धोनीमुळे मला एकस्वप्न जगता आलं

By Admin | Updated: October 1, 2016 02:40 IST2016-10-01T02:40:03+5:302016-10-01T02:40:03+5:30

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर आधारित ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट येतो आहे. सुशांतसिंग राजपूत हा या चित्रपटात धोनीची भूमिका साकारतो आहे.

Dhoni got me a dream | धोनीमुळे मला एकस्वप्न जगता आलं

धोनीमुळे मला एकस्वप्न जगता आलं

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर आधारित ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट येतो आहे. सुशांतसिंग राजपूत हा या चित्रपटात धोनीची भूमिका साकारतो आहे. याच संदर्भात सुशांतशी मारलेल्या या खास गप्पा...

धोनीची भूमिका साकारताना काय अनुभव आले याबद्दल तू काय सांगशील?
- गेल्या १२ वर्षांपासून मी महेंद्रसिंह धोनीचा फॅन आहे. त्याला मी खेळताना वारंवार पाहिले आहे. मला ज्या वेळी हा चित्रपट करण्याविषयी विचारण्यात आले, त्या वेळी मी आनंदित झालो. त्यानंतर मी या चित्रपटची स्क्रिप्ट पाहिली आणि काम करण्यास होकार दिला. धोनीचे वैशिष्ट्य म्हणजे तो भूतकाळाचा अथवा भविष्यकाळाचा फारसा विचार न करता वर्तमानकाळात जगतो. मीही तसाच आहे. मला वर्तमानात जगायला आवडते.
या भूमिकेसाठी तू क्रिकेटचे प्रशिक्षण कशा पद्धतीने घेतले?
- मी किरण मोरे यांच्याकडून जवळपास १२ ते १३ महिने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. क्रिकेट कसे खेळावे हे मला त्यांनी शिकवले. प्रशिक्षण घेताना मी धोनीसारखे क्रिकेट किट, बॅट आणि हेल्मेट वापरायचो. बॉलिंग मशिनद्वारे फेकल्या जाणाऱ्या चेंडूवर रोज २०० ते ३०० शॉट मारायचो. मला फटके कशा पद्धतीने मारायचे, हे किरण मोरे यांनी शिकवले.
तुझा रोल मॉडेल कोण? क्रिकेटकडे तू कशा पद्धतीने पाहतोस?
- मी लहानपणापासूनच क्रिकेटकडे पाहत वाढलो आहे. माझी बहीण राज्य पातळीवर क्रिकेट खेळते. तुम्ही जीवनाकडे कशा पद्धतीने पाहता, यावर तुमचा रोल मॉडेल कोण आहे हे अवलंबून असते. मी शाळेत असताना सचिन तेंडुलकरला माझा आदर्श मानायचो. त्यानंतर कॉलेजच्या पहिल्या वर्षी मी धोनीचा खेळ पाहिला. पदार्पणातच धोनीने पाकिस्तानविरोधात १४0 धावा केल्या होत्या. त्यानंतर मी धोनीच्या खेळाचा फॅन झालो. मीही धोनीसारख्या छोट्या शहरातून आलो आहे. त्यामुळे धोनी मला जवळचा वाटतो.
तुझी बहीण क्रिकेट खेळायची. महिला क्रिकेटला फारसे प्राधान्य दिले जात नाही. महिला क्रिकेटच्या वाढीसाठी तुझे काय मत आहे?
- मुलींना क्रिकेटसाठी पायाभूत सुविधा देणे महत्त्वाच्या आहेत. आयपीएलसारखे सामने होणे गरजेचे आहे. सरकार, कॉपोर्रेट जगत आणि आपण एकत्र येऊन मुलींच्या खेळासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मला वाटते. आपण जर या गोष्टींकडे लक्ष दिले तरच महिला क्रिकेटकडे वळतील.
कोणतीही पार्श्वभूमी नसताना तू अभिनेता होण्यासाठी कोणता संघर्ष केला?
- मला इंजिनिअर व्हायचे होते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांत मी हुशार होतो. दिल्लीमध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला खरा; मात्र पहिल्याच सत्रात मी वळलो
ते नाटकांकडे. त्यानंतर मात्र मी शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आणि तोच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट
ठरला. तिकडे शिकलेल्या बऱ्याच गोष्टींचा मला आजही अभिनय करताना उपयोग होतो.
धोनीची भूमिका साकारताना तुझ्यात आणि धोनीमध्ये तुला काही साम्य आढळले का?
- धोनीप्रमाणे मीही कधी तडजोड केली नाही. त्याचा आणि माझा स्वभाव जवळपास सारखा आहे. मी ज्या वेळी लहान होतो, त्या वेळी दुपारी अभ्यास करायचो, सायंकाळी क्रिकेट खेळायचो. धोनीही त्याच्या लहानपणी सायंकाळीच क्रिकेट खेळायचा. तसंच आम्हाला दोघांनाही वर्तमानात जगायला आवडते.

- janhavi.samant@lokmat.com

Web Title: Dhoni got me a dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.