दुबळे कथानक, पण कसदार अभिनय
By Admin | Updated: August 15, 2015 00:11 IST2015-08-15T00:11:10+5:302015-08-15T00:11:10+5:30
अक्षयकुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकी श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडिस यांची भूमिका असलेला ‘ब्रदर्स’ हा चित्रपट हॉलीवूडच्या ‘वॉरियर’चा रिमेक असून करण जोहर आणि हिरू यश जोहर निर्मित

दुबळे कथानक, पण कसदार अभिनय
ब्रदर्स (हिंदी चित्रपट)
- अनुज अलंकार
अक्षयकुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकी श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडिस यांची भूमिका असलेला ‘ब्रदर्स’ हा चित्रपट हॉलीवूडच्या ‘वॉरियर’चा रिमेक असून करण जोहर आणि हिरू यश जोहर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत करण मल्होत्रा. सुमार कथानक असतानाही कलाकरांनी जीव ओतून काम केले, असले तरीही हा चित्रपट फारसा रसिकांच्या पचनी पडलेला नाही.
मुंबईतील एका ख्रिश्चन कुटुंब या चित्रपटाच्या कथेचा आधार आहे. यात गॅरी (जॅकी श्रॉफ) चोवीस तास दारूच्या नशेत असतो. पत्नी (शेफाली छाया) आणि मुलगा डेव्हीडची त्याला पर्वा नसते. एके दिवशी गॅरी सोबत मॉन्टी नावाच्या एका मुलाला घरी आणतो. आपल्या दुसऱ्या पत्नीपासून झालेला हा आपला मुलगा असल्याचे तो सांगतो. मॉन्टीची आई आता या जगात नसल्याचे ऐकून गॅरीची पत्नी गहिवरत मॉन्टीचा स्वीकार करते. एके
दिवशी गॅरी दारूच्या नशेत पत्नीला जबर मारहाण करतो. यात तिचा मृत्यू होतो आणि गॅरीची तुरुंगात रवानगी होते.
गॅरीचा मोठा मुलगा डेव्हीड (अक्षयकुमार), वडील आणि सावत्र भावाशी (मॉन्टी) संबंध तोडून स्वतंत्रपणे राहू लागतो. डेव्हीड पत्नी (जॅकलीन फर्नांडिस) आणि मुलीसोबत आनंदी असतो, परंतु त्याच्या मुलीला किडनीचा आजार असतो. त्यामुळे डेव्हीड दु:खी असतो. मुलीवर उपचार करण्यासाठी पैसा कमावण्यासाठी तो खूप प्रयत्न करतो. अशात गॅरीची तुरुंगवासातून सुटका होते आणि तो मॉन्टीसोबत राहतो. एवढा काळ उलटल्यानंतरही डेव्हीड वडील आणि मॉन्टीवर नाराज असतो. मॉन्टीला स्ट्रीट फाइटचे वेड असतो. मुंबईत पहिल्यांदाच राइट टू फाइट या नावाने एक स्पर्धा होते. यात देश-विदेशातील स्पर्धक सहभागी होतात. मॉन्टीही या स्पर्धेत सहभागी होण्यात यशस्वी होतो़ तर मुलीच्या उपचारासाठी पैशाची गरज असलेला डेव्हीडही या स्पर्धेत उतरतो. प्राथमिक फेऱ्या पार करून दोन्ही भाऊ अंतिम फेरीत एकमेकासमोर उभे ठाकतात.
उणिवा : वॉरियरचा रिमेक करताना करण मल्होत्रा आणि त्यांच्या टीमने पटकथेवर फारशी मेहनत न घेतल्याने सुरुवात अत्यंत धीम्या गतीने होते. पात्रांंचा एकमेकांशी ताळमेळ लागत नाही. पिता-पुत्र, पती-पत्नी, भाऊ-भाऊ यांच्यातील द्वंद दर्शकांना खिळवून ठेवीत नाही. शीर्षक ब्रदर्स असले तरी दोन्ही भावांतील अपेक्षित संघर्ष नजरेत भरत नाही. मध्यंतरानंतर कथानकाला गती जरूर मिळाली; परंतु अखेरपर्यंत न टिकल्याने निराशा पदरी पडते. करण मल्होत्राला एकाही पात्राला न्याय देता आलेला नाही. करिना कपूरवर ‘मेरी हैं की तेरी हैं...’ हे आयटम साँग चित्रित करण्यात आले असले, तरी तिला प्रेक्षकांवर म्हणावी तेवढी छाप पाडता आलेली नाही. मुळात नृत्य दिग्दर्शनात दमच नाही.
वैशिष्ट्ये : सुमार पटकथा असतानाही प्रमुख कलाकारांनी आपल्या लौकिकाला शोभेल असेच दमदार काम केले आहे. उत्तरार्धात दोन्ही भावांत झालेली लढत पाहून प्रेक्षकही खिळून राहतात.
का पाहावा...
जॅकी श्रॉफ, अक्षयकुमार, सिद्धार्थ यांचा दमदार अभिनय आणि फाइट दृश्यासाठी
का पाहू नये...
कमकुवत आणि भरकटलेल्या कथानकाकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. एकूणच चांगला अभियन असतानाही हा चित्रपट निराश करतो.