‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ची मोठ्या पडद्यावर एन्ट्री
By Admin | Updated: August 21, 2015 23:12 IST2015-08-21T23:12:53+5:302015-08-21T23:12:53+5:30
ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांच्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. विशेषत: यातल्या ‘ह, हा, हि, ही’च्या बाराखडीने

‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ची मोठ्या पडद्यावर एन्ट्री
ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांच्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. विशेषत: यातल्या ‘ह, हा, हि, ही’च्या बाराखडीने रंगभूमीवर सतत हास्याचा धबधबा कोसळत राहिला. त्यांच्या याच नाटकाचे आता माध्यमांतर होत असून, हे नाटक थेट मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हेच नाव या चित्रपटासाठीही कायम करण्यात आले असून, या नाटकावरचा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांत स्वतंत्रपणे निर्माण करण्यात येणार आहे.
आतापर्यंत बऱ्याच नाटकांचे माध्यमांतर होऊन ती नाटके पडद्यावर झळकली आहेत. ‘बॅरिस्टर’, ‘पुरुष’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’ अशा जुन्या काळातल्या नाटकांपासून अलीकडच्या ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘नवा गडी नवं राज्य’ अशा नाटकांवर चित्रपट बनले. याच मांदियाळीत आता ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे नाटक जाऊन बसले आहे. विशेष म्हणजे, या नाटकाने गेल्याच वर्षी संयुक्त पाच हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडला असल्याने, या नाटकाच्या होत असलेल्या माध्यमांतराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
‘तरुण तुर्क’ या नाटकाचे गारुडच एवढे प्रचंड आहे, की भल्याभल्यांना हे नाटक करण्याची आतापर्यंत भुरळ पडली आणि या प्रवाहात विविध सहा संस्थांनी या नाटकाचे प्रयोग वेगवेगळ्या नटसंचात केले. या नाटकाचा कणा असलेल्या ‘प्राध्यापक बारटक्के’ या भूमिकेवर मधुकर तोरडमल यांनी स्वत:चा असा खास ठसा उमटवला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा हे नाटक पुनरुज्जीवित होऊन रंगभूमीवर येत गेले, तेव्हा तेव्हा या भूमिकेचे शिवधनुष्य कोण उचलणार, याची उत्सुकता कायम राहिली.
अलीकडच्या काळात रंगभूमीवर आलेल्या या नाटकात अभिनेता प्रदीप पटवर्धन, तसेच मोहन साटम या कलावंतांनी ही भूमिका रंगवली आहे. आता चित्रपटात ही व्यक्तिरेखा कोण साकारणार, याकडे लक्ष लागून राहिले असले, तरी अद्याप या चित्रपटातल्या कलावंतांची नावे गुलदस्त्यात आहेत. मधुकर तोरडमल यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिलीप भोसले यांच्याकडे सोपवली असून, चित्रपटाची पटकथा त्यांच्यासह दस्तूरखुद्द मधुकर तोरडमल लिहीत आहेत.