बॉलिवूड सक्सेस मंत्रा : साऊथ का रिमेक बनाओ और पैसे कमाओ

By Admin | Updated: January 23, 2017 05:02 IST2017-01-23T05:02:26+5:302017-01-23T05:02:26+5:30

दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक बनवणे बॉलिवूडसाठी तशी नवीन गोष्ट नाही. ‘गझनी’, ‘वॉन्टेड’, ‘सिंघम’, ‘राऊडी राठोड’, ‘बॉडीगार्ड’ असे कित्येक

Bollywood Success Mantra: Make a remake of South and earn money | बॉलिवूड सक्सेस मंत्रा : साऊथ का रिमेक बनाओ और पैसे कमाओ

बॉलिवूड सक्सेस मंत्रा : साऊथ का रिमेक बनाओ और पैसे कमाओ

दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक बनवणे बॉलिवूडसाठी तशी नवीन गोष्ट नाही. ‘गझनी’, ‘वॉन्टेड’, ‘सिंघम’, ‘राऊडी राठोड’, ‘बॉडीगार्ड’ असे कित्येक सुपरहिट चित्रपटांची नावे घेता येतील जी साऊथ सिनेमांचे रिमेक आहेत. हिंदी चित्रपट निर्माते सतत एका यशस्वी फॉर्म्युल्याच्या शोधात असतात. एकदा का तो त्यांना मिळाला की, ते तो वापरून एकामागून एक हिट चित्रपट बनवण्याचा सपाटाच सुरू करतात. साऊथकडील चित्रपट हे बॉलिवूडकरांसाठी मागील काही वर्षांपासून सोन्याचे अंडे देणारी कोंबडी बनली आहे.

यावर्षी सध्या तरी पाच हिंदी चित्रपट असे आहेत जे दाक्षिणेतील कथानक उचलून त्यात हिंदीचा मसाला घालून तयार करण्यात आलेत किंवा येणार आहेत. त्यातील पहिला ‘ओके जानू’ हा तमिळ चित्रपट ‘ओके कनमनी’चा (२०१५) रिमेक आहे. बिजॉय नाम्बियारसुद्धा ‘अग्नी नत्चथिरम’ या तमिळ सिनेमाचा रिमेक तयार करीत आहे. प्रकाश राजनेसुद्धा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरण्यासाठी मल्याळम सिनेमा ‘साल्ट एन पेपर’चा रिमेक ‘तडका’ बनवण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना आनंद एल. राय यांच्यासोबत मिळून ‘कल्यान समयल साधम’चा (२०१३) हिंदी रिमेक घेऊन येणार आहेत. सिनेमॅटोग्राफर पी. सी. श्रीराम सुपरहिट तमिळ चित्रपट ‘रेमो’ची हिंदी आवृत्ती तयार करणार आहेत.
हा फॉर्म्युला एवढा यशस्वी कशामुळे?
हा प्रश्न पडणे सहाजिक आहे. पण यामागे साधे-सोपे-सरळ लॉजिक आहे. एक तर अशाच चित्रपटांचे रिमेक बनवले जातात जे हिट झालेले असतात. म्हणजे काय तर ते कथानक लोकांना आवडलेले असते. आता भाषा जरी वेगळी असली तरी भारतीय लोकांची मानसिकता थोड्या-फार प्रमाणात सारखीच असल्यामुळे जे साऊथमध्ये हिट झाले ते हिंदी भाषिक प्रदेशातही हिट होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे ‘जोखीम’ कमी होते. एखादे नव्या धाटणीचे कथानक घेऊन चित्रपट बनवून प्रेक्षकांना आवडेल की नाही अशी भ्रांत करण्यापेक्षा आधीच सिद्ध झालेला फॉर्म्युला वापरणे कधीही परवडणारे असते.
शिवाय इंटरनेट व सोशल मीडियामुळे त्या चित्रपटांची पुसटशी का होईना माहिती प्रेक्षकांना असल्यामुळे उत्सुकतेपोटी हिंदी रिमेक पाहण्याचा त्यांचा कल बनतो. आधीच चर्चा असल्यामुळे अशा सिनेमाच्या प्रोमोशनचा मोठा प्रश्न सुटतो. याचे चांगले उदाहरण म्हणजे अजय देवगणचा ‘दृश्यम’ हा चित्तथरारपट. मूळ मल्याळम ‘दृश्यम’ची आगोदरच खूप चर्चा असल्यामुळे त्याच्या हिंदी रिमेकविषयी लोकांना उत्सुकता होेती. शिवाय कथानकसुद्धा दमदार असल्यामुळे चित्रपट हिट ठरला. हिंदी चित्रपटसृष्टीत नवीन संकल्पना, कथांचा अभाव आणि क्रिएटिव्हिटीचा तुडवडा असल्यामुळेसुद्धा साऊथ रिमेकचा सोपा आणि मधला मार्ग निवडला जातो. म्हणजे एखाद्या तमिळ किंवा तेलुगू सिनेमाचे हक्क विकत घ्यायचे त्यामध्ये हिंदी प्रेक्षकांनुसार छोटे-मोठे बदल करून एखादा लोकप्रिय स्टार कास्ट करायचा. लोकांना आवडतील अशी चार-पाच गाणी आणि विदेशात शूटिंग केले की झाले काम. याच पद्धतीने बॉलिवूडचे काम सुरू आहे. पण प्रत्येक रिमेक हिट होतोच असे नाही. त्यात सर्वात मोठा अडथळा असतो तो हिंदी प्रेक्षकांना रुचेल, कळेल आणि आवडेल असे बदल करण्याचा. जशास तसा मूळ चित्रपटाची कॉपी करून चालत नाही. ज्याने असे केले त्याला याचे नुकसान सहन करावे लागले आहे. शिवाय प्रत्येक हिट दाक्षिणात्य चित्रपटाचे रिमेक बनवलाच पाहिजे असेही नाही. एखादी गोष्ट खरंच पुन्हा सांगण्यासारखी असली तरच त्याचा रिमेक बनवावा.
दुसरी गोष्ट म्हणजे मूळ चित्रपट जर खूप यशस्वी आणि चांगला असेल त्याची बरोबरी करण्याचेही मोठे आव्हान असते. पूर्वीच्या काळापासून हिंदीमध्ये असे साऊथ रिमेक बनवले जात आहेत. परंतु अलीकडच्या काळात इंटरनेटमुळे लोक मूळ चित्रपट पाहून रिमेक त्याच्या तोडीस तोड आहे की नाही याबाबत लगेच निर्णय घेतात आणि सोशल मीडियावर जर नकारात्मक चर्चा सुरू झाली तर होत्याचे नव्हते होऊ शकते. म्हणून मूळ चित्रपटाशी होणारी तुलनादेखील फार घातक ठरू शकते.

Web Title: Bollywood Success Mantra: Make a remake of South and earn money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.