दिग्दर्शक रमेश सिप्पींचा 'एशियन कल्चर' पुरस्काराने गौरव

By संजय घावरे | Updated: January 8, 2024 17:13 IST2024-01-08T17:12:51+5:302024-01-08T17:13:17+5:30

लेखक प्रकाश मगदुम यांना चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार, तर सुभाष देसाईंना 'सत्यजित रे' पुरस्कार

Director Ramesh Sippy honored with 'Asian Culture' award | दिग्दर्शक रमेश सिप्पींचा 'एशियन कल्चर' पुरस्काराने गौरव

दिग्दर्शक रमेश सिप्पींचा 'एशियन कल्चर' पुरस्काराने गौरव

मुंबई - जागतिक चित्रपटांची मेजवानी असलेल्या यंदाच्या २०व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात हिंदीतील प्रथितयश दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना 'एशियन कल्चर' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान होणार असून, आशियातील महत्त्वपूर्ण मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

'शोले', 'शान', 'सीता और गीता', 'सागर'सारख्या लोकप्रिय  चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी रसिकांना आजवर बरेच उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी इतिहास रचला असून भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे. याचीच दखल त्यांना एशियन कल्चर पुरस्कार देऊन घेण्यात येणार आहे. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी देण्यात येणारा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार लेखक प्रकाश मगदुम यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या 'द महात्मा ऑन सेल्युलॉइड' या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामाकरिता फिल्म सोसायटी चळवळीचे कार्यकर्ते सुभाष देसाई यांना 'सत्यजित रे' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.  

२० व्या 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा'ची प्रतिनिधी नोंदणी ५ जानेवारीपासून सुरू झाली असून महोत्सवाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल. तसेच सिटीलाइट सिनेमा, माहिम, कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स आणि ठाणेतील पीव्हीआर सिनेपोलिस यथेही प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करता येऊ शकते.

Web Title: Director Ramesh Sippy honored with 'Asian Culture' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.