कलाकारास इंडस्ट्रीपेक्षा व्यासपीठ महत्त्वाचे
By Admin | Updated: April 8, 2017 03:11 IST2017-04-08T03:11:16+5:302017-04-08T03:11:16+5:30
कुठलाही कलाकार त्याच्यातील अभिनय क्षमता दाखविण्यासाठी व्यासपीठाचा शोध घेत असतो.

कलाकारास इंडस्ट्रीपेक्षा व्यासपीठ महत्त्वाचे
कुठलाही कलाकार त्याच्यातील अभिनय क्षमता दाखविण्यासाठी व्यासपीठाचा शोध घेत असतो. त्यातच तुमच्यात मेहनत आणि जिद्द असेल तर तुम्हाला हे व्यासपीठ उपलब्धही होते. त्यासाठी भाषेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागतो. असाच काहीसा प्रवास मराठमोळी अभिनेत्री नम्रता गायकवाड हिने केला आहे. मराठीत नाटक, चित्रपट केल्यानंतर तिने थेट मल्याळम इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तिच्या आगामी मल्याळम चित्रपटानिमित्त तिच्याशी साधलेला संवाद...
मल्याळम चित्रपटाच्या प्रवासाविषयी काय सांगशील?
- खरं तर मी कधी विचारच केला नव्हता की मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल. फेसबुकवर मी बरेच फोटो अपलोड करीत असते, फेसबुकवरून माझे फोटो बघून मला फोन आला, एक तर या भाषेविषयी मला कसलाच गंध नव्हता, सर्वसामान्य व्यक्तीला जितकी माहिती असते तितकीच माहिती मला या भाषेविषयी होती. त्यामुळे मी त्यांना अगोदरच सांगितले होते, की मला या भाषेविषयी माहिती नाही. खरंतर या आधीसुद्धा दाक्षिणात्य चित्रपटांसाठी असे फोन कॉल्स मला आले होते, पण मी बऱ्याचदा नकार देत गेले. त्याचे कारण असे की, फोटो बघून कोणी कोणाला अभिनयाची संधी देत असतो का? पण या चित्रपटाविषयी सांगायचं झाल्यास सगळ्या गोष्टी जुळून येत गेल्या.
मराठी आणि मल्याळम चित्रपटात काम करताना कामाच्या पद्धतीत काय फरक जाणवला?
तांत्रिकदृष्ट्या मल्याळम चित्रपट इंडस्ट्री अधिक मजबूत असल्याचे जाणवले. आपल्याकडे कॅमेरा वापरण्याची पद्धत आणि तिकडची पद्धत वेगळी आहे. खूप पद्धतशीरपणे काम केले जाते, ज्यावेळेला शूटिंग सुरू होणार असेल त्याचवेळेस सुरू होते अनपॅकअपही वेळेनुसारच केले जाते. कलाकार पूर्ण दिवस आपल्याबरोबर आहे, म्हणून वेळ असेल तर दुसरा एखादा सीन किंवा मोन्टाज करणे हा प्रकार इथे मला दिसला नाही. ज्या दिवशी माझा एकच सीन असायचा तितकाच व्हायचा. शूटिंग चालू असताना काम एकदम शांततेत चालायचं, कुठे आरडाओरडा नाही की अपशब्दांचा मारा नाही. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित व्हायचं.
अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?
पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर एका नाटकाची आॅफर आली होती, नाटकाचे दिग्दर्शक अशोक समेळ हे माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते. खरंतर आईने फोर्स केला, बाबांनी पण होकार दर्शविला आणि ‘ज्ञानोबा माझा’ या व्यावसायिक नाटकातून मी अभिनयास सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्र, गोवा या ठिकाणांहून नाटकांचे दौरे झाले. नाटक करीत असताना अभिनयात परिपक्वता येत गेली. त्याचबरोबर आत्मविश्वास निर्माण झाला. मग, इतर ठिकाणी आॅडिशन देण्यास सुरुवात केली. पुढे मला ‘मंगळसूत्र’ ही मालिका मिळाली. अभिनेत्री अलका कुबल यांनी त्या मालिकेसाठी माझी निवड केली होती. पुढे मी ‘स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे’, ‘वंशवेल’ या चित्रपटांमध्ये काम केले.
पहिलं प्रेम कोणतं? अभिनय की भरतनाट्यम?
अर्थातच पहिलं प्रेम अभिनय आहे. कारण भरतनाट्यम मी लहानपणी आठवीत असताना शिकले. त्याचा मला आता फायदाच होत आहे. अभिनय आणि नृत्य ही एकमेकांची पूरक बाजू आहे. कारण अभिनय करताना नृत्य कौशल्य असेल तर त्याचा फायदाच होतो. वास्तविक मी अभिनय क्षेत्रात येईल, याचा विचार केला नव्हता. परंतु मागे वळून बघितल्यास शालेय जीवनापासून अभिनयाची वाटचाल सुरू झाल्याचे आज जाणवते. भरतनाट्यम शिकले नसते तर कदाचित कलेविषयीची आवड निर्माण झाली नसती.