विनयभंग केल्याप्रकरणी मल्याळम अभिनेत्याला अटक
By Admin | Updated: July 10, 2017 21:07 IST2017-07-10T20:55:42+5:302017-07-10T21:07:41+5:30
मल्याळम अभिनेता दिलीप याला सहअभिनेत्रीचे अपहरण आणि विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे.

विनयभंग केल्याप्रकरणी मल्याळम अभिनेत्याला अटक
>ऑनलाइन लोकमत
थिरुअनंतपुरम, दि. 10 - मल्याळम अभिनेता दिलीप याला सहअभिनेत्रीचे अपहरण आणि विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गेल्या दोन आठवड्यापूर्वी पोलिसांनी दिलीप आणि दिग्दर्शक नादिर शहा यांची 12 तास चौकशी केली होती. त्यानंतर दिलीप याची पत्नी काव्या माधवन हिच्या व्यावसायिक ठिकाणांवर छापे टाकले होते. सोमवारी मदुराईमध्ये शूटिंगच्या दरम्यान दिलीप याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संध्याकाळी दिलीप याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, सहअभिनेत्रीचे अपहरण आणि विनयभंग करण्याचे षडयंत्र रचण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. 19 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास कोच्चीजवळ अभिनेत्रीवर हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एप्रिल महिन्यात सुपारी गॅंगविरोधात चार्जशीट दाखल केली होती.
गेल्या महिन्यात कथित गॅंगकडून सुनील कुमार ऊर्फ पल्सर सनी याच्याद्वारे एक पत्र समोर आले होते. या पत्रात सुनील कुमारने दिलीप याच्याकडे 1.5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यावर दिलीपने सुनील कुमारच्याविरोधात ब्लॅकमेल आणि खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणात दिलीप याचाच हात असल्याचे स्पष्ट करत त्याला अटक केली आहे. यावर दिलीप याने माझी इमेज खराब करण्यासाठी अशाप्रकारे काहीजण षडयंत्र रचत असल्याचा आरोप केला आहे.