स्वातंत्र्यानंतरच्या दहशतवादावर सिनेमांची करडी नजर
By Admin | Updated: August 16, 2015 03:09 IST2015-08-16T03:09:20+5:302015-08-16T03:09:20+5:30
साहित्य हे समाजाचा आरसा आहे असे मानले जाते, साहित्यातून समाजमन प्रतिबिंबित होते. सिनेमाही साहित्यातूनच जन्मलेला आहे. यामुळे प्रेम, रहस्य, रोमांच, सामाजिक जाणीव

स्वातंत्र्यानंतरच्या दहशतवादावर सिनेमांची करडी नजर
साहित्य हे समाजाचा आरसा आहे असे मानले जाते, साहित्यातून समाजमन प्रतिबिंबित होते. सिनेमाही साहित्यातूनच जन्मलेला आहे. यामुळे प्रेम, रहस्य, रोमांच, सामाजिक जाणीव या सर्व गोष्टींसोबतच भारतीय सिनेमांनी देशभक्तीची ज्योतही तेवत ठेवली आहे. याच श्रेणीतला कबीर खान दिग्दर्शित फँटम हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात झळकणार आहे. सैफ अली खान व कतरिना कैफ असलेल्या या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच पाकिस्तानात बॅन घातला आहे, यावरून या सिनेमाची थीम कशी असावी याची कल्पना येते. भारतात दहशतवादी कृत्ये घडवून आणणाऱ्या शेजारी राष्ट्रातील नेत्यांवर निशाणा साधणारा हा चित्रपट आहे. याच क्रमातल्या या काही खास सिनेमांची ही ओळख...खास स्वातंत्र्यदिनानिमित्त.
अ वेनस्डे
मुंबईतील ७/११ रेल्वे बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर आधारित ही एक अद्भुत कथा रंगवली गेली होती. प्रशासन जेव्हा लाचार होते, त्या वेळी दहशतवादाशी लढायला वेगळा मार्ग निवडावा लागतो. नीरज पांडे या दिग्दर्शकाने कमालच केली आहे. नसरुद्दीन शाह व अनुपम खेर यांनी चित्रपटाला वेगळीच उंची दिली आहे.
बेबी
‘मंत्री जी, ये अलग ही किस्म के बंदे होते हैं, थोड़े से खिसके हुए, ये देश के लिए मरते नहीं बल्कि जिंदा रहते हैं’ अक्षय कुमार स्टारर ‘बेबी’ सिनेमातील हा डायलॉग चित्रपटाची पूर्ण थीम सांगून जातो. नीरज पांडे दिग्दर्शित या सिनेमात राणा दुग्गबाती व तापसी पन्नू यांच्या दमदार भूमिका आहेत.
डी डे
गोल्डमॅन नावाच्या एका दहशतवाद घडविणाऱ्याच्या मुसक्या बांधणाऱ्या जवानाची कथा या सिनेमात दाखविली आहे. निखिल अडवाणी यांचा हा सिनेमा दाऊद इब्राहिमची आठवण करून देणारा आहे. अभिनयाच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट चित्रपट होता.
मिशन कश्मीर
मिशन कश्मीरमधून मांडलेला विषय लोकांचे जीवन, त्यांचे भारतीय लष्कराबद्दलची मते, भारतीय लष्कराला कश्मीरमध्ये कशा प्रकारे वागावे लागते हे दाखविण्याचा प्रयत्न यात केला आहे. हृतिक रोशन, संजय दत्त याचा भारून टाकणारा अभिनय व कश्मीरचे सौंदर्य दाखविण्यात विंधू विनोद चोपडा यशस्वी ठरले आहेत.
फना
यशराज बॅनरने तयार केलेल्या या सिनेमात आमीर खान व काजोल यांची जोडी होती. सुरुवातीपासूनच रोमँटिक असलेला हा सिनेमा अचानक दहशतवादाची कथा व आपबिती दाखवितो. कुणाल कोहलीच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट शेवटच्या क्षणी देशप्रेमाची ज्योत जागवितो.