भाई, पिक्चर है...डॉक्युमेंट्री नहीं!
By Admin | Updated: December 16, 2015 01:29 IST2015-12-16T01:29:52+5:302015-12-16T01:29:52+5:30
बाजीरावसारखा अतुलनीय मराठा योद्धा प्रथमच रजतपटावर येतोय... त्याच्या शौर्याबरोबरच अनेक पिढ्यांना त्यांच्या प्रेमकहाणीनंही मोहात पाडलं. त्यांच्यावर पिक्चर बनवायचा

भाई, पिक्चर है...डॉक्युमेंट्री नहीं!
बाजीरावसारखा अतुलनीय मराठा योद्धा प्रथमच रजतपटावर येतोय... त्याच्या शौर्याबरोबरच अनेक पिढ्यांना त्यांच्या प्रेमकहाणीनंही मोहात पाडलं. त्यांच्यावर पिक्चर बनवायचा तर तो तेवढाच ताकदीचा आणि रंजकही हवा. डॉक्युमेंट्री बनवून केवळ लायब्ररीत ठेवायची का, असा सवाल आता ‘बाजीराव-मस्तानी’चे समर्थक करू लागले आहेत.
संजय लीला भन्साली यांच्या ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाच्या निमित्ताने क्रिएटिव्ह आणि सिनेमॅटिक लिबर्टी हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. या चित्रपटाबाबत अनेक वादंग निर्माण झाले आहेत. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी आणि तीही जेव्हा एखाद्या ऐतिहासिक विषयावर चित्रपटाची निर्मिती करताना, कोणत्या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे... अशा उपदेशाचे डोस सध्या भन्साली यांना सोशल नेटवर्किंग साइट्सवर पाजले जात आहेत. मुळात हे सांगताना, ज्या इतिहासाचे दाखले आपण देतो, त्यामध्येदेखील खूप मत-मतांतरे आहेत. बखरकारांनी लिहून ठेवलेल्या नोंदी आणि संदर्भानुसार, त्या इतिहासाचा आपल्या आकलनक्षमतेनुसार अर्थ घेत असतो... ज्याची वैधता कुणालाही तपासून घेता येऊ शकत नाही. अगदी इतिहासकारालादेखील नाही... तो घटनांच्या अभ्यासातून आपली निरीक्षणे नोंदवित असतो... असे असते, तर मग शिवचरित्र घरोघरी पोहोचविणाऱ्या ‘शिवशाहिराला’देखील विरोध झाला नसता.
मुळात ऐतिहासिक विषयांवर चित्रपट काढण्याचे धाडस फक्त भन्साळी यांनीच केले आहे, असे नाही. यापूर्वीही अनेकदा असे प्रयोग झाले आहेत, ज्याला विरोधही झाला आहे, पण ज्यांनी विरोध केला, त्यांनीच त्या कलाकृती उड्या टाकून पाहिल्या आहेत. ‘जोधा-अकबर’चे उदाहरण घ्या! जोधा-अकबर यांच्यामध्ये कधीच प्रेमसंबंध नव्हते, असे म्हटले जाते, पण सत्यता अद्याप गुलदस्त्यातच आहे. या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी झाली होती, पण चित्रपट पडद्यावर अखेर झळकलाच. दूरचित्रवाहिनीवरील ‘झाँसी की रानी’ मालिकेमध्येदेखील ‘मैं मेरी झाँसी नहीं दूंगी’ म्हणणाऱ्या झाशीच्या राणीचे प्रेम फुलविताना दाखवून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एखादी कलाकृती साकारताना दिग्दर्शकाला असे सिनेस्वातंत्र्य घेणे आवश्यक असते. कारण चित्रपट किंवा मालिका हे मनोरंजनाचे माध्यम आहे. तीन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवणे हे वाटते तितके सोपे काम नाही. जे घडले ते तसेच्या तसे दाखविणे असंच जर करायचे झाले, तर मग कुणी चित्रपट कशाला, डॉक्युमेंट्रीच का नाही काढणार? इतिहास माहीत आहे, मग तो तसाच दाखविण्यात अर्थ काय? टीव्हीवर आलेल्या ‘स्वोर्ड आॅफ टिपू सुलतान’ या मालिकेबाबतही वाद निर्माण झाला होता. मात्र, निर्माते संजय खान यांनी कादंबरीवर आधारित मालिका असल्याचे सांगून सर्व वाद टाळले.
कोणत्याही चित्रकृतीच्या थोड्या खोलात गेला, तर कळेल की, त्या एखाद्या गोष्टीसारख्या असतात. सेंद्रीय खताचे फोटो दाखवून, जेवढे समजेल त्यापेक्षा अधिक प्रत्यक्ष शेतावर जाऊन समजाऊन सांगितलेले अधिक कळतं. संजय लीला भन्साळी यांनी वेगळं असं काय केलंय मग? आजच्या युगाशी किंवा भाषेशी सुसंगत होईल, अशी त्यांनी चित्रपटाची काहीशी मांडणी केली आहे.
कोणतीही भव्य ऐतिहासिक संदर्भावर निर्मित करायची असो, सिनेस्वातंत्र्य हे घ्यावेच लागते. मराठीमध्ये दुनियादारी, नीळकंठ मास्तर, लोकमान्य, युगपुरुष आणि आताचा कट्यार काळजात घुसली, अशा चित्रपटांची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. विरोधाला विरोध नसावा, पण वाद टाळण्यासाठी ‘चित्रपटाचा विषय ऐतिहासिक घटनांशी संबंधित असला, तरी दिग्दर्शक या नात्याने पात्रांसंदर्भात एक दिग्दर्शक या नात्याने सिनेस्वातंत्र्य घेत आहे,’ अशी पट्टी लावावी. याबाबत सेन्सॉर मंडळानेच दिग्दर्शकांना सूचना करावी.
मुळात एकदा सेन्सॉर बोर्डाने ‘यू’ सर्टिफिकेट दिल्यावर आणखी कोणत्या ‘सेन्सॉर’ची गरच का पडावी? दिग्दर्शकाला त्याची ‘क्रिएटिव्हिटी’ दाखविण्याची पूर्ण संधी मिळालीच पाहिजे, हा मतप्रवाह आहे. हॉलीवूडच्या अनेक क्लासिक्समध्ये ही क्रिएटिव्हिटी वापरलेली असते, त्याला कलाकृती म्हणून पाहिल्याने वाद होत नाहीत.
...काशीबाई-मस्तानी यांना एकत्रित ‘पिंगा’ घालायला लावला, म्हणून एवढी ओरड केली जात आहे, पण ते गाणे कदाचित त्यांच्या स्वप्नांमधलेदेखील असू शकते. एवढे ओव्हर रिअॅक्ट का केले जात आहे? नि मुळात असे किती लोक आहेत, ज्यांना खरा इतिहास माहिती आहे?
- मृणाल कुलकर्णी, दिग्दर्शक-अभिनेत्री
पुण्यातील शनिवारवाड्यातील गोकुळाष्टमीच्या उत्सवात मस्तानीने आपले नृत्यकौशल्य दाखविले होते. त्या वेळी काशीबाईही उपस्थित होत्या. मात्र, याला पुरावा म्हणता येणार नाही.
- पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ
-------------------------------------------------
focus - milan.darda@lokmat.com