ही अभिनेत्री करायची सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम, आज आहे एका सुपरस्टारची पत्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 18:17 IST2021-02-11T18:15:33+5:302021-02-11T18:17:11+5:30
या अभिनेत्रीने अनेक बी आणि सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ही अभिनेत्री करायची सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम, आज आहे एका सुपरस्टारची पत्नी
संजय दत्त आणि मान्यता दत्त यांच्या लग्नाला आज १३ वर्षं पूर्ण झाली आहेत. संजय दत्तचे हे तिसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न रिचा शर्मा तर दुसरे लग्न रिया पिल्लईसोबत झाले होते. रिचाचे कर्करोगाने निधन झाले तर रिया आणि संजयचा लग्नाच्या काहीच वर्षांत घटस्फोट झाला.
मान्यताचे खरे नाव आहे दिलनवाज शेख. ती लहानाची मोठी दुबईत झाली. मान्यताला मोठी अभिनेत्री बनायचे होते. बॉलिवूडमध्ये आल्यावर तिने आपले नाव सारा खान ठेवले. फिल्म इंडस्ट्रीत तिला याच नावाने ओळखले जायचे. पण प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तिने आपले नाव पुन्हा बदलले आणि मान्यता ठेवले. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटातील ‘अल्हड जवानी’ या आयटम साँगमुळे मान्यता प्रकाशझोतात आली. मान्यताच्या वडिलांचा दुबईत बिझनेस होता. पण त्यांच्या मृत्यूनंतर घराची संपूर्ण जबाबदारी मान्यतावर आली. याचमुळे ती फॅमिली बिझनेसमध्ये गुंतली.
मान्यताला एक मोठी अभिनेत्री बनायचे होते. पण अनेक प्रयत्न करूनही तिला कुठलाच मोठा चित्रपट ऑफर झाला नाही. यामुळे मान्यताने बी आणि सी ग्रेड चित्रपटांत काम करणे सुरू केले. प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तरी आपल्याला काम मिळेल, अशी तिची अपेक्षा होती. पण असे काहीही झाले नाही.
मान्यता आणि संजय दत्तची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. संजयच्या प्रेमात पडल्यावर मान्यताने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. मान्यताने ‘लव्हर्स लाइक अस’ या सी ग्रेड चित्रपटात काम केले आहे, हे संजयला ठाऊक होते. त्याला ते आवडत नव्हते. त्यामुळेच संजय दत्तने मान्यताच्या या चित्रपटाचे राइट्स २० लाखांत खरेदी केले आणि या चित्रपटाच्या मार्केटमधील सीडी आणि डीव्हीडी हटवण्यासाठी त्याने आपली सगळी शक्ती पणाला लावली.
२००८ मध्ये संजय आणि मान्यताने लग्न केले. त्यावेळी मान्यता २९ वर्षांची होती तर संजय ५० वर्षांचा. २०१० मध्ये मान्यताने शरान आणि इकरा या जुळ्या मुलांना जन्म दिला.