गणपत पाटील यांचा जीवनपट कॅमेऱ्यात बंद
By Admin | Updated: October 12, 2015 04:45 IST2015-10-12T04:45:21+5:302015-10-12T04:45:21+5:30
अभिनेता अतुल कुलकर्णी याने ‘नटरंग’मध्ये साकारलेला ‘नाच्या’ रसिकांची दाद देऊन गेला... आयुष्यात नाच्याला भोगाव्या लागलेल्या यातना... दु:ख पडद्यावर पाहताना अनेकांचे हृदय हेलावून गेले.

गणपत पाटील यांचा जीवनपट कॅमेऱ्यात बंद
अभिनेता अतुल कुलकर्णी याने ‘नटरंग’मध्ये साकारलेला ‘नाच्या’ रसिकांची दाद देऊन गेला... आयुष्यात नाच्याला भोगाव्या लागलेल्या यातना... दु:ख पडद्यावर पाहताना अनेकांचे हृदय हेलावून गेले... पण असाच एक चेहरा मराठी चित्रपटांमध्ये अनेक दशके अधिराज्य करीत होता, ज्याने ‘नाच्या’ साकारूनच सर्वांचे मनोरंजन केले... विशिष्ट देहबोली, आवाज, टाळ्या वाजविण्याची पद्धत यामुळे ही भूमिका पडद्यावर अजरामर झाली... ते नाव होते ‘गणपत पाटील’ यांचे. ‘नाच्या’ हीच त्यांची ओळख बनली. अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी ६२ चित्रपट आणि १७ नाटके केली. ‘ऐका हो ऐका’, ‘जाळीमंदी पिकली करवंदं’, व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ यामधील त्यांच्या भूमिका गाजल्या. भालजी पेंढारकर यांच्या ‘सख्या सजणा’मध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली होती. गणपत पाटील यांना डोळ्यांसमोर ठेवून ही भूमिका लिहिण्यात आली होती. त्यांच्या जीवनपटावर दिग्दर्शक सुनील वाईकर आता चित्रपट काढणार आहेत. लवकरच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘दगडाबाईची चाळ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आजची पिढी गणपत पाटील यांना ओळखत नाही, ते कोण होते, त्यांचे चित्रपटसृष्टीमध्ये कसे योगदान होते याची माहिती त्यांना व्हावी आणि त्यांचा लहानपणापासून ते शेवटपर्यंतचा प्रवास रसिकांसमोर यावा हाच या चित्रपटनिर्मितीमागील उद्देश आहे.
परिस्थितीमुळे नाच्याची भूमिका त्यांना करावी लागली आणि लोकांनी ती स्वीकारली. त्यानंतर नशिबी आलेले जगणे या गोष्टींवरही चित्रपटामध्ये प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. आम्ही पाच मित्रांनी निर्मित केलेल्या ‘आॅरेंज फ्रेंड्स’च्या माध्यमातून चित्रपट काढण्यात येणार आहे. अजून गणपत पाटील यांची भूमिका कोण करणार हे ठरलेले नाही. पण यासाठी सेलिब्रिटीपेक्षा नवीन चेहरा पाहणार आहोत. डिसेंबरपासून चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेस सुरुवात होणार असल्याचे वाईकर सांगतात.