प्रयोगशील आर. बाल्की
By Admin | Updated: April 2, 2016 02:25 IST2016-04-02T02:25:22+5:302016-04-02T02:25:22+5:30
“I don't believe borrowing things from real life. I think films should also add something to life," हे शब्द आहेत दिग्दर्शक आर. बालकृष्णन अर्थात आर. बाल्की यांचे.

प्रयोगशील आर. बाल्की
- ‘कि अॅण्ड का’च्या निमित्ताने पुन्हा एक धाडसी विषय पडद्यावर
“I don't believe borrowing things from real life. I think films should also add something to life,"
हे शब्द आहेत दिग्दर्शक आर. बालकृष्णन अर्थात आर. बाल्की यांचे. खऱ्या आयुष्यातून उसणे अनुभव चित्रपटात मांडणे मला पटत नाही. त्यापेक्षा चित्रपटातून आयुष्यासाठी काही तरी देणे, हा माझा प्रयत्न असतो. प्रत्येक चित्रपट मानवी आयुष्यात भर घालणारा असावा, असे माझे मत आहे, असे बाल्की यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांच्या या विचारावरून आर. बाल्की नावाचा हा दिग्दर्शक एक वेगळेच रसायन आहे, हे लक्षात येते. ‘कि अॅण्ड का’ हा आर. बाल्की यांचा सिनेमा काल प्रदर्शित झाला. वेगळ्या धाटणीचा आणि वेगळ्या प्रकृतीचा हा चित्रपट बाल्की यांच्या सर्जनशीलतेचा आणखी एक नमुना आहे. ‘कि अॅण्ड का’च्या निमित्ताने बाल्कींच्या बॉलीवूड प्रवासाचा हा संक्षिप्त आढावा....
‘कि अॅण्ड का’
आर. बाल्की यांचा हा नवा प्रयोग भन्नाट गाजतोय. याला दोन कारणे आहेत. एक तर नायक-नायिका म्हणून त्यांनी अर्जुन-करीनाची अतिशय विसंगत जोडी निवडली आहे आणि दुसरे कारण म्हणजे भारतातील पुरुषप्रधान समाजाला कधीही पचनी न पडलेल्या विषयावर त्यांनी हा चित्रपट बनविण्याचे धाडस केले आहे. ‘कि अॅण्ड का’मध्ये करीना अतिशय बोल्ड आणि फ्यूचर अॅम्बिशियस आहे तर अर्जुन हा तिच्यासाठी तिचा नवरा न बनता बायको बनण्यास जास्त उत्सुक असल्याचे व स्वयंपाकापासून कपडे धुण्यापर्यंत सर्व कामे करीत असल्याचे दाखवले आहे. या चित्रपटाची कथा फारच वेगळी आहे आणि आर. बाल्कीच्या परिसस्पर्शाने त्या कथेचे सोने झाले आहे.
‘मुद्रा’ने दाखवली यशाची वाट
फिल्म मेकिंगचा किडा बाल्की यांच्या डोक्यात वळवळत होताच. त्यामुळेच कॉलेजनंतर मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दिग्दर्शनाचा कोर्स करण्याचे त्यांनी ठरवले. पण त्यांची मुलाखत घेणारे पॅनल न आवडल्याने बाल्कींनी स्वत:च ‘वॉक आऊट’ करीत, या इन्स्टिट्यूटला बाय बाय केले. यानंतर त्यांनी काय करावे तर चक्क कॉम्प्युटर अॅप्लिकेशन कोर्समध्ये प्रवेश घेतला. पण तिसऱ्या वर्षाला कमी हजेरीमुळे त्यांना या कोर्समधून बाहेर फेकण्यात आले. याच काळात क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टींनी बाल्कींना अक्षरश: झपाटले होते. पण एकेदिवशी पेपरमध्ये ‘मुद्रा’ या जाहिरात एजन्सीची जाहिरात बघितली आणि बाल्कींना नवी वाट गवसली. ‘दाग अच्छे है’ (सर्फ एक्सेल), ‘जागो रे’ (टाटा टी), ‘वॉक व्हेन यू टॉक’ (आयडिया सेल्युलर) अशा अनेक जाहिरातींच्या कल्पना बाल्की यांच्या डोक्यातून आल्या. २००७ मध्ये बाल्कींनी स्वत:च ‘चीनी कम’ची कथा लिहिली, ते डायरेक्शनमध्ये उतरले आणि बॉलीवूडला ‘पा’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘शमिताभ’ आणि आता ‘कि अॅण्ड का’सारख्या अप्रतिम चित्रकृती मिळाल्या.
‘चीनी कम’
लंडनच्या रिमझिमत्या पावसात चित्रित करण्यात आलेला हा चित्रपट समीक्षकांना प्रचंड आवडला. याचे श्रेय निश्चितच आर. बाल्कीला आहे. ‘चीनी कम’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ६४ वर्षांचा पुरुष ३४ वर्षीय महिलेच्या प्रेमात पडतो आणि त्याचे जगच बदलते... या कथानकात बाल्कींनी अमिताभ आणि तब्बू ही जोडी फिट बसवली आणि एका वेगळ्या प्रकृतीचा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळाला.
‘पा’
ही तर आर. बाल्कींची अजरामर चित्रकृती ठरावी असा सिनेमा आहे. प्रोजेरिया या दुर्मीळ आजाराने ग्रासलेल्या एका रुग्णाची कथा बाल्की यांनी ‘पा’मध्ये दाखवली. साठी ओलांडलेल्या अमिताभ यांच्याकडून बाल्की यांनी १२ वर्षांच्या ‘ओरो’ नामक बालकाची भूमिका अतिशय प्रभावी पद्धतीने वठवून घेतली. या चित्रपटाने कुठल्याही परिस्थितीत आनंदाने जगण्याचा मूलमंत्र प्रेक्षकांना दिला.
‘इंग्लिश विंग्लिश’
‘इंग्लिश विंग्लिश’च्या निमित्ताने बाल्की यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. हा चित्रपट बाल्की यांच्या पत्नी गौरी शिंदे यांनी दिग्दर्शित केला. गौरीही नवऱ्यासारखीच गुणी आहे. या चित्रपटाचा विषयही विचार करायला भाग पाडणारा होता. हाऊस वाइफकडे बघण्याचा अनेक नवऱ्यांचा दृष्टिकोन फारच संकुचित असतो. हिला काहीच कळत नाही, अशी त्यांची पक्की धारणा झालेली असते. याच धारणेला तडा देण्याचे काम या चित्रपटाने केले.
- Feature -