कलेचा संपूर्ण अनुभव घेण्यासाठी...
By Admin | Updated: November 13, 2016 03:53 IST2016-11-13T03:53:10+5:302016-11-13T03:53:10+5:30
तिसरी घंटा होते. प्रेक्षागृहात मिट्ट काळोख... शांतता... पडद्याच्या अलीकडे कलाकार. सज्ज... पुन्हा एकदा अनुभव देण्यासाठी आणि पलीकडे प्रेक्षक. श्वास रोखून, एक नवीन अनुभव

कलेचा संपूर्ण अनुभव घेण्यासाठी...
- नेहा जोशी
तिसरी घंटा होते. प्रेक्षागृहात मिट्ट काळोख... शांतता... पडद्याच्या अलीकडे कलाकार. सज्ज... पुन्हा एकदा अनुभव देण्यासाठी आणि पलीकडे प्रेक्षक. श्वास रोखून, एक नवीन अनुभव घेण्यासाठी. संगीत सुरू होते. त्यातच मिसळून एक आवाज येतो. ‘रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत ....’ आणि...
आणि पडदा उघडतो. एक जुना वाडा दिसतो. रात्रीची वेळ. शांततेला भेदून एक म्हातारा टिपेचा आवाज. शांतता. एक बावळट मोठ्ठा आवाज. शांतता. सगळे समजूतदार आवाज शांततेचा आदर राखत. वाड्यात तात्याजी या कर्त्या पुरुषाचे निधन झालेय. धाकटा मुलगा आणि त्याची बायको मुंबईहून आलेत. वडिलांच्या निधनानंतर ५ दिवसांनी. ‘पांघरूण गेलं रे साऱ्याईचं ...’ आईचा आर्त स्वर. शांतता. दु:ख. प्रत्येकाच्या मनात. डोळ्यात. संपूर्ण वाड्यात भरून राहील असे. आता पुढे? असा प्रश्न. रंगमंचावर आणि प्रेक्षागृहात आणि या शांततेचा गळा आवळून तिचा जीव घेत एक कर्कश आवाज. प्रेक्षागृहात. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. न संपणारा. कलाकार स्तब्ध. आवाजाच्या दिशेने काही चच्कार, नाराजीचे उद्गार. ट्रिंग ट्रिंग चालूच. आवाज नेमका कुठून येतोय ते शोधणारे हात. अस्वस्थता. ट्रिंग ट्रिंग. अखेर शांततेचा खून करून तिला प्रेक्षागृहातून बाहेर भिरकावून देऊन स्वत:कडे लक्ष वेधून घेणारी ट्रिंग ट्रिंग टेचात थांबते. वाड्यातल्या तात्याजींच्या मृत्यूपेक्षाही प्रेक्षागृहातल्या शांततेचा खून झाल्याचे दु:ख मनातच दाबून ठेवत पुन्हा नाटक सुरू.
कधी ट्रिंग ट्रिंग नुसती न थांबता, त्या मागून काही आवाज. ‘नाटक बघतोय नंतर कॉल करतो.’ कधी या ट्रिंग ट्रिंग च्या जागी लहान बाळाचं रडणं. बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आई बापाचे आवाज. त्या आवाजाने सगळे अस्वस्थ होईपर्यंत. मग मनावर दगड ठेवून बाळाला रागावत/जोजवत बाहेर घेऊन जाण्याचे आवाज. कधी दाण्याच्या पुड्यांचे, वेफर्सच्या पाकिटाचे, डबे उघडण्याचे आवाज. कधी कलाकार काहीही प्रतिक्रिया न देता स्तब्ध उभे. कधी विनंती करत, कधी चिडत, कधी उपरोधक बोलत, हे आवाज थांबवण्याचा प्रयत्न करणारे.
जसं देवळात येताना चपला बाहेर काढणं, तसं रंगमंदिरात येताना हे सगळे आवाज बाहेरून येतानाच बंद करणं. इतकं सोपं आहे खरं तर. त्या जागेचं पावित्र्य, त्याचं महत्त्व, त्याबद्दलचा आदर, प्रेम, आपुलकी. मुळात रंगमंचावर काम करणारा कलाकार एक जिवंत व्यक्ती असतो. हाडामांसाचा. सिनेमा, टीव्हीसारखा केवळ खऱ्याचा आभास निर्माण करणारा नसतो. त्यामुळे आजूबाजूला चालणाऱ्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावर होत असतो. जसं प्रेक्षकांची दाद, टाळ्या, हशा यांचा सकारात्मक परिणाम होऊन अधिकाधिक चांगला अनुभव देण्यासाठी ऊर्जा मिळते. तसं या अनाठायी आवाजांमुळे त्याची एकाग्रता नष्ट होते. अशा अडथळ्यांमुळे कदाचित कलाकृतीचा संपूर्ण अनुभव तो देऊ शकत नाही. मग नकळतपणे त्या कलेचा आणि कलाकृतीचा अपमान होतो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, अशा कृतींमुळे प्रेक्षक स्वत:चाच अपमान करत असतो. अप्रत्यक्षरीत्या. तो सुट्टीच्या दिवशी आराम न करता किंवा बाहेर फिरायला ना जाता, कधी तर खास वेळ काढून नाटकाला जायचं ठरवतो. कधी आवडत्या नट/नटीचं, लेखकाचं, दिग्दर्शकाचं नाटक कधी कुठे आहे, यावर लक्ष ठेवून बेत आखतो. तर कधी आज नाटक बघायचं, म्हणून वर्तमानपत्र उघडून त्यात वेगवेगळ्या नाटकाच्या जाहिरातींमधून एक नाटक निवडतो. जाऊन तिकीट काढतो. तिकिटांचे दर आज २०० पासून ५०० रुपयांपर्यंत असतात. एका घरातले दोघे म्हटले, तरी तिकिटाचे साधारण ६००-७०० रुपये, येण्या-जाण्याचे आणि मध्यंतरातल्या चहा आणि वडा-पावचे असे मिळून किमान १००० रुपयांतर्यंत खर्च होतोच. स्वत:चे कष्टाचे पैसे खर्च करून तो नाटक बघतो. मुख्य म्हणजे, स्वत:हून आयुष्यातले २-३ तास एका अंधाऱ्या जागेत स्वत:ला नेऊन पुढे घडणाऱ्या घटनेचा साक्षीदार होण्याचा, अनुभव घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी प्रेक्षकांचा असतो. स्वत:च्या आनंदासाठी, समाधानासाठी.
मग जेव्हा अशा मनोरंजनामध्ये अडथळा आणणाऱ्या घटना घडतात, तेव्हा प्रेक्षकांकडून स्वत:च स्वत:चा अपमान, अनादर होतो असं नाही का वाटत? स्वत:चा वेळ, पैसा आणि स्वत:च्या भावनांचाही. लहान मुले रडतात, खेळतात यामध्ये त्यांना दोषी कसं धरायचं? त्यांनी का बघावं असं काही जे त्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडचं आहे? काही प्रेक्षागृहात यासाठीही तरतूद केलेली आहे. अशी छोटी खोली जिथून नाटक दिसतं, ऐकू येतं, पण खोलीतला आवाज बाहेर येत नाही. तिथे मुलाला घेऊन जाण्यात कसला कमीपणा? त्या लेकरांची योग्य सोय करून नाटकाला येणं खरंच इतकं अवघड असतं का?
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग वाजाणारा फोन बंदच ठेवला किंवा सायलेंट मोडवर टाकला, तर काही भारताची अर्थव्यवस्था कोलमडून पडणार आहे का? अगदी महत्त्वाचे काही काम असेल, तर फोन आल्यानंतर चटकन बाहेर जाऊन बोलून मग आत आलो, तर इतर प्रेक्षकांचा आणि कालाकारचाही रसभंग होणे टळेल. दोन प्रवेशांमध्ये जो अंधार होतो, तो काही तांत्रिक बाबींसाठी असतो. उदा. नेपथ्य बदल, कपडे बदलणे इ. दुसरा हेतू असा की, प्रेक्षकांना विचार करायला थोडा वेळ मिळावा. अशा वेळी अनेक फोन सुरू होतात आणि मग इतका प्रकाश होतो की, अंधार करण्याचा हेतूच सफल होत नाही.
खरंच २-३ तास फोन बंद असला, तर आपल्याला इतके अस्वस्थ, असुरक्षित का वाटते? एका वेळी एका ठिकाणी आपण का असू शकत नाही? इथे, तिथे, तिथे असे चार ठिकाणी का असायचे असते आपल्याला?
मी कलाकार आहे आणि प्रेक्षकही. दोन्ही भूमिकांमध्ये मला या अडथळ्यांमुळे खूप त्रास होतो. मन दुखावले जाते.
हे अडथळे आलेच नाहीत, तर एका कलाकृतीचा संपूर्ण अनुभव घेता येईल, आपल्या सगळ्यांनाच. बघा विचार करा.
(लेखिका प्रसिद्ध अभिनेत्री आहे.)