शापित बंगला... 'निळा प्रकाश'... आणि लेखकाची गोष्ट; भट्टी जमून आलेला 'नीलावेलीचम'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 04:44 PM2023-06-29T16:44:03+5:302023-06-29T16:44:25+5:30

Neelavelicham : विकेंडला OTT वर काही बघायचं असेल तर या 'निळ्या प्रकाशा'मागचं रहस्य जाणून घेण्यासाठी 'नीलावेलीचम' जरूर बघा

The Cursed Bungalow... 'Blue Light'... and the Writer's Story; Read review of 'Neelavelicham' Movie | शापित बंगला... 'निळा प्रकाश'... आणि लेखकाची गोष्ट; भट्टी जमून आलेला 'नीलावेलीचम'

शापित बंगला... 'निळा प्रकाश'... आणि लेखकाची गोष्ट; भट्टी जमून आलेला 'नीलावेलीचम'

googlenewsNext

गायत्री कोळवणकर 

या विकेण्डला ओटीटीवर काय बघू, असा विचार करत असाल, तर तुम्हाला एक चांगला पर्याय सुचवायला नक्की आवडेल. तसा हा सिनेमा काही अगदी नवाकोरा नाही. तो एप्रिलमध्ये रिलीज झालाय, पण अलीकडेच पाहिला आणि त्याबद्दल लिहावंसं वाटलं. सिनेमा मल्याळम आहे. नाव आहे 'नीलावेलीचम' (Neelavelicham) आणि त्याचा नायक  आहे, मॉलिवूडचा सुपरस्टार टोविनो थॉमस. 

कथानक:  सगळीकडून निराश झालेला एक लेखक लिहिण्याचा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून एका छोट्याश्या गावात येतो. कर्म धर्म संयोगाने त्याची राहण्याची सोय गावातील एका झपाटलेल्या शापित बंगल्यात होते. त्या बंगल्याविषयी गावात आधीच आख्यायिका असतात. त्याचे मित्र त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात पण आगाऊ भाडे दिले असल्याने आणि पैशांची चणचण असल्याने लेखकाचा नाईलाज होतो. लेखकाचा बंगल्यात निभाव लागतो का? त्याला तिथे काय सापडतं? याची गूढकथा म्हणजे  'नीलावेलीचम"- 'निळा प्रकाश'!

चित्रपट सुरु झाल्यानंतर काही क्षणातच पुढे काय होणार याची आपल्याला अंधुक कल्पना येते तरी देखील पुढे काय होईल याविषयीचं गूढ आपल्याला चित्रपट पुढे बघत राहण्यास भाग पाडतो. मल्याळम सिनेमा मध्ये पात्रांबरोबरीने २ गोष्टी कायम आपलं अस्तित्व दाखवतात त्या म्हणजे - पाऊस आणि समुद्र!!  कमालीचा सुंदर निसर्ग लाभल्याने प्रत्येक फ्रेम इतकी अप्रतिम दिसते, आणि त्यातही पाऊस बघताना आपल्यामध्ये देखील एक अनोखी हुरहूर दाटून येते. चित्रपटाचा काळ साधारण ७० चा दाखवला असावा असं वाटतं. समुद्र किनाऱ्यावरच छोटंसं गाव, त्यातला तो गूढ बंगला, त्यात राहायला आलेला साधा सरळ होतकरू लेखक, या सगळ्यांना एका माळेत ओवणाऱ्या घटना, सगळं कथानक एका लयबद्ध सुरात पुढे सरकतं आणि मग क्लायमॅक्स मध्ये हे सगळे सूर टिपेला पोहचून या चित्रपटाची सांगता होते. 

शाळेत असताना आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कथा कादंबऱ्या वाचल्या असतील ज्यामध्ये लेखक आपल्या लेखणीला चालना मिळावी म्हणून कुठल्याश्या आडोशाच्या गावी जायचे असा संदर्भ असायचा. सगळीकडे निरव शांतता, फक्त झाडांच्या पानांची सळसळ आणि त्यात कोऱ्या कागदावर भरभर चालणाऱ्या पेनची कुरकुर! 'नीलावेलीचम' बघताना असे काही सीन बघून मन आपोआप त्या जागी स्वतःला बघू लागतं. 

मॉलिवूड मधला टॉपचा कलाकार म्हणून टोविनोने या आधीच आपली जागा बळकट केली आहे. त्याला योग्य ती साथ दिली आहे रोशन मॅथ्यू, रीमा कालिंगाल, शाइन टॉम चाको यांनी. नटापेक्षा स्क्रिप्ट वर जास्त फोकस करण्याचा कल असल्याने कलाकार आपसूकच कथेत समरस होताना आपल्याला दिसतात. उत्तम कथानक, कलाकारांचा सहज अभिनय, सुंदर सिनेमॅटोग्राफी, संगीत देखील कथानकाशी मिळतं जुळतं....त्यामुळे 'नीलावेलीचम' एकदातरी नक्की बघण्यासारखा झाला आहे.

विकेंडला OTT वर काही बघायचं असेल तर या 'निळ्या प्रकाशा'मागचं रहस्य जाणून घेण्यासाठी 'नीलावेलीचम' जरूर बघा. प्राइम व्हिडीओवर इंग्लिश सब-टायटल्ससह तो बघता येईल.

Web Title: The Cursed Bungalow... 'Blue Light'... and the Writer's Story; Read review of 'Neelavelicham' Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.