‘करन्सी स्ट्राईक’चा बी-टाऊनला ‘दे धक्का’
By Admin | Updated: November 12, 2016 05:12 IST2016-11-12T05:12:41+5:302016-11-12T05:12:41+5:30
सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. देशात कुठेही काहीही झाले, तरी बॉलिवूडमध्ये त्याचे पडसाद उमटतात.

‘करन्सी स्ट्राईक’चा बी-टाऊनला ‘दे धक्का’
सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. देशात कुठेही काहीही झाले, तरी बॉलिवूडमध्ये त्याचे पडसाद उमटतात. अपेक्षेनुसार, सरकारच्या या निर्णयाचेही अब्जावधींची उलाढाल असलेल्या बॉलिवूडमध्ये जोरदार पडसाद उमटले. या निर्णयाने चित्रपट उद्योगात खळबळ माजली. या खळबळीमागचे कारण म्हणजे, या निर्णयाचा चित्रपटउद्योगावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम. सरकारच्या या दूरगामी निर्णयाचे चित्रपटसृष्टीवर काय काय परिणाम होणार आहे, त्याचाच हा वेध...
पहिला फटका!
पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा पहिला फटका चित्रपटगृहांमध्ये असलेल्या चित्रपटांना झाला. पाचशे व हजाराच्या नोटा अचानक चलनातून बाद झाल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला. यात एक गोष्ट तेवढीच अचानक घडली. ती म्हणजे लोकांनी आपल्या तातडीच्या गरजांना प्राधान्यक्रम देत, मनोरंजनाकडे तात्पुरती पाठ फिरवली. याचा थेट परिणाम बॉक्सआॅफिसवर कलेक्शनवर झाला. ‘शिवाय’, ‘ऐ दिल है मुश्किल’ या दोन मोठ्या चित्रपटांना याचा पहिला फटका बसला. हे दोन चित्रपट चांगले कमाई करत असताना अचानक या निर्णयाने त्यांचे कलेक्शन
३० ते ४० टक्क्यांनीघसरले.
दुसरा फटका!
पाचशे व हजाराच्या नोटा अचानक बाद झाल्याने अनेक ठिकाणी मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण खोळंबले. चित्रीकरणादरम्यान कलाकार, तंत्रज्ञांचे मानधन हे ठराविक दिवसांनंतर दिले जाते. तर स्पॉटबॉयशिवाय चित्रीकरणासाठी लागणाऱ्या सामानाची ने-आण करणाऱ्यांसह अनेकांना रोजच्या कामाचे पैसे रोज मिळतात. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा अचानक बंद झाल्याने निर्मात्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या या संकटामुळे अनेक ठिकाणी चित्रीकरण थांबले.
तिसरा फटका किती जोरात?
पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याच्या निर्णयाने चित्रपटसृष्टीवर काळजीचे ढग दाटून आले असतानाच शुक्रवारी फरहान अख्तर, श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘रॉक आॅन2’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट चित्रपटगृहांत झळकला. सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांचा वेगळ्या विषयाला वाहिलेला ‘वजनदार’ही प्रदर्शित झाला. पण पहिल्याच आठवड्यात पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा फटका या दोन्ही चित्रपटांना बसू शकतो. खुद्द चित्रपटगृहाच्या मालकांनी आणि सिने जाणकारांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. खरे तर प्रेक्षकांसाठी आॅनलाइन तिकिट खरेदीचा तसेच डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे तिकीट विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण भारतात नगदी तिकीट खरेदी करणाऱ्यांची संख्या तुलनेने कित्येकपट मोठी आहे. साहजिक पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा या दोन चित्रपटांना बसू शकतो. हा फटका किती जोरदार असेल, हे तूर्तास सांगता येणार नाही. पण तो बसेल, हे मात्र निश्चितपणे म्हणता येईल.
‘जोर का झटका, धीरे से’!
पाचशे व हजाराच्या नोटा बंद झाल्याच्या निर्णयाचा बॉक्सआॅफिस कलेक्शनवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. लहान बजेटच्या चित्रपटांना हे परवडण्यासारखे नाही. त्यामुळेच ‘जस्ट ३० मिनिट’ व ‘सांसे’ या दोन चित्रपटांचे प्रदर्शन लांबवणे निर्मात्यांना भाग पडले आहे. ऐनवेळी या दोन चित्रपटांना आपली रिलीज डेट बदलवावी लागली. हितेन पेंटल, हृषिता भट्ट यांची मुख्य भूमिका असलेला ‘जस्ट ३० मिनट’ हा चित्रपट आता ९ डिसेंबरला रिलीज होईल. रजनीश दुग्गल आणि सोनालिका भदौरिया यांच्या ‘सांसे’ या चित्रपटाचे प्रदर्शनही लांबणीवर टाकण्यात आले आहे.
अंडरवर्ल्डचा होणार सुपडासाफ!!
बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचे जुने नाते आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा गुंतवला जातो, ही चर्चा फार जुनी आहे. गतवर्षी आयकर विभागाने यावर एक पाहणी केली होती. त्यातूनही चित्रपटांत काळ्या पैशांचा वापर होतो, हे तथ्य समोर आले होते. जाणकारांच्या मते, प्रॉडक्शन स्तरापासून काळ्या पैशाचा वापर सुरू होतो. मोठा स्टार नसलेल्या चित्रपटांना कुठलीही बँक सहजासहजी लोन देण्यास तयार होत नाही. अशा स्थितीत स्टुडिओपासून ते डिस्ट्रिब्युटर्स आणि कलाकारांपर्यंत सगळ््यांना काळ्या पैशातूनच मानधन दिले जाते. पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने ही सोपी प्रक्रिया आता अडचणीची ठरू शकते. काळ्या पैशांच्या जोरावर तयार होणाऱ्या लो-बजेट चित्रपटांवर अशा स्थितीत संकटांची वीज कोसळणे साहजिक मानले जात आहे.
‘हे’ सगळे बिनधास्त!
मोदी सरकारच्या पाचशे व हजाराच्या नोटांबद्दलच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ने सिने इंडस्ट्रीमधील काहींनी धसका घेतलाय. पण बहुतांश बडे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मात्र बिनधास्त आहेत. मेगास्टार अमिताभ ते रजनीकांतपासून अनेकांनी मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. जाणकारांच्या मते, सध्या बॉलिवूडमधील बहुतांश व्यवहार अधिकृतपणे होऊ लागले आहेत. म्हणजेच यात ‘ब्लॅक मनी’चा प्रश्नच नाही. अशा सगळ्या ‘व्हाईट मनी’असलेल्यांना मोदी सरकारच्या निर्णयाने काहीही फरक पडणारा नाही. ‘ब्लॅक मनी’ असणाऱ्यांनी मात्र या निर्णयाचा चांगलाच धसका घेतला आहे.