दिग्दर्शनात भरकटले ‘उड्डाण’

By Admin | Updated: January 30, 2015 22:58 IST2015-01-30T22:58:19+5:302015-01-30T22:58:19+5:30

राईट बंधूंनी विमानाचा शोध लावल्याचे आपण इतिहासात वाचले आहे; पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे

Directed by 'Directed' | दिग्दर्शनात भरकटले ‘उड्डाण’

दिग्दर्शनात भरकटले ‘उड्डाण’

हिंदी चित्रपट, अनुज अलंकार
राईट बंधूंनी विमानाचा शोध लावल्याचे आपण इतिहासात वाचले आहे; पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. राईट बंधूंच्या तीन वर्षे आधी महाराष्ट्रातल्या एका माणसाने जगातील पहिले विमान उडवण्यात यश मिळवले होते. पण त्या वेळी इंग्रजांनी त्याला मान्यता दिली नाही. त्यामुळेच एका भारतीयाचा हा शोध काहीसा दुर्लक्षितच राहिला. अशा मनोरंजक कथेला पहिल्यांदाच दिग्दर्शनात उतरलेल्या विभू वीरेंद्र पुरी यांनी ‘हवाईजादा’ चित्रपटात उजाळा दिला आहे. इतिहासातली जुनी पाने चाळताना कथा मनोरंजक करण्यासाठी अनेक पर्याय विभूकडे होते. पण अनुभव नसल्याने संपूर्ण चित्रपटावरच त्याचा वाईट परिणाम झाला. चित्रपटाची कथा महाराष्ट्रात घडते. महाराष्ट्रातील एका गावातील शास्त्रीजी (मिथुन चक्रवर्ती) हे हवेत उडण्यासाठी आवश्यक असलेल्या विमानाचा शोध लावण्याचा प्रयत्न करीत असतात. पण इंग्रज सरकार त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडते. त्याचवेळी गावातल्या श्रीमंत कुटुंबातल्या आणि शिक्षणात हुशार नसल्याने नेहमीच वडील आणि भावाची बोलणी खाणाऱ्या शिवकर गोविंदराव तळपदे (आयुष्यमान खुराणा) ची शास्त्रींशी ओळख होते. तो त्यांच्याबरोबर काम करायला लागतो. त्या वेळी शास्त्रींना शिवकरच्या प्रतिभेची जाणीव होते. शिवकरला गावातली नृत्यांगना सितारा (शारदा पल्लवी) आवडत असते. पण पैशांच्या लालसेपोटी ती त्याला सोडून जाते. त्यामुळे शिवकर दु:खी होतो. पण शास्त्रीजींबरोबरचे काम मात्र त्याला स्वस्थ बसू देत नाही. काही ना काही कारणाने विमान उड्डाणाच्या कामात अडचणी येतात, पण ते दोघे निराश होत नाहीत. त्याचवेळी सितारा पुन्हा शिवकरच्या आयुष्यात येते. कर्जात बुडालेल्या सिताराला त्यातून वाचवण्यासाठी शिवकर विमान उड्डाणाचा फॉर्म्युलाच इंग्रज सरकारला विकतो. हा धक्का सहन न झाल्याने शास्त्रीजींचा मृत्यू होतो. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे शल्य शिवकरच्या मनात असते. मात्र शास्त्रींचे स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्येयाने शिवकर पुन्हा कामाला लागतो आणि आपल्या प्रयोजनात यशस्वी ठरतो.
चित्रपटाच्या उणिवा - एका चांगल्या कथेवर उत्कृष्ट चित्रपटनिर्मिती करण्याची विभू पुरीकडे पुरेपूर संधी होती, पण त्याने मेहनत न घेल्याने सर्वच वाया गेले. यामागे चित्रपटाचा आशय भरकटणे, चित्रपट अति नाटकी करणे आणि भूमिकांचा योग्य अभ्यास न झाल्याची कारणे आहेत. त्या काळी विमान बनवण्याचा प्रयत्न करून एक भारतीय बाजी मारतोय, याचा स्वीकार करणे इंग्रजांना जड जात असल्याने ते त्याला मान्यता देत नाहीत. या आशयावर विभूला चित्रपट बनवायचा होता. पण त्यात शिवकर-सिताराच्या प्रेमकथेवर जास्त लक्ष दिल्याने मूळ आशयापासून चित्रपट भरकटलाच. तसेच चित्रपटावर संतूलनही ठेवता आले नाही. चित्रपट अति नाटकी करण्यावरही नको इतका भर दिला गेला. हा चित्रपट भारतासाठी नक्कीच संवेदनशील ठरू शकला असता, पण त्या संवेदनांना न्याय देण्यासही विभू कमी पडला. भूमिका आणि कथानक हे नाटकीच वाटते. कलाकारांबाबत सांगायचे झाल्यास आयुष्यमानने भूूमिकेत जीव ओतण्यासाठी पुरेपूर मेहनत केली असली, तरी त्याच्या क्षमतेपेक्षा शिवकरची भूमिका मोठी होती.

Web Title: Directed by 'Directed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.