‘झाला बोभाटा’ ६ जानेवारीला येणार

By Admin | Updated: January 2, 2017 03:12 IST2017-01-02T02:47:42+5:302017-01-02T03:12:46+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर नवीन चित्रपट येत असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

'Haleb Bhobhata' will be on January 6 | ‘झाला बोभाटा’ ६ जानेवारीला येणार

‘झाला बोभाटा’ ६ जानेवारीला येणार

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर नवीन चित्रपट येत असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटांचे नवीन विषयदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. यातील काही चित्रपट ग्रामीण भागांवर आधारित असतात, तर काही सामाजिक परिस्थितीवर. हेच विषय समाजात जनजागृती करण्याचे काम करीत असतात. आता असाच एक आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘झाला बोभाटा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. अनुप जगदाळे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. हा चित्रपट एका गावावर चित्रीत करण्यात आला आहे. या गावाचे नाव ‘मान्याची वाडी’ असे आहे. आता गाव आलं की, बारा भानगडी आल्या आणि त्यात ती मान्याची वाडी असेल तर या भानगडी जरा जास्त असणार. मान्याची वाडी फक्त आदर्श गाव पुरस्कार असला की नटते-सजते. मात्र सोहळा संपला की, या गावाची परिस्थितीदेखील पूर्वपदावर येते. भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळून गेलेले हे गावकरी. या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी गावकरी पुन्हा एकत्र येतात. आता ही नेमकी काय भानगड आहे, हे पाहण्यासाठी तुम्हांला ६ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, कमलेश सावंत, दीपाली आंबिकार, तेजा देवकर, मयूरेश पेम, मोनालिसा बागल, रोहित चव्हाण या कलाकारांचा समावेश आहे. किंग क्रिएशन आणि डीजी टेक्नो इंटरप्राईझेस प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि महेंद्रनाथ यांनी केली आहे. येत्या ६ जानेवारीला हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: 'Haleb Bhobhata' will be on January 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.