टॉलिवूडचा कलाकार कार्तिक शेट्टी ‘मराठी’च्या दिग्दर्शनात
By Admin | Updated: September 3, 2015 23:17 IST2015-09-03T23:17:27+5:302015-09-03T23:17:27+5:30
मराठी अभिनेते आणि अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये यशस्वी झाल्याचा इतिहास तसा नवा नाही, मात्र टॉलिवूडचा एखादा कलाकार मराठीकडे वळणे तसे दुर्मिळच चित्र! तिथल्या कलाकारांनाही आता

टॉलिवूडचा कलाकार कार्तिक शेट्टी ‘मराठी’च्या दिग्दर्शनात
मराठी अभिनेते आणि अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये यशस्वी झाल्याचा इतिहास तसा नवा नाही, मात्र टॉलिवूडचा एखादा कलाकार मराठीकडे वळणे तसे दुर्मिळच चित्र! तिथल्या कलाकारांनाही आता मराठीचे आकर्षण वाटू लागले आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे, युवा, कार्तिक, अग्निमुष्टी अशा चित्रपटांच्या माध्यमातून दक्षिणात्य सिनेसृष्टीत सध्या चर्चेत असलेला अभिनेता कार्तिक शेट्टी मराठीच्या दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. ‘अक्षते’ या प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या कन्नड सिनेमांमधून कार्तिकने आपल्या अभिनयाची उत्तम छाप उमटवली आहे. आगामी ‘ठण ठण गोपाळ’ या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन त्याने केले असून त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पदार्पणातील चित्रपट आहे.
मुंबईत जन्म झालेल्या कार्तिक शेट्टी याने डिजिटल फिल्म अॅकॅडमी येथून फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले असून हिंदी, कन्नड भाषिक नाटकांमध्ये त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. याबद्दल सांगताना तो म्हणतो, अनेक दिवसांपासून दक्षिणेत प्रतीक्षेत असलेल्या ‘अक्षते’ या कन्नड सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ‘ठण ठण गोपाळ’ या सिनेमाची कथा मी माझ्या सहकाऱ्यांना ऐकवली आणि त्यांनाही ती खूप आवडली. आमचे दाक्षिणात्य सिनेमे हे बहुतांशी मसाला आणि अॅक्शनपट असतात, तर मराठीतील उत्तम कथानक प्रेक्षकांना भावतात. त्यामुळे मी हा सिनेमा मराठीत करण्याचे ठरविले. स्वत: फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले असल्याने तसेच आजवर केलेल्या कामांचा अनुभव पाठीशी असल्याने मी हा सिनेमा स्वत:च दिग्दर्शित करण्याचे ठरविले. ‘ठण ठण गोपाळ’ सिनेमाची कथा ही दृष्टी नसलेल्या परंतु मनाने जिद्दी असलेल्या एका अकरा वर्षाच्या मुलाची आहे. या मुलाची एका वारली चित्रकाराशी मैत्री होते आणि पुढे त्याच्या आयुष्याला जी एक कलाटणी मिळते त्याभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे.
‘ठण ठण गोपाळ’ सिनेमाची कथा आणि पटकथा कार्तिक शेट्टी, श्रीनिवास शिंदे आणि राहुल पोटे यांची तर संवाद वैभव परब यांचे आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी, मिलिंद गवळी बालकलाकार विवेक चाबुकस्वार आणि जर्मन अभिनेत्री सुझेन बर्नेट या कलाकारांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. ‘ठण ठण गोपाळ’ हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून येत्या आॅक्टोबर महिन्यात हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.