विनोदी चवीने रंगलेला धमाल लाफ्टर शो!

By Admin | Updated: April 3, 2016 03:52 IST2016-04-03T03:52:16+5:302016-04-03T03:52:16+5:30

केवळ करमणूकच नव्हे; तर समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करत, समाजपुरुषाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कामही काही नाट्यकृती करत असतात. त्यालाच अनुसरून, मनोरंजनाचा

Comedy Tasty Dazzle Laughter Show! | विनोदी चवीने रंगलेला धमाल लाफ्टर शो!

विनोदी चवीने रंगलेला धमाल लाफ्टर शो!

- तिसरी घंटा : राज चिंचणकर

नाटक - बाबूराव मस्तानी

केवळ करमणूकच नव्हे; तर समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करत, समाजपुरुषाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कामही काही नाट्यकृती करत असतात. त्यालाच अनुसरून, मनोरंजनाचा बाज अंगीकारत धमाल विनोदाचा ‘लाफ्टर शो’ सादर करणारे नाटक म्हणजे ‘बाबुराव मस्तानी’ असे म्हणता येईल. या नाटकात नव्या दमाच्या उत्साही कलावंतांच्या माध्यमातून साकारलेल्या विविध पात्रांनी यथेच्छ धुमाकूळ घालत मनोरंजन करण्याचा उचललेला हा विडा मिठ्ठास चवीने रंगला आहे.
हा ‘लाफ्टर शो’ घडतो तो एका महाराजांच्या दरबारात आणि विशेष म्हणजे या दरबारात हवालदार असलेले आबुराव आणि बाबुराव यांच्या साथीने! महाराजांच्या भोळेपणाचा फायदा उचलत, महाराणीच्या मदतीने राज्य हडप करण्याचा मनसुबा या राज्याच्या प्रधानाचा असतो. पण त्याचे हे कारस्थान आबुराव आणि बाबुराव त्यांच्या अक्कलहुशारीने पदोपदी अडथळे आणत प्रधानाचा डाव हाणून पाडतात. या दोघांचे दरबारात माजलेले स्तोम कमी करण्यासाठी महाराणी बाबुरावाशी एक पैज लावते. या जाळ्यात बाबुराव अडकत जातो; पण जात्याच हुशार असलेला बाबुराव, त्याच्या मस्तानी या प्रेयसीला सोबत घेऊन यातून कसा बाहेर पडतो, त्याची गोष्ट म्हणजे हे नाटक आहे.
बबन गायकवाड यांची लेखणी आणि संजय कसबेकर यांचे दिग्दर्शन ही भट्टी या नाटकात छान जुळून आली आहे. प्रसंगनिष्ठ विनोदाची फोडणी देत प्रत्येक वाक्याला हंशा पिकवणारे संवाद हे या नाटकाचे बलस्थान आहे. कागदावरचा हा ठाशीव पट दृश्यमान करण्याचे आव्हान दिग्दर्शकाने स्वीकारत मस्तीचा तडका या नाटकातून दिला आहे. पण हे करताना नाटक कुठेही रेंगाळणार नाही याचे व्यवधान बाळगत त्यांनी ही गोष्ट वेगाने पळवली आहे. साहजिकच, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळणार नाही याची दक्षताही त्यांनी प्रकर्षाने घेतल्याचे जाणवते.
लेखक व दिग्दर्शकाच्या जोडीला या नाटकातल्या सर्वच कलावंतांनी दिलेली तुफान साथ ही या नाटकाची खासियत म्हणावी लागेल. यात किरण पाटील यांनी मोठ्या झोकात बाबुराव रंगवला आहे. त्यांची ही भूमिका टायमिंग, देहबोली व संवादफेकीचे उत्तम उदाहरण ठरावी. विनोदाचा सेन्स असलेला एक चांगला कलावंत या निमित्ताने रंगभूमीला मिळाला आहे. सचिन माधव यांचा आबुरावसुद्धा फर्मास वठला आहे. या जोडगोळीने नाटकात जी धमाल उडवली आहे, ती प्रत्यक्षच अनुभवण्याजोगी आहे. यशवंत शिंदे (महाराज), सुप्रिया गावकर (महाराणी), सीमा पाटील (मस्तानी), अनिल ठोसर (प्रधान) आदी कलावंतांसह नेपथ्य, प्रकाश, संगीत व नृत्याची रंगतदार साथ या नाटकाला मिळाली आहे. डोक्याला ताप तर कसलाच होणार नाही; फक्त झालाच तर तो हसून हसून तोंड दुखण्याचा होईल याची रुजवात या नाटकाने करून ठेवली आहे.

Web Title: Comedy Tasty Dazzle Laughter Show!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.