क्रिस प्रॅट अन् कर्ट रसलच्या ब्रोमान्स चर्चा!
By Admin | Updated: April 8, 2017 03:12 IST2017-04-08T03:12:20+5:302017-04-08T03:12:20+5:30
बहुचर्चित ‘गार्डियन्स आॅफ द गॅलेक्सी-२’ मधून क्रिस प्रॅट आणि कर्ट रसल पुन्हा एकदा एकत्र आले

क्रिस प्रॅट अन् कर्ट रसलच्या ब्रोमान्स चर्चा!
बहुचर्चित ‘गार्डियन्स आॅफ द गॅलेक्सी-२’ मधून क्रिस प्रॅट आणि कर्ट रसल पुन्हा एकदा एकत्र आले असून, दोघांमधील ब्रोमान्स (दोन पुरुषांमधील भावनिक संबंध) सध्या हॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपट निर्मितीदरम्यान सुरू झालेला हा ब्रोमान्स खऱ्याखुऱ्या आयुष्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. कारण, याचदरम्यान क्रिसने कर्टला खऱ्या आयुष्यात वडील होण्याविषयी विचारले आहे. हॉलिवूडमध्ये स्वत:चा लौकिक निर्माण केलेला अभिनेता कर्ट रसल आणि सिलवेस्टर स्टॅलोन यांनी ‘गार्डियन्स आॅफ द गॅलेक्सी’मध्ये एकत्र भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांची क्रिससोबतची मैत्री सध्या बहरत आहे. याविषयी कर्ट म्हणतोय की, मी माझी मुलगी केट हडसनकडून क्रिस प्रॅटविषयी ऐकलं होतं. मुळात तिला तो खूप आवडतो. कारण दोघांनीही एकत्र काम केलेले आहे. त्यामुळे मला त्याच्याविषयी उत्सुकता होतीच. त्यामुळे त्याच्यासोबत काम करणे मी संधी म्हणून बघतो. मला क्रिसकडून बरंच काही शिकायला मिळालं आहे. शिवाय आमच्यात चांगलीच मैत्रीही फुलली. त्यामुळे शूटिंगदरम्यान आमच्यात बऱ्याच चर्चा झाल्या. तर दुसऱ्या बाजूला क्रिस म्हणतोय की, मला कर्टसोबत काम करताना खूप मजा आली. जेव्हा मला कर्ट क्वील्सच्या वडिलांची भूमिका साकारतोय असे कळाले तेव्हा मला त्याच्या भूमिकेविषयी खूपच उत्सुकता वाढली होती. ही एक परफेक्ट कास्टिंग होती. त्यामुळेच सर्वांनीच आपल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्या. कर्ट हा गेल्या दशकापासून त्याच्या कलेत वाकबगार आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची संधी म्हणजे आनंदाचाच भाग होता. तो आधी व्यावसायिक बेसबॉल खेळाडू होता. आता तो पायलट असून, एका मुलीचा चांगला बाप आहे. त्याला मासेमारी, शिकारी आणि पर्यटनाची आवड आहे. पुढे बोलताना क्रिस म्हणतोय की, मी त्याला विचारले होते की, तो खऱ्या आयुष्यात माझे वडील म्हणून जबाबदारी सांभाळू शकेल का? मी अजूनही त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचे त्याने म्हटले.