ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांची पुण्यतिथी

By Admin | Updated: August 16, 2016 10:07 IST2016-08-16T10:06:42+5:302016-08-16T10:07:54+5:30

ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांची आज (१६ ऑगस्ट) पुण्यतिथी.

Death anniversary of senior poet Narayan Gangaram Surve | ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांची पुण्यतिथी

ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांची पुण्यतिथी

style="text-align: justify;">संजीव वेलणकर
पुणे, दि. १६ - ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांची आज (१६ ऑगस्ट) पुण्यतिथी.
 
आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र , तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते 
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते 
जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते, चला बरे झाले; 
आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते...जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन, तेव्हा एक कर, ... अशा अनेक कवितांनी मराठी रसिकांच्या मनावर राज्य गाजवणारे कवी म्हणजे मा.नारायण सुर्वे. १५ ऑक्टोबर १९२६ साली त्यांचा जन्म झाला. 
 
१९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीत एका कापडगिरणीसमोर रस्त्यावरचा हा अनाथ जीव गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. गिरणी कामगारच असलेल्या काशीबाई सुर्वे यांनी या "बाळगलेल्या पोराला' स्वत:च्या मुलासारखे प्रेम दिले आणि "नारायण गंगाराम सुर्वे' हे नावही दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत ते वाढले. कमालीचे दारिद्य्र, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून त्यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले. घरात अठराविश्वम दारिद्य्र असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता-वाचता यावीत म्हणून दादर, अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातले. नारायण सुर्वे १९३६ मध्ये चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते कोकणात गावी निघून गेले. गावी जाताना त्यांनी नारायणाच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि समोर मुंबईचा विशाल सागर.
मग भाकरीचा चतकोर चंद्र मिळविण्यासाठी ते एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशा विसळणारा पोऱ्या, कुणाचे कुत्रे-कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम् या, दूध टाकणारा पोरगा, अशी कामे करीत वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीत धागाही धरला. बॉबीन भरली. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे "सुर्वे मास्तर' झाले. "कधी दोन घेत, कधी दोन देत' आयुष्याची वाटचाल सुरू असतानाच जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून घेत त्यांनी मराठी काव्यप्रांतात एक नवा सूर घुमवला. त्यांची पहिली कविता १९५८ मध्ये "नवयुग' मासिकात प्रसिद्ध झाली. "डोंगरी शेत माझं गं....' हे त्यांचे पहिले गाजलेले गीत. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली. 
१९६२ मध्ये "ऐसा गा मी ब्रह्म' प्रकाशित झाला. त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर सुर्वे यांचे कवितासंग्रह एकामागोमाग येत राहिले. गाजत रा हिले. "माझे विद्यापीठ', "जाहीरनामा', "पुन्हा एकदा कविता', "सनद' हे त्यांचे कवितासंग्रह. नालबंदवाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हणम्या, इस ल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकविणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंचे निधन झाले म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्या्, अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत समर्पकपणे व रेखीवपणे उभी केली आहेत. सुर्व्यांचे पहिलेवहिले काव्यवाचन झाले ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगावच्या साहित्य संमेलनात. त्या वेळेपासून ते प्रत्येक काव्यमैफलीत खड्या सुराने रंग भरत आहेत. "मास्तर, तुमचंच नाव लिवा...', "असं पत्रात लिवा', "मर्ढेकर', "सर कर एकेक गड', "मनिऑर्डर', "मुंबईची लावणी', "गिरणीची लावणी' या त्यांच्या कविता हमखास पावती घेतात. श्री. सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून ईश्वीरवाद, प्रारब्ध, उच्च-नीचता किंवा जातीचा कधीही पुरस्कार केलेला नाही. त्यांनी मराठी कवितेत कामगारांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे जग शब्दबद्ध करून आणि त्यांच्या संघर्षातून कृतिशील आशावादाकडे झेपावणाऱ्या आकांक्षांचे चित्रण, पुरोगामी विचारांच्या मुशीतून निघालेल्या शब्दकळेद्वारे केले आणि मराठी कवितेला सामाजिक बांधिलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला आहे. 
सुर्वे वाढले त्या चाळीतील सारेच जण साम्यवादी पक्षात होते. डावी चळवळ जोरात होती. ती चळवळ हा त्यांचा मोठा आधार बनली. सुर्व्यांच्या वैचारिक प्र वासाची ही सुरवात होती. "माझ्या पहिल्या संपात मार्क्सआ मला असा भेटला,' असे सांगणाऱ्या सुर्व्यांची साम्यवादी, डाव्या विचारप्रणालीशी बांधिलकी आहे. कम्युनिस्ट चळवळीत ते "रेडगार्ड' बनले. या चळवळीतील एक कॉम्रेड तळेकर यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम बसले. आई-बापाविना वाढलेल्या कृष्णा साळुंके हिच् याशी त्यांनी विवाह केला. आयुष्यातील कष्ट संपले नव्हते. खारजवळ एका झोपडपट्टीत त्यांनी संसार थाटला होता. मोठा मुलगा अवघा बावीस दिवसांचा असतानाच हे झोपडे तोडले गेले. आठ दिवस फुटपाथवरच संसार होता. या अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनातील कठोर वास्तवाशी, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे क्रांतिकार्य श्री. सुर्वे यांनी केले आहे. जीवनात जे वास्तव अनुभवले, त्यांचे भांडवल करायचे नाही, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे ते अनेकांना आपले वाटतात. पदपथापासून विद्यापीठापर्यंत आणि कामगारांपासून ते बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत त्यांच्या कवितांना रसिकमान्यता मिळाली. संत कबीरालाही त्याच्या आईनं नदीकाठी सोडलं. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला...त्यालाही त्याची जात सांगता आली नाही अन् मलाही...असं सुर्वे म्हणत.
ज्यांना सुर्वे दिसू आले नाहीत, अशांसाठी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी एकदा सांगितले, "अरे, केशवसुत कशाला शोधताय? तुमचा केशवसुत परळ मध्येच राहतोय.' मा.नारायण सुर्वे यांचा पद्‌मश्री, सोव्हिएत रशियाचं नेहरू ऍवॉर्ड, जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, नरसिंह मेहता पुरस्कार, कराड साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, असे अनेक पुरस्कार देऊन गौरव झाला. मा.नारायण सुर्वे यांचे १६ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा. नारायण सुर्वे यांना आदरांजली. 
संदर्भ-  इंटरनेट

Web Title: Death anniversary of senior poet Narayan Gangaram Surve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.