सतारवादक निखिल बॅनर्जी जयंती

By Admin | Updated: October 14, 2016 09:02 IST2016-10-14T09:00:38+5:302016-10-14T09:02:08+5:30

भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांची आज ( १४ ऑक्टोबर) जयंती.

Entrepreneur Nikhil Banerjee Jayanti | सतारवादक निखिल बॅनर्जी जयंती

सतारवादक निखिल बॅनर्जी जयंती

>- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १४ - भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांची आज ( १४ ऑक्टोबर) जयंती.  सर्वकालीन सर्वोत्तम सतार वादकांमधील एक म्हणून गणले जातात.
 
 
पूर्वायुष्य आणि बालपण
निखील बॅनर्जी यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९१४ साली एका कलकत्त्यात झाला. त्यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी हे सुद्धा सतारवादक होते. वडिलांकडून प्रेरणा घेउन निखील बॅनर्जी यांनी लहानपणीच आपला संगीत प्रवास सुरु केलं. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे ते आकाशवाणीवर नेमणूक होणारे सर्वात लहान वयाचे संगीत कलाकार ठरले. त्यांची आवड पाहून वडिलांनी त्यांना मुश्ताक अली खान ह्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांच्याकडे निखिलजी काही आठवडेच शिकले. त्यांचे प्रमुख गुरु म्हणजे मैहर चे अलाउद्दीन खान.
 
मैहर मधील शिक्षण
अल्ला उद्दीन खान साहेबांनी निखील यांची गुणवत्ता पाहून अतिशय कठीण अशा प्रकारे त्यांच्याकडून रियाज करून घेतला. थोडी विश्रांती वगळता त्यांच्याकडून सकाळी ४ पासून रात्री ११ पर्यंत रियाझ करून घेण्यात येत असे. फक्त हाताची तयारी व तांत्रिक क्षमताच नव्हे तर त्याहून पलीकडील सांगीतिक ज्ञान निखील यांना त्यांच्याकडून मिळाले. यामुळे निखीलजींनी आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वतंत्र वादनशैली निर्माण केली.
 
अल्लौद्दिन खान यांच्यानंतर निखील बॅनर्जी यांनी व सरोदवादक उस्ताद अली अकबर खान तसेच त्यांच्या कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले.
 
कारकीर्द
मैहर घराण्यातून शिक्षण घेतल्यानंतर निखिलजींनी उस्ताद अली अकबर खान ह्यांच्याबरोबर जुगलबंदी चे कार्यक्रम केले. तसेच आकाशवाणी वर सुध्धा ते नियमित वादन करत असत. त्यांचे भारतभर कार्यक्रम होऊ लागले. त्यांचा पहिला परदेश दौरा १९५५ साली झाला. परंतु, त्यांचा पहिला मोठा अमेरिका दौरा १९६७ साली झाला. त्यानंतर मात्र त्यांना कार्यक्रमांसाठी नियमित परदेशी जावे लागे. त्यानंतर ते आपल्या कारकिर्दीत अतिशय व्यस्त झाले. ध्वनिमुद्रनापेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमांवर त्यांचा भर असायचा. परंतु ह्या व्यस्त वेळापत्रकाचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला. त्यांना १९७०-८० च्या उत्तरार्धात हृदयविकाराचा त्रास जडला.
 
वादनशैली
निखिलजींनी आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी वादन शैली निर्माण केली. त्यांच्या शैलीत गाण्यातील गेयता आणि सतार वादनातील तंतकारी अंग ह्याचा मिलाफ दिसतो. स्वर आणि ताल ह्या दोन्ही अंगांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची तयारी जबरदस्त होती. परंतु त्यांनी त्यांच्या वादनात नेहमीच सौंदर्य आणि भावपूर्णतेला महत्त्व दिलेले आढळते. सुरेख संयमी आलाप, भावपूर्ण राग विस्तार, सुरेख तिहाया, स्पष्ट-वेगवान ताना, छूट तानांवरील प्रभुत्व, लयकारी ह्यामुळे त्यांच्या शैलीत संपूर्णत्व होते.
 
त्यांचा भर पारंपारिक राग व मैहर घराण्याचे खास राग इत्यादींवर असायचा. तसेच ते अहिरी, कौशिकी, श्याम केदार इ. अनेक अपारंपरिक रागही वाजवत असत. मनोमंजरी, हेम-ललत इ. राग त्यांनी तयार केल्याचे मानले जाते.
 
२७ जानेवारी १९८६ ला कलकत्त्याला सतार वादन चालू असतानाच त्यांना अखेरचा हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले.
 
पुरस्कार
पद्मश्री पुरस्कार - इ.स. १९६८
संगीत नाटक अकादमी पुरस्कार - इ.स. १९७४
पद्मभूषण पुरस्कार - इ.स. १९८६
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

Web Title: Entrepreneur Nikhil Banerjee Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.