उसन्या अ‍ॅक्शनचा फसलेला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 01:34 IST2016-04-09T01:34:33+5:302016-04-09T01:34:33+5:30

हल्ली कोणतेही चित्रपटांचे चॅनल लावले की, साउथचे हिंदीत डब झालेले चित्रपट लागतात. जबरदस्त अ‍ॅक्शन, खटकेबाज संवाद आणि सुंदर हिरोइन्स हा मुख्य यूएसपी असला, तरी त्यातील बहुतां

The crude experiment of the action | उसन्या अ‍ॅक्शनचा फसलेला प्रयोग

उसन्या अ‍ॅक्शनचा फसलेला प्रयोग

मराठी चित्रपट - प्रियंका लोंढे

हल्ली कोणतेही चित्रपटांचे चॅनल लावले की, साउथचे हिंदीत डब झालेले चित्रपट लागतात. जबरदस्त अ‍ॅक्शन, खटकेबाज संवाद आणि सुंदर हिरोइन्स हा मुख्य यूएसपी असला, तरी त्यातील बहुतांश चित्रपटांत कथा- पटकथेवर केलेले काम जाणवते. मेहनत दिसते; पण साउथच्याच ‘वृंदावनम’ या चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘वृंदावन’मध्ये ही मेहनतच हरविली आहे. त्यामुळे नुसताच चकचकाट आणि हातात काहीच लागत नाही.
आशयघनता ही मराठी चित्रपटांची ओळख असली, तरी मराठीने आता सर्व स्तरांपर्यंतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मसालापट करायलाही हरकत नाही. तरुणाईला भावेल, असे आणखी विषय मांडायला हवेत. हिंदी मालिकांमधील चेहरा राकेश बापटचे मराठीतील पदार्पण आणि साउथच्या ज्येष्ठ दिग्दर्शकापासून ते तंत्रज्ञांपर्यंतची सगळी टीम आणि सगळा खर्चिक मामला पेलण्याची निर्मात्याची ताकद. यामुळे ‘वृंदावन’कडून या अपेक्षा नक्कीच होत्या; मात्र त्या सगळ्या अपेक्षांवर वृंदावन खरा उतरला नाही. मसालापट म्हणूनही जे आकर्षण असते ते यामध्ये दिसत नाही.
चित्रपटाची कथा अनेकदा घासून गुळगुळीत झालेली. ‘खानदान की मर्यादा’ म्हणत मुलीचे लग्न लावण्यासाठी प्रयत्न करणारा बाप आणि उच्च शिक्षणाची मुलीची इच्छा. तिच्या मैत्रिणीने मदतीला पुढे येणे आणि थेट आपल्या बॉयफ्रेंडलाच मैत्रिणीचा बॉयफ्रेंड म्हणून पाठविणे. तो बॉयफ्रेंड म्हणजे क्रिश (राकेश बापट). मैत्रीण पूजाच्या (पूजा सावंत) आग्रहावरून भूमी (वैदेही पुरशुरामी) हिच्या मदतीसाठी जातो. गावचे इनामदार असलेल्या वडिलांची भूमिका महेश मांजरेकर यांनी हातखंडा वठविली आहे. या प्लॅनमध्ये सहभागी प्रेमळ आजोबांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीही काही प्रसंगात धम्माल आणली आहे; पण चित्रपटाचा गाभाच कोठे मनाला फिरत नाही. हिंदी आणि साउथचे चित्रपट पाहणाऱ्या तरुणांनाही राकेश बापटने केलेली अ‍ॅक्शन आणि फाइट सीन्स यांचे कौतुक वाटण्यापेक्षा ते हास्यास्पदच वाटतात. ज्येष्ठ दाक्षिणात्य दिग्दर्शक टी. एल. व्ही. प्रसाद यांच्यासारखा अ‍ॅक्शनपटांचा बादशहा समजला जाणारा दिग्दर्शक असूनही अ‍ॅक्शन जमून आलेली नाही. मराठमोळ्या वातावरणात हा सगळा चकचकाट इडली-बासुंदीमध्ये बुडवून खाल्ल्यासारखाच वाटत राहतो. मोहन जोशी, उदय टिकेकर, शरद पोंक्षे, भारत गणेशपुरे यासारखी कलाकारांची फौज जोडीला असली ्रेआणि त्यांच्या अभिनयाबाबत शंका घ्यायला कोठे जागा नसली, तरी त्यांना वाव मिळत नाही. राकेश, वैदेही आणि पूजा यांच्याभोवती चित्रपट फिरत राहतो. राकेश ‘चॉकलेट बॉय’ म्हणून पाहणे सुसह्य; परंतु चित्रपटाचा प्राण असणाऱ्या अ‍ॅक्शन सीन्समध्ये प्रभावी वाटत नाही. वैदेहीने दाक्षिणात्य नायिकांच्या पावलावर पाऊल टाकत वेगळ्या पद्धतीने रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र मराठमोळ्या वातावरणात ते बटबटीत वाटतात. पूजाची भूमिकाच छोटी असल्याने तिला मर्यादा येतात. संगीतकार अमितराज यांची गाणी मात्र जमून आली आहेत. ओठांवर रेंगाळत राहतात. थिएटरपर्यंत जाऊन हा सगळा उसना चकचकाट पाहायचा की घरी बसून एखाद्या चॅनलवर ओरिजनलचा आनंद घ्यायचा, याचा विचार अ‍ॅक्शनपट आवडणाऱ्यांनीही करायला हवा.

Web Title: The crude experiment of the action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.