ज्येष्ठ गायिका मा.माणिक वर्मा यांची जयंती

By Admin | Updated: May 16, 2017 16:17 IST2017-05-16T09:38:03+5:302017-05-16T16:17:05+5:30

अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा, क्षणभर उघड नयन देवा, तुझा नि माझा एक पणा, निघाले आज तिकडच्या घरी, झुलवू नको हिंदोळा... अशा अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या मा.माणिक वर्मा

The birth anniversary of veteran singer Maaik Verma | ज्येष्ठ गायिका मा.माणिक वर्मा यांची जयंती

ज्येष्ठ गायिका मा.माणिक वर्मा यांची जयंती

>- अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा,  क्षणभर उघड नयन देवा, तुझा नि माझा एक पणा, निघाले आज तिकडच्या घरी, झुलवू नको हिंदोळा... अशा अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या मा.माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. माणिक वर्मा यांचा जन्म १६ मे १९२६ रोजी पुणे येथे झाला. सेवासदन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीतं, भजनं नेहमीच कानांवर पडत. त्यांच्या आईनंच त्यांचं गाणं जागवलं आणि मग त्यांच्या अवघ्या आयुष्याचंच सुंदर गाणं झालं.
 
सुरुवातीच्या काळात गाणं सादर करताना इतरांचं अनुकरण केलं जाई. पण मा.माणिक वर्मा यांच्या आई मा.हिराबाई दादरकर ""यांनी त्यांचं गाणं ख-या अर्थाने विकसित केलं आणि नंतर त्या किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. त्यातून मग गणेशोत्सवातून सुगम संगीताचे कार्यक्रम होऊ लागले. पदवी प्राप्त केल्यानंतर शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण सुरू झालं. 
 
सुरुवातीला जगन्नाथबुवा पुरोहित, नंतर इनायत खाँसाहेब, ‘भारत गायन समाज’चे अप्पासाहेब भोंपे यांसारख्या दिग्गजांकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर सुरेशबाबू माने यांनी माणिकताईंचा किराणा घराण्याशी परिचय करून दिला. दरम्यान पुण्यासारख्या चोखंदळ रसिकांसमोर शास्त्रीय संगीत सादर करण्याची त्यांना संधी मिळाली. पुढे तर सुरतलाही त्यांनी आपली कला पेश केली. यानंतर मात्र सार्वजनिक कार्यक्रम, मैफिली यांची मालिकाच सुरू झाली. 
 
लांबलांबचे दौरे आखले जाऊ लागले आणि मा.माणिक वर्मा हे नाव संगीतविश्वात गाजू लागले. गाण्यांच्या मैफिलींसाठी हिराबाई बडोदेकर तर चित्रपट संगीतासाठी सुधीर फडके त्यांचे आदर्श होते. किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता त्याचबरोबर इतर घराण्यांचीही गायकी आत्मसात करून त्यांनी स्वत: ची स्वतंत्र शैली निर्माण केली. किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपटगीतांना स्वरसाज चढवला. ग. दि. मांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत लाभलेल्या "गीत रामायण"चे साप्ताहिक प्रक्षेपण पुणे आकाशवाणीवर सुरू झाले, तेव्हा त्यात मा.माणिक वर्मांनी अनेक गीते गायली. ती लोकप्रियही झाली. मराठी भाषेतील अनेक गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. चेहऱ्यावर मंद स्मित असे आकर्षक व घरंदाज व्यक्तिमत्व लाभलेल्या माणिक वर्मांनी अनेक कठीण चालींची गाणी इतक्या सहजतेने गायली की घराघरातील बायका ती गाऊ लागल्या. 
 
"घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा", हे "ळ"चा प्रास असलेले तशाच नागमोडी वळणाचे गाणे गदिमांनी रचले व फडकेंनी स्वरबद्ध केले. ते तितक्याच लडिवाळ आवाजात माणिक वर्मा यांनी गायलेलुद्धा. भक्ति व भावगीतांमध्ये रमलेल्या मा.माणिक वर्मा यांनी एकच लावणी गायली. गदिमांची "जाळीमंदी पिकली करवंद" ही लावणी "पुढचं पाऊल" या चित्रपटात हंसा वाडकर यांच्या अदाकारीसह चित्रित झाली. 
 
मा.बाळ कोल्हटकरांच्या "वाहतो ही दुर्वांची जुडी" या नाटकातील त्यांनी गायलेले "आली दिवाळी दिवाळी" हे ह्रदयस्पर्शी गीत खूपच गाजले होतं.  माणिकबाईंचा विवाह फिल्म्स डिव्हिजनमधील मा.अमर वर्मा यांच्याशी झाला. लग्नाची बातमी जेव्हा संगीत जगतात पसरली, तेव्हा काहींनी माणिकताईंचे अभिनंदन केले. काहींनी नाराजी व्यक्त केली. पण या विवाहामुळे जी खळबळ माजली होती,  त्यावर पु. लं.च्या एका वाक्याने फुलांची चादर पसरली. ‘अमर वर्मा यांच्याशी माणिक दादरकर यांचा विवाह होत आहे,’ असे पु.लं.ना जेव्हा सांगण्यात आले. 
 
तेव्हा पु.ल. पटकन म्हणाले, ‘माणिकने वर्मावर घाव घातला की..’ आणि मग माणिक दादरकर-अमर वर्मा यांच्या लग्नाच्या पत्रिका निघाल्या. त्या पत्रिकांवर त्या काळाला अनुसरून त्या काळातील समाजाची दैवते असलेले महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांचे फोटो होते. मा.माणिक वर्मा यांची चार रत्न म्हणजे राणी वर्मा, भारती आचरेकर वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश...राणी वर्मा यांनी आईचा म्हणजे मा.माणिक वर्मा यांच्या संगीताचा वारसा पुढे चालवला तर वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर अभिनयाच्या क्षेत्रात चमक दाखवताना दिसल्या. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी. 
१९७४ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला. मा.माणिक वर्मा यांच्या स्वरांचा सन्मान संगीत नाटक अकादमी पुरस्कार, यांसारख्या पुरस्कारांनी करण्यात आला. मा.माणिक वर्मा यांनी आयुष्यभर सुरेल आराधना केली आणि त्यांचा हा स्वर अमृताहूनी गोड असाच होता, आहे आणि रसिकांच्या हृदयात चिरंतन राहील. दर वर्षी रंगशारदा महोत्सव योजने अंतर्गत १९९८ सालापासून तीन दिवसांचा मा.माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो. मा.माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. मा.माणिक वर्मा यांचे ‘किती रंगला खेळ’  हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या स्वरांइतकेच आनंद देते. मा.माणिक वर्मा यांचे १० नोव्हेंबर १९९६ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.माणिक वर्मायांना आदरांजली.
मा.माणिक वर्मा यांची वेबसाईट
http://www.manikvarma.com/about_marathi.html
 मा.माणिक वर्मा यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=EfM1M0SW-DA
"जाळीमंदी पिकली करवंद" ही लावणी
https://www.youtube.com/watch?v=C4x27eCejpQ
हसले मनी चांदणे
https://www.youtube.com/watch?v=0cRSC3AAdHU
 
(सोर्स - इंटरनेट)

Web Title: The birth anniversary of veteran singer Maaik Verma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.