Vishal Dadlani Birthday Special : विशाल ददलानीला होती ही वाईट सवय, ही सवय सोडवायला लागली अनेक वर्षं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 13:20 IST2021-06-28T13:19:19+5:302021-06-28T13:20:54+5:30
विशाल ददलानीचा आज वाढदिवस असून त्याच्या गाण्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावले आहे.

Vishal Dadlani Birthday Special : विशाल ददलानीला होती ही वाईट सवय, ही सवय सोडवायला लागली अनेक वर्षं
विशाल ददलानीचा आज वाढदिवस असून त्याच्या गाण्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावले आहे. त्याने एका व्यसनावर कशाप्रकारे मात केली होती याविषयी त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते.
विशाल ददलानीने आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले असून त्याच्या सगळ्याच गाण्यांवर तरूणाई फिदा असते. शांत तसेच उडत्या चालीच्या गाण्यांना संगीत देण्याची त्याची ख्याती असून त्याने मराठी चित्रपटात गाणे देखील गायले होते. विशाल एकेकाळी दिवसाला 40 हून अधिक सिगारेट पित असे. या सगळ्याचा त्याच्या आवाजावर देखील परिणाम झाला होता. त्याचा आवाज पूर्णपणे खराब झाला होता. नऊ वर्षांपासून तो या व्यसनाच्या आहारी गेला होता. पण त्याने त्याच्या या व्यसनावर मात केली. त्यानेच गी गोष्ट सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याविषयी सांगितली होती.
विशाल ददलानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याने या पोस्टद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले होते की, ऑगस्ट 2019 पासून मी स्मोकिंग पूर्णपणे सोडले. नऊ वर्षं मी दिवसाला 40 हून अधिक सिगारेट ओढत होतो. मी कोणाला सांगितले नाही. पण या सगळ्याचा मला त्रास व्हायला लागला होता. माझ्या आवाजातील मृदूपणा नाहिसा झाला होता. मी गेल्या काही वर्षांपासून या व्यसनापासून मुक्त व्हायचा प्रयत्न करत होतो. पण आता सहा महिने झाले मी सिगारेटला स्पर्श देखील केलेला नाहीये. मला कोणताही त्रास न होता मी आता गाऊ शकेन याचा मला आनंद होत आहे. तुम्ही स्मोकिंग करत असाल तर आताच सोडून द्या... अन्यथा याचे दूरगामी परिणाम तुमच्या शरीरावर होतील.