चार दिवसांतच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

By Admin | Updated: December 22, 2014 22:58 IST2014-12-22T22:58:52+5:302014-12-22T22:58:52+5:30

सहा महिन्यांपासून जोरदार प्रमोशन आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवलेल्या आमीर खानच्या ‘पीके’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर केवळ चारच दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली.

Entry into 100 crores club within four days | चार दिवसांतच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

चार दिवसांतच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

सहा महिन्यांपासून जोरदार प्रमोशन आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवलेल्या आमीर खानच्या ‘पीके’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर केवळ चारच दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली. मात्र त्याच्या याआधीच्या ‘धूम ३’ चित्रपटाने केवळ तीन दिवसांत हा टप्पा ओलांडला.
शुक्रवारी वाजतगाजत प्रदर्शित झालेल्या पीकेने लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. बॉक्स आॅफिसवर सुरुवातीपासूनच चित्रपटाला चांगले यश मिळत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने २६ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. शनिवारी ३० कोटींच्या आसपास तर रविवारच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा घेत त्याने ४० कोटींच्या आसपास कमाई केली. एकूण तीन दिवसांत चित्रपटाने ९५ कोटींची कमाई केली होती. १०० कोटी क्लबमध्ये स्थान मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ५ कोटींच्या गरजेसाठी मात्र सोमवारने हात दिला. सोमवारच्या दुपारच्या शोज्नंतर चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.
या कमाईवरून बॉलिवूडमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र चित्रपटाशी संबंधित व्यावसायिकांचा एक वर्ग ही कमाई अपेक्षेनुसार नाही असे मानणारा आहे. आमीरच्या याआधीच्या चित्रपटांची कमाई बघता पीकेची चार दिवसांची कमाई फारशी चांगली नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आमीरच्या ‘धूम’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३६ कोटींची कमाई केली आणि तीन दिवसांच्या आत १०० कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले होते. मात्र पीकेला १०० कोटी क्लबमध्ये स्थान मिळवण्यासाठी चार दिवसांची वाट पाहावी लागली. हा चित्रपट सुट्यांच्या हंगाम नसलेल्या काळात प्रदर्शित झाला; मात्र तरीही वर्षातल्या चांगला व्यवसाय करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पीकेने दुसरे स्थान मिळवले. हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तर देशात थंडीची लाट असून, दिल्ली तसेच उत्तर भारतात त्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे उत्तर भारतात पीकेच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. जर इतकी थंडी नसती तर पीकेचाही तीन दिवसांचा व्यवसाय धूम ३ चित्रपटाप्रमाणेच झाला असता, असे जाणकारांनी सांगितले. तसेच मीडियात जरी त्याचे परीक्षण चांगले आले असले तरी धर्मासारख्या संवेदनशील मुद्द्यावरून पहिल्या दिवशीच्या प्रेक्षकवर्गाच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. तसेच सोशल नेटवर्किंग साइट्सवरू नही काही धार्मिक संघटनांनी चित्रपटाला विरोध केला. त्याचाही थोडाफार परिणाम चित्रपटावर होऊन तीन दिवसांतल्या कमाईवर त्याचा प्रभाव जाणवला. अशा पार्श्वभूमीवर आमीर, राजकुमार हिरानी आणि विधु विनोद चोप्रा यांच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाबरोबरही पीकेची तुलना केली जात आहे. अशा या संमिश्र वातावरणात पीकेची कमाई ही निराशादायक नाही. चित्रपटाला नक्कीच पुढेही चांगले यश मिळेल असेही अनेकांचे म्हणणे आहे. पीकेच्या आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यातल्या त्यात अजय देवगणच्या ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’ने ५७ कोटींच्या आसपास कमाई केली. ‘बदलापूर बॉईज’पासून इतर चित्रपट मात्र बॉक्स आॅफिसमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा पीकेला होऊ शकतो.

Web Title: Entry into 100 crores club within four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.