‘या’ चित्रपटांनी केला संकुचित प्रवृत्तींवर प्रहार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 16:32 IST2018-03-24T11:02:45+5:302018-03-24T16:32:45+5:30
-रवींद्र मोरे बॉलिवूड चित्रपट फक्त मनोरंजनच करत नाही तर बऱ्याचदा समाजाला आरसा दाखविण्याचे कामदेखील करत असतात. समाजात एखाद्या गोष्टीवरुन ...

‘या’ चित्रपटांनी केला संकुचित प्रवृत्तींवर प्रहार !
बॉलिवूड चित्रपट फक्त मनोरंजनच करत नाही तर बऱ्याचदा समाजाला आरसा दाखविण्याचे कामदेखील करत असतात. समाजात एखाद्या गोष्टीवरुन नकारात्मक विचारसरणी किंवा पुर्वग्रह असतो, नेमके त्याच विचारसरणीवर आधारित कथा पडद्यावर दाखविण्याचे काम बऱ्याच काळापासून सुरु आहे. अलिकडेदेखील बॉलिवूड चित्रपटांद्वारा अशाच संकुचित वृत्तींवर प्रहार करण्यात आला. जाणून घेऊया अशा चित्रपटांबाबत...

* पॅड मॅन
अलिकडे रिलीज झालेला अक्षय कुमारचा ‘पॅड मॅन’ हा असा चित्रपट आहे जो एका महत्त्वाच्या विचारसरणीवर आधारित आहे. महिलांची मासिक पाळी ज्यावर कधी खुली चर्चा होत नाही. माहितीच्या अभावाने मुली आणि महिला यावरुन बऱ्याच चुकीच्या संकल्पना आणि अंधश्रद्धेला बळी पडतात. शिवाय सॅनिटरी पॅड वापराबाबतच्या संकुचित वृत्तीमुळे मासिक पाळीदरम्यान स्वच्छते अभावी बऱ्याच शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटात नेमके याच विषयावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यात अक्षय कुमारसह राधिका आपटे आणि सोनम कपूर देखील आहे.

* टॉयलेट : एक प्रेम कथा
२०१७ मध्ये रिलीज झालेल्या टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटात शौचालयाबाबत असलेल्या संकुचित वृत्तीवर प्रहार करण्यात आला आहे. या चित्रपटात भूमि पेडणेकरने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली असून जी घरात टॉयलेट बनविण्यासाठी एक लढाई लढते. चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीनारायण सिंह यांनी केले आहे.

* शुभ मंगल सावधान
आर एस प्रसन्ना दिग्दर्शित या चित्रपटात पुरुषांच्या नपुसंकता या विषयावर फोकस करण्यात आले आहे. या विषयाकडे समाजात चांगल्या दृष्टीने पाहिले जात नाही आणि आजारापेक्षा याकडे कमजोरीच्या दृष्टीने पाहिले आणि समजले जाते. याच विषयावर हा चित्रपट आधारित आहे. आयुष्यमान खुराना आणि भूमि पेडणेकरने यात मुख्य भूमिका साकारली आहे.

* पोस्टर बॉइज
नसबंदी हा विषयदेखील समाजात दबक्या आवाजात बोलला जातो. विशेष म्हणजे नसबंदीवरुन अनेक पुरुषांच्या मनात मोठे गैरसमज आहेत. नेमके याच गैरसमजांवर पोस्टर बॉइज चित्रपटाद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. श्रेयस तळपदे याने पोस्टर बॉइजद्वारा दिग्दर्शनाच्या करिअरला सुरुवात केली आहे. या चित्रपटात सनी देओल आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते.

* लिपस्टिक अंडर माय बुका
अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित 'लिपस्टिक अंडर माय बुर्का' वयस्क महिलांच्या सेक्सुअल लाइफविषयी समाजात पसरलेल्या गैरसमजांवर आधारित आहे. यात रत्ना पाठकच्या भूमिकेद्वारे या विषयाला हायलाइट करण्यात आले आहे.