ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली
By Admin | Updated: August 1, 2016 11:12 IST2016-08-01T11:09:47+5:302016-08-01T11:12:27+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीतील 'ट्रॅजेडी क्वीन' अशी ओळख असणा-या प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीचा आज (१ ऑगस्ट) जन्मदिन.

ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली
>प्रफुल्ल गायकवाड
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - हिंदी चित्रपटसृष्टीतील 'ट्रॅजेडी क्वीन' अशी ओळख असणा-या प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीचा आज (१ ऑगस्ट) जन्मदिन.
१ ऑगस्ट १९३२ साली जन्मलेल्या मीना कुमारीचे मूळ नाव महजबी बानो होते. तिच्या जन्मापासूनच दुर्दैवाने तिची सोबत केली. ती जन्माला आली खरी पण आई-वडिलांच्या गाठी पैसेच नसल्याकारणाने तिला एका अनाथाश्रमात सोडून यावे लागले. नंतर त्यांनी तिला घरी आणले. ज्या वयात मुले शाळेत जातात त्या वयात लहानगी मीना वडिलांबरोबर अनिच्छेने चित्रपट स्टूडीओच्या पायऱ्या चढू लागली. तिला शाळेत जाऊन इतर मुलांसारखे शिकायचे होते. त्यासाठी ती तळमळत असायची. पण नियतीचे बेत काही वेगळेच होते. वयाच्या सातव्या वर्षापासून बेबी मीना चित्रपटांत बाल-कलाकार म्हणून दाखल झाली. ती एकटीच तिच्या कुटुंबाची पोषणकर्ती होती. तिचे वडील उर्दू कविता करायचे, हार्मोनियम वाजवायचे, चित्रपटांत क्षुल्लक भूमिकाही करायचे पण त्यांची निश्चित स्वरुपाची आवक नसल्याने मीनाच्या लहानशा खांद्यांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. तिला दोन बहिणीही होत्या. आज जशा मुला-मुलींना त्यांच्या नोकरदार आई-वडिलांकडून वेगवेगळ्या आर्थिक सुविधा उपलब्ध होतात, तशा मीनाकडून मीनाच्या कुटुंबियांना मिळत होत्या.
बैजू बावरा, आझाद, कोहिनूर अशा काही चित्रपटांतून मीनाकुमारीचे लोभस दर्शन प्रेक्षकांना घडले. छोट्याच्या चणीची, निरागस, खट्याळ, प्रेमळ, त्यागी, रुपात विलक्षण गोडवा असलेली मीनाकुमारी पडद्यावर वेगवेगळ्या स्वरुपात अनुभवायला मिळाली. काही निखळ विनोदी भूमिकाही तिच्या वाट्याला आल्या पण पडद्यावर तिने साकारलेल्या 'शोक'नायिकेलाच प्रेक्षकांनी उचलून धरलं. डोक्यावरून पदर घेतलेली, कपाळावर मोठं कुंकू लावलेली भाभी की चूडिया मधील तिची शालीनता पाहून ही मुस्लीम आहे हे मानायला मन तयार होतंच नव्हतं. ती तिने साकारलेल्या जवळजवळ प्रत्येक भूमिकेत चपखल बसायची. दिल एक मंदिरमध्ये तिने साकारलेली विवाहितेची भूमिका सहजसुंदर, मन हेलावून टाकणारी होती. पतीच्या मृत्युच्या चाहूलीने अंतर्बाह्य व्यथित झालेली आणि पतीवर उपचार करणारा तिचा लग्नाआधीचा प्रियकर असल्याने जुन्या आठवणींनी व्याकूळ झालेली तसेच आपल्या पतीवर आपल्या प्रियकराकडून योग्य ते उपचार होतील ना या साशंकतेने सैरभैर झालेली व्यक्तिरेखा तिने उत्कृष्टपणे साकार केली. तिची पाकीजामधील साहिबजानही काळजात घट्ट रुतून बसली. साहब बीबी गुलाम हा तर तिच्या अभिनयसंपन्नतेचा परमोच्चबिंदू होता. तिने पडद्यावर साकारलेली छोटी बहु ही एकमेवाव्दितीय आहे. चित्रलेखा, बहुबेगम, गझल, दिल आपण और प्रीत पराई, मी चूप रहूंगी, शारदा, काजल अशा अनेक चित्रपटांतून मीनाकुमारी ने दर्जेदार अभिनयाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. अनेक परितोषकांनी ती सन्मानित झाली.
तिचे स्वत:चे शिक्षण झाले नसले तरीही ती कवीमनाची होती. उर्दू शेरो-शायरी उत्कृष्ट पद्धतीने करत होती. अनेक नझ्म तिने गायल्याही! पण तिच्या अतिसंवेदनशील कविमनाला वास्तवातील आघात पेलवले नाहीत. ती उन्मळून पडली. मदिरेच्या आहारी गेली. तिला जगाची शुद्ध राहिली नाही.
मीना हिंदी सिनेसृष्टीच्या ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जातात. रुपेरी पडद्यावर दु:खद आणि ट्रॅजिक भूमिका केल्या आणि दमदार अभिनय करून आपली ओळख युगायुगांपर्यंत कायम ठेवली. मीना कुमारी नृत्यकलेत पारंगत होत्या. ३० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास ९० पेक्षा जास्त सिनेमांत काम केले. यामधील सर्वाधिक सिनेमे क्लासिक मानले गेले. पडद्यावर मीन कुमारी यांनी आपल्या पात्राला सजीव केले, तसेच त्यांचे खासगी आयुष्यसुध्दा ट्रॅजिक होते. साहिब, बीवी और गुलाम या क्लासिक सिनेमामध्ये मीना कुमारी यांनी धाकट्या सूनेची भूमिका साकारली होती. केवळ या पात्रामुळेच त्या दारूच्या आधीन गेल्या. करिअरच्या यशोशिखरावर पोहोचल्यानंतर आपले दु:ख लपवण्यासाठी मीना कुमारी दारू प्यायला लागल्या. प्रेमात वारंवार धोका खाल्ल्याने त्यांचे मन खचून गेले होते. त्या सतत ख-या प्रेमाच्या शोधात असायच्या. परंतु या झगमग जगात त्यांनी केवळ धोका आणि विश्वासघातच मिळतच गेला. त्यांना अनेकदा अपमानही सहन करावा लागला. याला कंटाळून त्यांनी आपले आयुष्य मद्यपानात बुडवून टाकले.
मीना कुमारी यांचे ३१ मार्च १९७२ रोजी निधन झाले.
मृत्यू आगोदर त्यांनी लिहून ठेवलेच होते-
राह देखा करेगा सदियों तक,
छोड जायेंगें ये जहाँ तनहा
मीना कुमारी यांच्या काही रचना :
दर्द तो होता रहता है, दर्द के दिनही प्यारे है,
जैसे तेज़्ा छुरी को हमने रह-रहकर फिर धार किया
मसर्रत पे रिवाजों का सख्त पहरा है
न जाने कौन सी उम्मीद पे दिल ठहरा है
तेरी आँखों में झलकते हुए इस गम की कसम
अय दोस्त, दर्द का रिश्ता बहुत ही गहरा है
खुदा के वास्ते ग़म को भी तुम न बहलाओ
इसे तो रहने दो, मेरा, यही तो मेरा है
एक वीरान-सी खामोशी है
कोई साया-सा सरसराता है
गम के सुनसान काली रातों में
दूर एक दीप टिमटिमाता है
तेरे कदमों की आहट को है दिल ये ढूंढता हरदम
हर इक आवाज़्ा पे इक थरथराट होती जाती है
मेरे अश्कों के आईनों में आज,
कौन है वह जो मुस्कुराता है
न हाथ थाम सके, न पकडम् सके दामन,
बडे क़रीब से उठकर चला गया कोई
रोते दिल, हंसते चेहरों को कोई भी न देख सका
आंसू पी लेने का वादा, हां सबने हर बार किया
कुहर है धुंध है, बेशक्ल-सा धुंआ है कोई,
दिल अपनी रुह से लिपटा है अजनबी की तरह
प्यास जलते हुए कांटों की बुझाई होगी,
रिसते पानी को हथेली पे सजाया होगा