नगरसेवक टीमने दिली लोकमत आॅफिसला भेट

By Admin | Updated: March 26, 2017 03:54 IST2017-03-26T03:54:42+5:302017-03-26T03:54:42+5:30

नगरसेवक एक नायक या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता उपेंद्र लिमये आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक कदम

The corporator team visited the Lokmat Afis | नगरसेवक टीमने दिली लोकमत आॅफिसला भेट

नगरसेवक टीमने दिली लोकमत आॅफिसला भेट

नगरसेवक एक नायक या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता उपेंद्र लिमये आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक कदम यांनी नुकतीच लोकमत आॅफिसला भेट देऊन या चित्रपटाबाबत गप्पा मारल्या. नगरसेवक हा चित्रपट नावावरून राजकीय वाटत असला तरी तो चित्रपट राजकीय विषयावरचा नसल्याचे उपेंद्र लिमयेने स्पष्ट केले. त्याने सांगितले, ‘या चित्रपटाची कथा ही राजकीय नाहीये. एका सामान्य कार्यकर्त्याचा नगरसेवक बनण्याचा प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा एक कमर्शिअल सिनेमा असून यात मारामारी, रोमँटिक साँग सगळे काही आहे’.
या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच प्रेक्षकांना नेहा पेंडसे आणि उपेंद्र लिमये यांची जोडी पाहायला मिळणार आहे. नेहासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल उपेंद्र सांगतो, ‘या चित्रपटात माझ्यासोबत सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आम्ही सगळे रंगभूमीवरून आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांना पूर्वीपासून ओळखतो. नेहाने आतापर्यंत अनेक मराठी, दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटांमध्येदेखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ती एक खूप चांगली अभिनेत्री असून ती अतिशय प्रोफेशनल आहे. तिच्यासोबत काम करायला खूपच मजा आली’.
नगरसेवक या चित्रपटात उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, सविता मालपेकर अशा अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. त्यामुळे या दिग्गजांसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक कदम सांगतात, ‘या चित्रपटात एकापेक्षा एक दिग्गज कलाकार आहेत. पण चित्रीकरणाच्या दरम्यान कधीच या लोकांनी मला ते जाणवू दिले नाही. त्यामुळे या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.’ या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीबाबत दीपक सांगतात, ‘सयाजी शिंदे या चित्रपटात काम करणार हे खूप आधीपासून ठरले होते. त्यानंतर उपेंद्रची या टीममध्ये एंट्री झाली. उपेंद्रने त्याच्या भूमिकेविषयी चौकशी तर केली. पण त्याचसोबत या टीममध्ये तांत्रिक जबाबदाऱ्या कोण कोण सांभाळणार याबाबत विचारले. त्याची ही गोष्ट मला खूपच आवडली. या चित्रपटाची इतकी तगडी स्टारकास्ट आहे, हे कळल्यानंतर अनेकांनी मला घाबरवले होते. या चित्रपटातील सगळेच कलाकार नेहमीच प्रचंड बिझी असतात. त्यामुळे यांच्या तारखा जुळवणे कठीण जाईल, असे सगळ्यांना वाटत होते. पण कोणत्याच कलाकाराने तारखांसाठी मला त्रास दिला नाही. तसेच माझ्या कामात हस्तक्षेप केला नाही.’ या चित्रपटाच्या गाण्यांना सध्या प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. याविषयी उपेंद्र सांगतो, ‘या चित्रपटांच्या गीतांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.’

Web Title: The corporator team visited the Lokmat Afis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.