करमणुकीचा गोंधळात गोंधळ!

By Admin | Published: June 19, 2015 10:33 PM2015-06-19T22:33:18+5:302015-06-19T22:33:18+5:30

एकामागोमाग एक अशा घटनांचा सावळागोंधळ हा फॉम्युर्ला मराठी चित्रपटासाठी नवा नाही. एका खोट्यासाठी दुसरे खोटे कारण निर्माण करणे हा फंडा तसा परिचयाचा आहे.

The confusion of amusement! | करमणुकीचा गोंधळात गोंधळ!

करमणुकीचा गोंधळात गोंधळ!

googlenewsNext

- राज चिंचणकर

एकामागोमाग एक अशा घटनांचा सावळागोंधळ हा फॉम्युर्ला मराठी चित्रपटासाठी नवा नाही. एका खोट्यासाठी दुसरे खोटे कारण निर्माण करणे हा फंडा तसा परिचयाचा आहे. मग उरते काय, तर हा गोंधळ कसा मांडला आहे ते पाहणे! ‘वॉण्टेड बायको नं.१’ या चित्रपटाने हे आव्हान पेलत करमणुकीचा गोंधळात गोंधळ सादर केला आहे. काही ठिकाणी चित्रपट सामान्य पातळीवर येत असला तरी डोक्याला काडीचाही ताप होणार नाही याची खबरदारी या चित्रपटाने घेतली आहे. कारण डोके पूर्णत: बाजूला ठेवून हा चित्रपट पाहणे हीच या चित्रपटाची गरज आहे.
दिनकर हा एका कुख्यात गुंडाचा तरुण मुलगा आहे आणि त्याच्या पिताश्रींच्या पश्चातही त्यांचा समाजात दरारा असल्याने त्याचा फायदा दिनकरला होत आहे. दिनकरची एकच व्यथा आहे आणि ती म्हणजे त्याच्या पिताश्रींच्या ‘कर्तृत्वा’मुळे त्याचे लग्नच जमत नाही. पण एकदा त्याची भेट जिममध्ये जाणाऱ्या नेहाशी होते आणि तो थेट तिच्या प्रेमात पडतो. या जिमचा ट्रेनर कपिल याच्या मदतीने दिनकर नेहाला पटवण्याच्या मागे लागतो. दिनकरचा चांगुलपणा लक्षात घेऊन नेहासुद्धा दिनकरवर भाळते. पण इथे एक गडबड होते. नेहाच्या आईचा ज्योतिषावर प्रचंड विश्वास असतो आणि जो कुणी नेहाशी लग्न करेल, त्याचा मृत्यू अटळ असल्याचे एक ज्योतिषी तिला सांगतो. तसेच तिच्यासाठी एखादा घटस्फोटीत अथवा विधुर नवरा शोधण्याचा सल्लाही देतो. या सगळ्याचा परिणाम म्हणून नेहा दिनकरला टाळण्याचा प्रयत्न करत राहते. पण दिनकरचे नेहावर मनापासून प्रेम असते आणि केवळ अंधविश्वासाच्या कारणामुळे तो तिला गमवू इच्छित नाही. मग कपिलच्या साथीने विवाहित असल्याचे दिनकर नाटक करतो आणि त्यासाठी प्रिया नामक बारबालेची या नाट्यात कपिल एन्ट्री घडवून आणतो. पण होते भलतेच, कपिलच्या बायकोला नवऱ्याचा संशय येत राहतो. या सगळ्या सावळ्यागोंधळात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि चित्रपटाच्या अखेरीस अर्थातच ते सुटतात.
राजन अगरवाल यांची कथा आणि अरविंद जगताप यांच्या पटकथेवर दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी एक धमाल कॉमेडी देण्याचा यात जोरदार प्रयत्न केला आहे. तगडी स्टारकास्ट घेऊन त्यांनी केलेली भेळ चवदार झाली आहे. पण काही प्रसंगातले संवाद मात्र बालिश
वाटतात आणि चित्रपटभर पार्श्वध्वनीचा केलेला अतिरेकी वापर मारक ठरतो. त्यामुळे काहीवेळेस संवाद नीट ऐकू येत नाहीत. मकरंद अनासपुरे (दिनकर) व सयाजी शिंदे (कपिल) या दोघांची लोकप्रिय जोडी या चित्रपटात पुन्हा जुळून आली आहे आणि या दोघांनी यात हातचे काहीही राखून न ठेवता धमाल उडवली आहे. यात प्रिया रंगवणारी स्मिता गोंदकर बारबाला दाखवली असली, तरी बारमधले
एक गाणे वगळता तिला भूमिकेसाठी चांगले फूटेज मिळाले आहे. तेजस्विनी लोणारीने नेहाच्या भूमिकेत छाप पाडली आहे. प्रियाचा प्रियकर
म्हणून संजय खापरेची एन्ट्री दमदार आहे. मैथिली वारंग आणि मनोज टाकणे यांनीही त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रसंगांत लक्ष वेधून घेतले आहे.

Web Title: The confusion of amusement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.