दिलखुलास ‘देवदत्त नागे’

By Admin | Updated: May 20, 2017 03:56 IST2017-05-20T03:56:01+5:302017-05-20T03:56:01+5:30

देवदत्त नागेला भेटण्याची संधी ‘लोकमतच्या सीएनएक्स’ या वेबसाईटने वाचकांना दिली होती. वाचकांना काही प्रश्न विचारण्यात आले होते आणि या प्रश्नांची अचूक उत्तरे

Dilkhulas 'Devadatta Nage' | दिलखुलास ‘देवदत्त नागे’

दिलखुलास ‘देवदत्त नागे’

- Prajakta Chitnis

देवदत्त नागेला भेटण्याची संधी ‘लोकमतच्या सीएनएक्स’ या वेबसाईटने वाचकांना दिली होती. वाचकांना काही प्रश्न विचारण्यात आले होते आणि या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या भाग्यशाली विजेत्यांना देवदत्तला भेटण्याची संधी देण्यात आली होती. या स्पर्धेत हजारो लोकांनी भाग घेतला असून, त्यातून काही वाचकांची निवड करण्यात आली होती आणि लोकमतच्या आॅफिसमध्ये देवदत्त आणि या वाचकांची भेट घडवून देण्यात आली.
देवदत्तला भेटायला महाराष्ट्राच्या विविध भागांतून लोक आले होते. तसेच अमराठी लोकदेखील या स्पर्धेत भाग घेऊन देवदत्तला भेटले. देवदत्तने त्याचे स्टारडम बाजूला ठेवून एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे त्यांच्याशी गप्पा मारल्या. देवदत्तने त्याच्या अनेक खासगी गोष्टी, एका मालिकेच्या चित्रीकरणाचा अनुभव त्यांच्यासोबत शेअर केला. तसेच, त्याने या लोकांच्या घरात कोण असते, ते काय करतात, अशी आपुलकीने चौकशीही केली.
देवदत्तला बाईकचे प्रचंड वेड आहे. त्यामुळे देवदत्तने त्याला कोणकोणत्या बाईक आवडतात, हे त्यांना सांगितले. पण, त्याचसोबत ‘बाईक चालवताना हॅल्मेट घाला. सुरक्षिततेचे सगळे मार्ग अवलंबा,’ असे आवर्जून सांगितले. खंडोबा या व्यक्तिरेखेमुळे देवदत्तच्या करिअरला एक वेगळे वळण मिळाले. या मालिकेचे चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी त्याने जेजुरीला जाऊन दर्शन घेतले होते. तसेच मालिकेच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशीदेखील तो जेजुरीला दर्शनासाठी गेला होता, असे त्याने सांगितले. मालिका सुरू असताना देखील तो अनेक वेळा जेजुरीला जात असे. पण, तो तोंडाला रुमाल बांधून जात असल्याने लोकांना त्याला ओळखणे सुरुवातीला कठीण जात असे. परंतु, काही दिवसांनंतर तो दर्शनासाठी रुमाल बांधून येतो, हे लोकांना कळाले होते. त्यामुळे रुमाल बांधलेली व्यक्ती दिसली की, ‘तो मीच आहे’ असे लोक लगेचच ओळखत, असे तो सांगतो. या मालिकेमुळे त्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. लोक त्याला खंडोबा समजून आजही पाया पडतात, असे तो सांगतो.
देवदत्त अनेक वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी काम करत आहे. त्याने त्याला भेटायला आलेल्या लोकांना व्यसनमुक्ती विषयी सांगितले. ‘मी माझ्या आयुष्यात कधीच कोणतीही दारू चाखली नाही की सिगारेट ओढली नाही, याचा मला अभिमान आहे आणि माझ्या फॅन्सनीदेखील दारू, सिगारेट या व्यसनांच्या आधीन जाऊ नये, असे मी त्यांना सांगेन.’ ‘ही’ भूमिका कशी मिळाली असे एका वाचकाने देवदत्तला विचारले असता त्याने सांगितले, ‘मनोज कोल्हटकर यांनी एकदा मला फोन करून माझे काही फोटो मागवले होते. पण, एका नायकाच्या भूमिकेसाठी ते फोटो मागत असल्याने मी ते दिलेच नाही. मला नायक नव्हे तर खलनायकाची भूमिका साकारायची होती. त्यांनी मला तीन-चार वेळा फोन करूनसुद्धा मी दुर्लक्ष केले. त्यामुळे शेवटी त्यांनीच फेसबुकवरून माझे काही फोटो घेतले आणि ते पाहून मला महेश कोठारे
यांच्या आॅफिसमधून फोन आला. मी या भूमिकेसाठी आॅडिशन दिले आणि माझी निवड झाली.’
तीन वर्षांपासून देवदत्त मालिका करत असल्याने त्याला आराम करायला वेळच मिळाला नाही आणि त्यातही तो त्याच्या फिटनेसच्या बाबतीत सतर्क असल्याने कितीही वाजता चित्रीकरण संपले तरी जिमला जात असे. यामुळे त्याला दिवसातून केवळ चार-पाच तासच झोपायला मिळत असे; पण चित्रीकरण संपल्यावर आता सात तास तरी झोपायचे, असे त्याने ठरवले आहे. मालिका संपल्यावर तो या मालिकेच्या संपूर्ण टीमला मिस करतोय, असे तो सांगतो.

Web Title: Dilkhulas 'Devadatta Nage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.