लोकवर्गणीतून चित्रपट!

By Admin | Updated: January 24, 2016 01:57 IST2016-01-24T01:57:16+5:302016-01-24T01:57:16+5:30

लोकवर्गणीतून निवडणुका लढल्या जातात़, विकासकामे होतात हे अनेकदा पाहिलेलं आहे़, पण आता लोकवर्गणीतून चित्रपटही बनणार आहेत़ ‘क्राउड फंडिंग’चा नवा फंडा मराठी फिल्म इंडस्ट्रीत

Films from the public! | लोकवर्गणीतून चित्रपट!

लोकवर्गणीतून चित्रपट!

लोकवर्गणीतून निवडणुका लढल्या जातात़, विकासकामे होतात हे अनेकदा पाहिलेलं आहे़, पण आता लोकवर्गणीतून चित्रपटही बनणार आहेत़ ‘क्राउड फंडिंग’चा नवा फंडा मराठी फिल्म इंडस्ट्रीत येऊ घातला आहे़
एखादा चित्रपट... ही मोठ्ठी कलाकृती प्रत्यक्षात साकारायची असेल, तर मात्र पैसे, नाती, मेहनत, माणसं या सर्वांचाच मोलाचा सहभाग असणे गरजेचे असते. कारण चित्रपटाचा विषय चांगला असला की, कलाकार स्वत:हून काम करायला तयार असतात, पण बऱ्याचदा होत असं की, चित्रपट करायचा तर असतो, पण ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळाची गरज असते आणि ते प्रत्येकाकडे असतेच असे नाही. मग त्यासाठी कधी स्वत:ची शेतजमीन विकून पैसे उभा करणारा भाऊराव कऱ्हाडे आपल्यासमोर येतो, तर कधी आर्थिक साह्य नाही म्हणून ‘अस्तु’ चित्रपट केवळ एकाच शहरात प्रदर्शित करावा लागतो, पण आता यावर उपाय काय? या आजवरच्या सर्वच दिग्दर्शक, लेखकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर जवळपास सापडल्यात जमा आहे, असेच म्हणावे लागेल. कारण ‘अस्तु’ या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना ‘क्राउड फंडिंग’ हा मराठी चित्रपट निर्मितीसाठीचा उपलब्ध झालेला उत्तम पर्याय लवकरच एका ट्रेंडमध्ये रूपांतरित व्हायला वेळ लागणार नाही.
क्राउड फंडिंग म्हणजे काय तर लोकवर्गणी. आजवर लोकवर्गणी ही ग्रामीण भागातील प्रकल्पांसाठी ऐकिवात होती. वर्गणी गोळा करून त्यातून पाटबंधारे वगैरे बांधले जायचे, पण हीच संकल्पना ‘क्राउड फंडिंग’ या नावातून चित्रपटसृष्टीत चित्रपट निर्मितीसाठीही तितकीच फायदेशीर ठरणारी आहे. यामध्ये सोशल मीडिया सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी आपल्या डोक्यातील संकल्पना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सर्वप्रथम फेसबुक पेजवर त्याचे व्हिज्युअल क्लिपिंग अपलोड करावे लागते. त्यानंतर लोकांना ती कल्पना आवडली, तर मदत करण्याचे आवाहन केले जाते. यामध्ये पैसे देणाऱ्या व्यक्तीला कॅटेगरीनुसार चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगबरोबर प्रीमिअरला आमंत्रित करून किंवा भेटीच्या स्वरूपात त्याची परतफेड करण्यात येते. अशा प्रकारच्या फंडिंगसाठी मदत करणाऱ्या अनेक वेबसाइटसुद्धा कार्यरत आहेत.
क्राउड फंडिंग या संकल्पनेच्या मदतीने देशभरात २०१२ पासून कलाकृती करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे आणि ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर यशस्वीदेखील झाली आहे. श्याम बेनेगल यांनी ‘मंथन’ चित्रपट क्राउड फंडिंगच्या माध्यमातूनच साकारला होता. त्यावेळी पन्नास हजार शेतकऱ्यांकडून फक्त दोन रुपयांची मदत घेण्यात आली होती. लवकरच क्राउड फंडिंगच्या माध्यमातून ‘पुण्यकोटी’ हा देशातील पहिलाच संस्कृत भाषेमधील अ‍ॅनिमेशनपट तयार करण्यात आला होता. मात्र, मराठीमध्ये ‘अस्तु’ चित्रपटाच्या निमित्ताने या संकल्पनेची ओळख होत असल्याने त्याच्याबद्दल बरीच उत्सुकता आहे. मराठी चित्रपटांचा बाज हा थोडा ग्रामीण स्वरूपाचा किंवा सामाजिक बांधिलकीचा असल्याने आर्थिक पाठबळाची सर्वाधिक गरज असते, पण आता या संकल्पनेमुळे लोकांनी लोकांसाठी केलेला चित्रपट ही एक वेगळीच कल्पना मराठी इंडस्ट्री कितपत आणि कशा प्रकारे स्वीकारते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

- मृण्मयी मराठे

Web Title: Films from the public!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.