Exclusive: एकाच कॅरेक्टरमध्ये जगलो विविध व्यक्तिरेखा - विनीत कुमार सिंग
By संजय घावरे | Updated: January 9, 2025 10:52 IST2025-01-09T10:51:33+5:302025-01-09T10:52:09+5:30
Vineet Kumar Singh : नेहमीच विविध विषयांवरील चित्रपटांमध्ये विविधांगी व्यक्तिरेखा साकारत रसिकांचे मनोरंजन करणारा विनीत कुमार सिंग प्रथमच आर्मीमॅनच्या भूमिकेत दिसणार आहे.

Exclusive: एकाच कॅरेक्टरमध्ये जगलो विविध व्यक्तिरेखा - विनीत कुमार सिंग
नेहमीच विविध विषयांवरील चित्रपटांमध्ये विविधांगी व्यक्तिरेखा साकारत रसिकांचे मनोरंजन करणारा विनीत कुमार सिंग प्रथमच आर्मीमॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या केदार गायकवाड दिग्दर्शित 'मॅच फिक्सिंग' या चित्रपटासाठी विनीतने आर्मीचा युनिफॅार्म चढवला आहे. या निमित्ताने विनीतने 'लोकमत'शी एक्सक्लुझिव्ह बातचित केली.
'मॅच फिक्सिंग' चित्रपट स्वीकारण्याबाबत विनीत म्हणाला की, या चित्रपटामुळे आर्मीचा युनीफॅार्म परिधान करण्याची संधी मिळाली. भारतीय सैन्य दलाबाबत मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. 'गुंजन सक्सेना'मध्ये हवाई दलाचा गणवेष धारण करण्याची संधी मिळाली होती. यात आर्मी इंटेलिजन्स ऑफिसर अविनाश पटवर्धन हे महाराष्ट्रीयन कॅरेक्टर साकारले आहे. आर्मी मॅन असल्याने जबाबदारीने काम केले. या कॅरेक्टरला मी कुटुंबातील, युनिफॉर्ममधील आणि अंडरकव्हर काम करताना अशा तीन भागांमध्ये विभागले होते. तिन्ही विभागांत याचे तीन वेगवेगळे रंग पाहायला मिळत असल्याने हे कॅरेक्टर साकारताना कितीतरी वेगवेगळी कॅरेक्टर्स जगण्याची संधी मिळाली. या व्यक्तिरेखेला खूप पैलू आणि शेड्स आहेत. त्यामुळे दिग्दर्शक केदार गायकवाड आणि निर्मात्या पल्लवी गुर्जर जेव्हा हा चित्रपट घेऊन आल्या, तेव्हा नकार देण्यासारखे काहीच नव्हते. चॅलेंजेस स्वीकारण्याची आवड असल्याने एका इमेजमध्ये बंदिस्त झालो नाही. रिस्क घ्यायला घाबरत नाही. मराठी चांगले बोलता येत असल्याचा खूप फायदा झाला. केदारही मराठी आहे. चित्रपटात माझ्या पत्नीच्या भूमिकेतही मराठमोळी अनुजा साठ्ये आहे. वास्तवातील माझी पत्नी रुचिरा गोरमारेदेखील मराठीच आहे. त्यामुळे मराठीशी खूप दृढ नाते आहे.
या चित्रपटाबाबत विनीत म्हणाला की, 'मॅच फिक्सिंग' शब्द येताच क्रिकेट डोळ्यांसमोर येते. त्यामुळे 'प्रत्येक मॅच खेळाच्या मैदानात पिक्स केली जात नाही', असे ट्रेलरमध्येच सांगण्यात आले आहे. ही मॅच दोन देशांमधील राजकीय मैदानात कुठेतरी फिक्स होते. त्यामुळे याला पॉलिटीकल थ्रिलर म्हटले आहे. केदार डिओपीही असल्याने त्याचे व्हिज्युअलाझेशन सेन्सही खूप छान आहे. सूचना स्वीकारण्यास नेहमीच तयार असल्याने चांगले काम झाले आहे. तीन देशांमधील सात शहरांमध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सवर हा चित्रपट शूट केला आहे. यातील अंडरकव्हरवाला भाग खूप चॅलेंजींग वाटत होता, पण तो अतिशय सहजपणे केला. युनीफॅार्मवर लक्ष देण्यासाठी सेटवर निवृत्त सेना अधिकारी कर्नन अहलुवालिया असायचे. युनिफॅार्म घातल्यावर मी त्यांच्याकडे जायचो. ते डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळायचे आणि लहान सहान गोष्टींच्या सूचना करायचे.