धोनीने केले ‘क्लीन बोल्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2016 02:44 IST2016-10-01T02:44:12+5:302016-10-01T02:44:12+5:30

एम.एस. धोनी - द अन्टोल्ड स्टोरी हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे यात काही वाद नाही. मुळात क्रिकेट या विषयावर चित्रपट आहे आणि त्यातही ही बायोपिक धोनी या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वावर असल्याने

Dhoni gets clean bowled | धोनीने केले ‘क्लीन बोल्ड’

धोनीने केले ‘क्लीन बोल्ड’

- जान्हवी सामंत

हिंदी चित्रपट - एम.एस. धोनी - द अन्टोल्ड स्टोरी

एम.एस. धोनी - द अन्टोल्ड स्टोरी हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे यात काही वाद नाही. मुळात क्रिकेट या विषयावर चित्रपट आहे आणि त्यातही ही बायोपिक धोनी या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वावर असल्याने या चित्रपटात लोकांना इंटरेस्ट असणे स्वाभाविकच आहे. क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीचे क्रिकेट करिअर आणि आयुष्य इतके ड्रॅमॅटिक आहे की, याच गोष्टी चित्रपटाला मनोरंजक बनवतात. पण या चित्रपटाची खरी ताकद ही त्याची यशोगाथा नसून त्याच्या आयुष्यात आलेल्या समस्या आणि त्याचे स्पिरिट, चिकाटी आणि त्याची अतोनात जिद्द ही आहे. या गोष्टी अतिशय रंजकपणे या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
एका छोट्या शहरातल्या पंप आॅपरेटरच्या मुलाची एवढी मोठी जगभरारी घेणारी झेप आणि त्या झेपेसाठी त्या मुलाने केलेला संघर्ष अशी या चित्रपटाची कथा आहे. महेंद्र सिंग धोनी हा एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेला एक सर्वसाधारण मुलगा असतो. प्रत्येक आई-वडिलांप्रमाणेच धोनीच्या पालकांचीही धोनीने शिक्षण घेऊन कुठे तरी चांगली नोकरी करून आयुष्यात स्थिर व्हावे, अशी अपेक्षा असते. पण धोनीला इतर मुलांप्रमाणे खेळात रस असतो. त्याचे फुटबॉलमधले गोल कीपिंग पाहून त्याचे कोच बॅनर्जी (राजेश शर्मा) त्याला क्रिकेटच्या टीममध्ये सहभागी होण्यासाठी चाचणी परीक्षेला बोलावतात. क्रिकेटमध्ये फार रस नसूनही शाळेतल्या क्रिकेट टीममध्ये धोनीची निवड होते. यानंतर हळूहळू त्याचा क्रिकेटमध्ये रस वाढू लागतो. त्याला या खेळात चांगले यशही मिळते. पण कुठे तरी आपल्या वडिलांनी आपल्यासाठी बघितलेले स्वप्न क्रिकेटमुळे मागे पडेल, अशी भीती त्याच्या मनात नेहमीच असते.
परीक्षा, ट्रेनिंग आणि मॅचेसच्या जबाबदाऱ्या धोनी समर्थपणे पेलत असतो. क्रिकेटमधल्या यशामुळे त्याला रेल्वेत टीसीची नोकरी मिळते. या नोकरीमुळे धोनीचे आई-वडील खूश होतात. मात्र ती करत असताना आपले क्रिकेटकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्याच्या लक्षात येते. वडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन धोनी क्रिकेटवर असलेल्या प्रेमापोटी रेल्वेतील नोकरी सोडून देतो. त्यानंतर त्याची इंडियन क्रिकेट टीममध्ये निवड होते आणि त्यानंतर यशाची एक-एक शिखरे तो गाठत जातो.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे धोनीचा संघर्ष आणि त्याच्या अपयशाबाबत चित्रपटात जास्त भाष्य करण्यात आले आहे. धोनीचा आत्मविश्वास, निर्णय घेण्याची त्याची क्षमता, कठीण परिस्थितीमध्ये संयम राखण्याचा त्याचा गुण या गोष्टी अत्यंत बारकाईने चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. टीसीची नोकरी करताना त्याची होणारी दगदग, आई-वडिलांना नाराज न करण्याचा त्याचा अट्टाहास चित्रपटात अतिशय नाजूकतेने चित्रित करण्यात आला आहे. धोनीची एकाग्रता कशी वाढली हे आपल्याला काही दृश्यांतून नक्कीच समजते.
चित्रपटाचा पहिला भाग आपल्याला कथेत गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. मात्र दुसऱ्या भागात काही ठिकाणी चित्रपटाची कथा ढासळत जाते. या भागातील लव्ह ट्रॅक थोडासा कंटाळावाणा आहे. क्रिकेट खेळताना धोनीने आखलेले डावपेच, अनुभवातून धोनीमध्ये आलेली परिपक्वता, चौकटीबाहेरचा क्रिकेटर ते इंडियन टीमच्या कूल कॅप्टनपर्यंतचा त्याचा प्रवास आणि याच दरम्यान धोनीमध्ये झालेले बदल हे अजून बारकाईने बघायला प्रेक्षकांना नक्कीच आवडले असते. टीममधल्या इतर खेळांडूबरोबर असलेले त्याचे बाँडिंग आणि ड्रेसिंग रूममधील धमाल, मस्ती हे चित्रपटात कुठे तरी आपण मिस करतो.
सुशांत सिंग राजपूत धोनीच्या भूमिकेशी एकरूप झालेला आहे. ही भूमिका साकारताना सुशांत हा धोनीच असल्याचा आपल्याला अनेक वेळा भास होतो. तब्बल ३ तास ५ मिनिटांचा हा चित्रपट असल्याने कुठे तरी कंटाळा येणे स्वाभाविकच आहे.
हा चित्रपट तुम्हाला चौकटीबाहेर जाऊन विचार करायला नक्कीच भाग पाडतो. आपली स्वप्ने साकारण्याकरता मध्यमवर्गीय चौकटीतून बाहेर पडून रिस्क घेणे किती गरजेचे आहे हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते. त्यामुळे एकदा जाऊन हा चित्रपट नक्कीच बघा असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

Web Title: Dhoni gets clean bowled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.