अपघातानंतरही 'कंगनाने' सुरू ठेवले चित्रपटाचे शूटिंग
By Admin | Updated: October 15, 2016 16:26 IST2016-10-15T14:52:25+5:302016-10-15T16:26:06+5:30
अमेरिकेत हंसल मेहतांच्या 'सिमरन' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या अभिनेत्री कंगना राणौतच्या गाडीला अपघात झाला.

अपघातानंतरही 'कंगनाने' सुरू ठेवले चित्रपटाचे शूटिंग
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १५ - बॉलिवूडमधील 'क्वीन' अर्थातच अभिनेत्री कंगना राणौतच्या गाडीला अमेरिकेत अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातातून कंगना व तिचे सहकारी सुखरुपरित्या बचावले आणि कंगनानेही कोणतेही कारण न घेता चित्रपटाचे शूटिंग चालूच ठेवले.
कंगना गेल्या आठवडयाभरापासून अमेरिकेत हंसला मेहता यांच्या ‘सिमरन’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. १२ ऑक्टोबर रोजी कंगना व तिचे सहकारी शूटिंग संपवून अटलांटा येथील हॉटेलकडे परत जात होते, तेव्हाच्या त्यांच्या गाडीला अपघात झाला. स्थानिक ड्रायव्हर त्यांची गाडी चालवत होता, मात्र त्याचवेळी त्याला अचानक खोकला आल्याने त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी पसरली. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्या लगतच्या तारेच्या कुंपणावर जाऊन धडकली. चालकाच्या बाजूला बसलेल्या सुरक्षा रक्षकाने गाडीचा तोल जाऊ न देण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसे यश आले नाही. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर झालेले नसले तरी कंगनाचा हात व डोक्याला किरकोळ दुखापत झाली. नजीकच्या रुग्णालयात उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला.
या अपघातानंतर दिग्दर्शक हंसल मेहता यांनी कंगनाला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला मात्र पण कंगनाने अपघाताचा परिणाम सिनेमाच्या शूटिंगवर होऊ न देता, शूटिंग तसेच सुरु ठेवले.
दरम्यान कंगनाच्या ' क्वीन' या बहुचर्चित चित्रपटाचा सीक्वेल लवकरच येणार असल्याची चर्चा सुरू आहे. २०१४ साली आलेल्या या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी कंगनाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.