मुंबईत बनतेय बॉलीवूड म्युझियम
By Admin | Updated: December 31, 2014 00:58 IST2014-12-31T00:58:11+5:302014-12-31T00:58:11+5:30
भारतीय चित्रपट उद्योगाने नुकतीच शंभरी पूर्ण केली, त्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत बॉलीवूडचे एक संग्रहालय सुरू होत आहे,

मुंबईत बनतेय बॉलीवूड म्युझियम
पूजा सामंत - मुंबई
भारतीय चित्रपट उद्योगाने नुकतीच शंभरी पूर्ण केली, त्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत बॉलीवूडचे एक संग्रहालय सुरू होत आहे, ज्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. नववर्षात हे चित्रपट म्युझियम चित्रपट रसिकांसाठी खुले होणार आहे.
भारतीय सिनेमाचे अभ्यासक आणि सिनेमा रसिकांची सोय या ‘नॅशनल म्युझियम आॅफ इंडियन सिनेमा’च्या निर्मितीने होईल. हे म्युझियम मुंबईत पेडर रोडवर उभे राहात आहे. केवळ भारतीय चित्रपट आणि मनोरंजनासाठी वाहून घेतलेल्या या म्युझियमचे बजेट तब्बल १२२ कोटी रुपये असून, या म्युझियमचा आस्वाद घ्यायचा असल्यास प्रेक्षकांना पैसे मोजावे लागणार आहेत; अर्थात तिकिटाचे दर नाममात्र असतील. ही वास्तू फिल्म्स डिव्हिजनच्या आवारात आहे. याविषयी अधिक माहिती पुरवली फिल्म्स डिव्हिजनचे डायरेक्टर व्ही.एस. कुंदू यांनी. या संग्रहालयात के.एल. सैगल ते ए.आर. रहमान अशा संगीतकाराची वाद्ये असतील. जुन्या काळातले कॅमेरे, उपकरणे, जुन्या चित्रपटांची पोस्टर्स, कलाकारांची छायाचित्रे अशा अनेक दुर्मीळ वस्तू उपलब्ध असतील.
हिंदीसह मराठी, तेलुगु, कन्नड, बंगाली, गुजराती, मल्याळम् अशा प्रादेशिक चित्रपटांना महत्त्व देण्यात आले आहे. नव्या पिढीला पाहता आले नाहीत, अशा काही चित्रकृतीदेखील खास मागवण्यात आल्या आहेत. काही मूकपटांनाही स्थान देण्यात आले आहे. कुंदूंनी आशावाद व्यक्त करीत
म्हटले, अनेक विदेशी नागरिकही यानिमित्ताने या बॉलीवूड म्युझियमकडे वळतील; आणि परदेशी चलनही मिळेल. ब्रिटनच्या मादाम तुसाँ संग्रहालयातील मेणाच्या पुतळ्यांप्रमाणे काही बॉलीवूड दिग्गजांचे मेणाचे पुतळे इथे असतील.
आपल्या देशातील पहिला मूकपट ‘आलम आरा’च्या प्रिंट्स आगीत भस्मसात झाल्याने त्याची एकही प्रिंट आज अस्तित्वात नाही, पण तसे दुर्दैवी प्रकार आता घडणार नाहीत, अशी उमेद कुंदंूना आहे. या म्युझियमला उमेद आहे देणग्यांची.. कारण फार मोठा खर्च आहे... सिनेसृष्टीतील कितीसे खान-दानी रईस या विधायक कामासाठी पुढे येतात ते २०१५मध्ये कळेलच....