फाइंडिंग फेनी - सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडील
By Admin | Updated: September 13, 2014 10:18 IST2014-09-13T10:15:24+5:302014-09-13T10:18:28+5:30
गोव्याची पार्श्वभूमी घेऊन दिग्दर्शक होमी अडजानियाने ‘फाइंडिंग फेनी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पण हा चित्रपट पाहत असताना तो सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आकलनापलीकडचा चित्रपट असल्याचे लक्षात येते.

फाइंडिंग फेनी - सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडील
>गोव्याची पार्श्वभूमी घेऊन दिग्दर्शक होमी अडजानियाने ‘फाइंडिंग फेनी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पण हा चित्रपट पाहत असताना तो सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आकलनापलीकडचा चित्रपट असल्याचे लक्षात येते. अत्यंत प्रगल्भ विचारशक्तीच्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटातील कलाकारांची नावे बघून तो बघण्याची उत्सुकता असलेले प्रेक्षक नक्कीच निराश होतील.
गोव्यातील पोकोलीम या छोट्या गावातील पोस्ट ऑफिसात फ्रेडी (नसीरूद्दीन) काम करीत असतो. फ्रेडीने त्याच्या प्रेयसीला तरुणपणी पत्र पाठवलेले असते. त्यात त्याने तिला मागणी घातलेली असते. पण ते पत्र उत्तराशिवाय तसेच परत येते. हेच पत्र फ्रेडीला पुन्हा ४२ वर्षांनी सापडते. या पत्राने त्याला प्रेयसीची पुन्हा आठवण यायला लागते. फ्रेडीच्या शेजारी राहणारी एंजी (दीपिका पादुकोण) त्याची बेस्ट फ्रेंड असते. एंजी आपली आई रोजीसोबत (डिंपल कपाडिया) राहत असते. एंजीचे लग्न खूप वर्षांपूर्वी झालेले असते; पण लग्नाच्या पहिल्याच रात्री तिचा नवरा मरतो. तिच्यावर खूप आधीपासून प्रेम करणारा सैवियो (अर्जुन कपूर) परत गावात येऊन कार मॅकेनिक म्हणून काम करीत असतो. एंजीच्या घराजवळ पेड्रो (पंकज कपूर) हा चित्रकार राहायला येतो. त्याला रोजी आवडू लागते. रोजीचे चित्र काढण्याची इच्छाही तो व्यक्त करतो. दरम्यान, फ्रेडीला त्याच्या मैत्रिणीला भेटण्याची इच्छा असल्याचेही एंजीला कळते. मग त्याची दुरावलेली मैत्रीण त्याला मिळवून द्यायचीच या इच्छेने एंजी, सैवियो, पेड्रो आणि रोजी एका शोधमोहिमेवर जातात. त्या मोहिमेत घडणार्या घटना आणि परिणामांना स्पर्श करीत चित्रपटाचा शेवट होतो.
उणिवा - या चित्रपटाचा दिग्दर्शक होमी अडजानिया आपल्याकडे अत्यंत प्रगल्भ विचारशक्ती असल्याचे मानतो. त्याच्या दृष्टीने चित्रपट पाहणार्या प्रेक्षकांना काही न सांगताच सगळे लवकर कळते असा त्याचा समज झाल्याचे चित्रपटावरून दिसून येते. म्हणूनच ते खूप समजूतदार आणि प्रगल्भ असल्याचा पूर्वग्रह त्याने केला असावा. दिग्दर्शकाच्या झालेल्या या गोंधळाने प्रेक्षकांचा मात्र पुरता भ्रमनिरास होतो. चित्रपटात मोठे आणि चांगले कलाकार असूनही सामान्य प्रेक्षकांना आवडेल असा चित्रपट बनवण्यात होमीला अपयश आले आहे. होमीकडे एक मनोरंजक कथा होती. त्यावर चांगली पटकथा तयार करून एक वेगळा मनोरंजक चित्रपट बनू शकला असता. पण होमी आणि त्याच्या टीमने यासाठी कोणतेही प्रयत्न केलेच नाहीत. त्यामुळे चित्रपटात काय चालले आहे ते कळतच नाही. चांगले कलाकार असूनही जर हा चित्रपट मनोरंजन करण्यात अत्यंत कमी पडत असेल तर त्यासाठी दिग्दर्शक संपूर्णपणे जबाबदार आहे. मूळ इंग्रजी भाषेत बनलेल्या चित्रपटाचे हिंदीतही डबिंग केले. तेही अत्यंत वाईट आहे. यावरून चित्रपटाचे दिग्दर्शन किती सुमार आहे त्याचा अंदाज येऊ शकतो.
वैशिष्ट्ये - नसीरूद्दीन शाह, पंकज कपूर, डिंपल कपाडिया अशा दिग्गज कलाकारांबरोबरच नव्या दमाचे दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर हे कलाकार चित्रपटाचे मोठे आकर्षण आहे. त्यांना एकत्र काम करताना बघणे हा सुखद अनुभव आहे. नसीर आणि पंकजने सुंदर काम केले आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतले हे कलाकार उत्कृष्ट का आहेत याची जाणीव यानिमित्ताने होते. तर डिंपल कपाडियानेही आपल्या ग्लॅमरस लुक्सने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. कमी मेकअपमधील दीपिकाचा सहजसुंदर अभिनय आणि अर्जुन कपूरचाही चांगला अभिनय प्रभाव पाडतो. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट चांगला आहे.