अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) बऱ्याच काळापासून पडद्यावरुन गायब आहे. 'टायगर ३' या सिनेमात ती शेवटची दिसली. सध्या कतरिना संसारात रमली आहे. तर तिचा नवरा विकी कौशल मात्र एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे करत आहे. लवकरच तो आगामी 'छावा' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान कतरिना कैफने सासूसोबत नुकतंच शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यांच्या दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
कतरिना कैफ आता अगदी पंजाबी सून झाली आहे. तिच्या खाण्यापिण्याच्या सवयीही अगदी पंजाबी झाल्या आहेत. विशेष म्हणजे कतरिना विकीसोबत सासू सासऱ्यांच्या घरीच राहते. सासूसोबत तिचा खास बाँड आहे हे अनेकदा फोटोंमधून दिसलं आहे. दरम्यान आज कतरिना सासूसोबत शिर्डीला पोहोचली. तिथे दोघींनी साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी कतरिनाने पंजाबी ड्रेस घातला होता तर डोक्यावर पांढरी ओढणी घेतली होती. तर विकी आई नेहमीच साध्या लूकमध्ये दिसतात तशाच आल्या होत्या. सासू सूनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
दर्शन घेतल्यानंतर कतरिनाने माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. शिवाय दर्शन झाल्यानंतर दोघी पुन्हा मुंबईत परतल्या. यावेळी कतरिना सासूची विशेष काळजी घेताना दिसली. विकीच्या 'छावा' सिनेमाच्या यशासाठीच दोघींनी साईबाबांकडे साकडं घातल्याची चर्चा आहे. कतरिनाचं सासूसोबतचं हे विशेष कनेक्शन पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.