चित्रपटांमधून भ्रष्टाचाराचा बिमोड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 16:02 IST2017-05-28T02:06:38+5:302023-08-08T16:02:34+5:30
भ्रष्टाचाराला बळी पडल्यावर आयुष्य किती उद्ध्वस्त होऊ शकते? याचे चित्रण काही चित्रपटांमध्ये करण्यात आले. चला तर मग नजर टाकूयात अशा काही चित्रपटांवर...

चित्रपटांमधून भ्रष्टाचाराचा बिमोड!
- Aboli Kulkarni
आज प्रत्येकच जण भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे. लाच देणं म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासारखंच आहे. भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. नेतेमंडळी, राजकारणी हे याविरोधात भाषणे ठोकण्याव्यतिरिक्त काहीही करत नाहीत. हा भ्रष्टाचार देशातून समूळ नष्ट करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नोटाबंदी’च्या रूपात भ्रष्टाचाराविरोधात एक पाऊल टाकले. त्यामुळे भ्रष्टाचाराला खूप आळा बसला. असाच प्रयत्न बॉलिवूडच्या काही चित्रपटांनीदेखील केला. भ्रष्टाचाराला बळी पडल्यावर आयुष्य किती उद्ध्वस्त होऊ शकते? याचे चित्रण काही चित्रपटांमध्ये करण्यात आले. चला तर मग नजर टाकूयात अशा काही चित्रपटांवर...
राजनीती..
राजकारण आणि भ्रष्टाचार या एका नाण्याच्या दोन बाजू. मात्र, कधी कधी भ्रष्टाचाराचा परिणाम वैयक्तिक आयुष्यावरही जास्त होतो. या चित्रपटात भ्रष्टाचार आणि राजनीती यांच्यामुळे व्यक्तिगत जीवनात दुरावा निर्माण होतो. सत्तेत टिकून राहण्यासाठी मग भ्रष्टाचारी मार्गांचा अवलंब करून ते यशाच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतात. पण, तो मार्ग त्यांना त्यांच्या विनाशाकडे घेऊन जातो.
दो दुणे चार..
महिन्याला २० हजार रुपये कमावणारा शिक्षक पैसा कमावण्यासाठी कशा प्रकारे सोप्या मार्गांचा अवलंब करतो? काही दिवसांतच श्रीमंत होण्यासाठी ते भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारतात. पण, अखेरीस त्यांना समजते, की भ्रष्टाचारापासून चार हात लांब राहणेच चांगले. उत्कृष्ट अभिनय आणि कथानक यांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
दीवार..
अमिताभ म्हणतो, ‘मेरे पास बंगला हैं, गाडी हैं, नोकर हैं, चाकर है, तेरे पास क्या है?’ तेव्हा शशी कपूर म्हणतो, ‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग आठवला का? ‘दीवार’ चित्रपटातील हा डायलॉग खूप फेमस झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर हे दोघे भाऊ असतात. एक पोलीस आॅफिसर बनतो, तर दुसरा भ्रष्टाचारी व्यक्ती बनतो. पण, भ्रष्टाचार करून कमावलेला पैसा फार काळ टिकत नाही, असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला.
खोसला का घोसला..
दिल्लीमध्ये राजकारण आणि भ्रष्टाचार कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकतो? याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘खोसला का घोसला’ चित्रपट. जागेवरून सुरू झालेला वाद आणि भ्रष्टाचार यांच्यामुळे सामान्य व्यक्ती किती भरडला जातो? कॉमेडी आणि ड्रामा असे अनोखे मिश्रण असलेला चित्रपट शेवटी ‘भ्रष्टाचार केल्यावर व्यक्तीची किती वाईट अवस्था होते? असा संदेश देतो.
रण..
‘रण’ हा चित्रपट पॉलिटिकल थ्रिलर आहे. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात दोन मीडिया हाऊसेस आणि भ्रष्टाचारी राजकारणी यांच्यातील वाद, संघर्ष दाखविण्यात आलेला आहे. भ्रष्टाचारामुळे शेवट वाईटच होतो, असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. यात अमिताभ बच्चन, परेश रावळ, सुदीप, रितेश देशमुख, गुल पनाग हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
लगे रहो मुन्नाभाई..
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाचा सिक्वेल म्हणून ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा चित्रपट रिलीज झाला. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात जे तत्त्व आपले स्वातंत्र्यसैनिक पाळत असायचे, ते सध्याच्या भ्रष्टाचारी जगात कुठेतरी हरवले आहे. बिल्डर हॅप्पी सिंग हा सीनियर सिटीझन्ससाठी असलेले घर हिसकावून घेऊ इच्छित असतो. भ्रष्टाचारी मार्गाने कमावलेला पैसा त्याला त्याच्या अधोगतीकडे घेऊन जातो.