी (संगीत स्वरसम्राज्ञी), कशि केलीस माझी दैना (संगीत स्वरसम्राज्ञी), दयाछाया घे निवारुनिया (संगीत एकच प्याला), नरवर कृष्णासमान (संगीत स्वयंवर), नाही मी बोलत (संगीत एकच प्याला), नृपकन्या तव जाया (संगीत स्वयंवर), पांडवा सम्राट पदाला (संगीत द्रौपदी),पावना-वामना-या मना (संगीत सौभद्र), पाही सदा मी (संगीत मानापमान), बलमा आये रंगीले (संगीत स्वरसम्राज्ञी), भक्तांचिया काजासाठी (संत अमृतराय महाराज यांचा अभंग), मम सुखाचि ठेव (संगीत स्वयंवर),येतील कधी यदुवीर, रे तुझ्यावाचून काही (संगीत स्वरसम्राज्ञी), लाजविले वैर्यांना (संगीत द्रौपदी), सखे बाई सांगते मी (रंगात रंगला श्रीरंग), हरीची ऐकताच मुरली (रंगात रंगला श्रीरंग)
 
सौजन्य : इंटरनेट 
 

Web Title: Happy Birthday to Marathi Music Theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.