शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रेंचा जन्मदिन

By Admin | Updated: September 13, 2016 08:29 IST2016-09-13T08:29:17+5:302016-09-13T08:29:17+5:30

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रें यांचा आज (१३ सप्टेंबर) जन्मदिन.

Birthday of classical music singer Prabha Atre | शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रेंचा जन्मदिन

शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रेंचा जन्मदिन

>- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १३ - आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रें यांचा आज (१३ सप्टेंबर) जन्मदिन. शास्त्रीय संगीताचा प्रसार जगभर व्हावा, या उद्देशाने डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन या संस्थेची त्यांनी केलेली स्थापना हे एक महत्वाचे पाऊल ठरले.
 
गायिका, लेखिका, रचनाकार आणि उत्तम शिक्षक असा चतुरस्त्र लौकिक असणारे एक सुविख्यात व्यक्तिमत्व आहे.
 
घरातून त्यांना तसा संगीताचा वारसा नव्हता. त्यांचे आई-वडील दोघेही शिक्षक होते. मात्र आपल्या कन्येमधील गुणवत्ता ओळखून त्यांनी प्रभाताईंना संगीतासाठी प्रोत्साहित केले. उपजत गोड गळा व संगीतातील प्रतिभा त्यांना लाभल्यामुळे ख्याल, ठुमरी,नाटयगीत, भावगीत हे सगळे प्रकार लहानपणातच त्या गाऊ लागल्या. पुण्याचे विजय करंदीकर यांच्याकडे संगीतातील प्राथमिक शिक्षक त्यांनी घेतले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. एस्सी. करुन विधी महाविद्यालयामधून कायद्याची पदवीही त्यांनी संपादन केली. परंतु प्रामुख्याने संगीत हाच त्यांचा ध्यास राहिला.
 
त्यांच्या गायनशैलीवर अमीर खाँ साहेब यांच्या गायकीचा प्रभाव दिसतो. किराणा गायकीचे संस्कार त्यांच्या गायनावर प्रामुख्याने झाले असले तरी इतर संगीतप्रकार त्यांनी वर्ज्य मानले नाहीत. ख्याल गाताना आलाप,सरगम आणि तान या तीन प्रकारांमधून राग उभा करायला त्यांना आवडतो. शब्दोच्चारण लालित्यपूर्ण व रसपूर्ण असावे, एकाच रागातील मोठया आणि छोटया ख्यालांच्या बंदिशीतील आशय एकमेकांना पूरक असावा,असे त्या सांगतात. त्यांनी ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर व त्यांचे प्रतिभावंत बंधू सुरेशबाबू माने यांच्याकडे सातत्याने अनेक वर्षे शिक्षण घेतले. परिणामी त्यांचे गाणे अधिक प्रगल्भ होत गेले.
 
रंगमंचावर गाण्याचा प्रभावी आविष्कार कसा करावा त्याचे तंत्र त्यांनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडून आत्मसात केले.
 त्यांनी ‘शारदा, विद्याहरण,संशयकल्लोळ, मृच्छकटिक’, इत्यादी संगीत नाटकांतून भूमिकाही केल्या. आकाशवाणी नागपूर केंद्र व मुंबई आकाशवाणीवर काही काळ संगीत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी नोकरी केली. त्यानंतर मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या संगीत विभाग प्रमुख म्हणूनही जवळजवळ दहा वर्षे त्या कार्यरत राहिल्या. सौंदर्यसृष्टी, रसिकवृत्ती आणि अचूक पारख करणारी बुध्दिमत्ता यामुळे त्यांचे सांगितिक जीवन समृध्द झाले आहे. अतिशय उंच स्वर,शांत आलापकारी, चतत्कृतिपूर्ण सरगम, दाणेदार स्वच्छ तान, शब्दांची सुरेख फेक यामुळे देश-विदेशातील त्यांच्या मैफली खूप गाजल्या. याखेरीज आकाशवाणी व दूरदर्शनवरील त्यांचे कार्यक्रम आणि त्यांच्या गाण्याच्या स्वतंत्र ध्वनिमुद्रिकाही रसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आजपर्यंत देश-विदेशात हजारांच्यावर मैफली आणि अनेक शैक्षणिक दौरेही त्यांनी केले आहेत. हिंदुस्थानी संगीताचा सर्वार्थाने व सर्वदूर प्रसार व्हावा,यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील राहिल्या आहेत.
 
डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन स्थापना (2000) आणि पुणे येथे‘स्वरमयय गुरुकुलची’ स्थापना करुन, शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या होतकरु विद्यार्थ्यांना त्यांनी विशेष प्रोत्साहन दिले. क्रियात्मक संगीत आणि संगीत संशोधन या दोन्ही गोष्टींचे मार्गदर्शन त्या करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट केली आहे. संगीतविषयक अनेक प्रकल्पांमध्ये, कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांचा खूप मोठा शिष्य परिवार आहे,त्यात परदेशातून आलेले शिष्यही आहेत. प्रत्यक्ष क्रियेबरोबर लेखन, वाचन, चिंतन आणि चर्चाही महत्वपूर्ण असल्याचे त्या आपल्या शिष्यवर्गाला सांगतात. त्यांनी स्वत:च्या स्वतंत्र शैलीत संगीतातील नवे राग निर्माण केले आहेत.
 
त्यांच्या ‘स्वरमयी’ या पुस्तकाला (1989) उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक लाभले आहे. जवळजवळ दोनशेच्यावर बंदिशी त्यांनी लिहिल्या असून ‘स्वराली (1989), अंतस्वर (1994)’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
 
संगीत क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘आचार्य अत्रे ऍ़वॉर्ड (1955), पद्मश्री’ देऊन भारत सरकारतर्फे गौरव (1990), संगीत नाटक अकादमी ऍ़वॉर्ड (1991), भारत सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार (2002), इत्यादी अनेक प्रतिष्ठेचे मान-सन्मान त्यांना मिळाले आहेत. स्वरसागर संगीत पुरस्कार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा ‘स्वररत्न’ पुरस्कार, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ऍ़वॉर्ड, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, इत्यादी पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. हे मान-सन्मान व पुरस्कार त्यांच्या समृध्द संगीत कारकीर्दीची साक्ष देऊन जातात.
 
सौजन्य : इंटरनेट 
 

Web Title: Birthday of classical music singer Prabha Atre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.