'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:39 IST2025-08-13T11:39:33+5:302025-08-13T11:39:58+5:30
संजय लीला भन्साळींच्या ऑफिसमध्ये ही ऑडिशन झाली होती. यात भार्गवी निवड झाली नाही पण तिला ऑडिशन लक्षात राहिली.

'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
मराठी अभिनेत्री, नृत्यांगना भार्गवी चिरमुलेने (Bhargavi Chirmule) अनेक मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'वहिनीसाहेब' ही तिची गाजलेली मालिका. 'वन रुम किचन', 'संदूक', 'आयडियाचा कल्पना' या काही सिनेमांमध्येही ती दिसली. या भार्गवीने अक्षय कुमारचा सिनेमा 'राऊडी राठोड'साठीही ऑडिशन दिली होती. संजय लीला भन्साळींच्या ऑफिसमध्ये ही ऑडिशन झाली होती. यात भार्गवी निवड झाली नाही पण तिला ऑडिशन लक्षात राहिली. याचं कारण तिने सांगितलं आहे.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत भार्गवी चिरमुले म्हणाली, "संजय लीला भन्साळींच्या ऑफिसमधून मला ऑडिशनसाठी फोन आला होता. तेव्हा ते अक्षय कुमारचा 'राऊडी राठोड' सिनेमाची निर्मिती करणार होते. मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा तिथे देवदास सारख्या गाजलेल्या सिनेमांचे पोस्टर्स बघून मी भारावून गेले होते. मनात आलं की आपली निवड होवो ना होवो पण मला आज या ऑफिसमध्ये येता आलं हेच खूप आहे. भन्साळी स्वत: ऑफिसमध्ये होते. मी ऑडिशन दिली. पण माझी होऊ शकली नाही."
ती पुढे म्हणाली, "पण मला त्या ऑडिशन प्रक्रियेचं खूप कौतुक वाटलं. ज्यांनी ज्यांनी ऑडिशन दिल्या त्या आम्हा सर्वांनाच जी वागणूक मिळाली ती कौतुकास्पद होती. माझ्या एक तास अलीकडे आणि पलीकडे दुसऱ्या कोणालाही बोलवलं नव्हतं. प्रत्येकाला वेगवेगळी वेळ दिली होती. मला तिथे पोहोचल्यावर पाणी, चहा/कॉफी विचारलं. नंतर मला स्क्रिप्ट दिली. वाक्य ओके आहेत ना? असं त्यांनी विचारलं. मग त्यांनी एक अभिनेताही तिथे बसवला होता ज्याच्यासोबत आम्ही आमचे डायलॉग बोलणार आहोत. मी त्याच्याबरोबर सीन वाचला. नंतर दिग्दर्शक आला त्याने काही सूचना केल्या. हे सगळं खूप शांतपणे कोणतीही घाई न करता, कलाकाराला त्याचा वेळ देऊन केलं गेलं. मला तर तो आवर्जुन म्हणाला की, 'तुम्ही तर मराठी थिएटरमधून आला आहात त्यामुळे तुम्हाला तर डायलॉग पाठ करणं कठीण नाही.' मी म्हटलं, 'हो'. डायलॉग भावनिक होते पण ते म्हणाले की भावना दाखवा पण रडू नका. आणि दुसऱ्या वेळी आपण रडतानाचा एक सीन करु असं त्यांनी सांगितलं. कलाकाराचा कम्फर्ट झोन ओळखून त्यांनी सगळं केलं. सिनेमातली भूमिका छोटी असो किंवा मोठी त्यांनी कलाकाराला आदर दिला हे महत्वाचं आहे. नंतर त्यांनी ऑडिशन भन्साळींना पाठवली. त्यांनी निरोप दिला की, 'धन्यवाद, जे होईल ते आम्ही सांगूच'. काही दिवसांनी मला तुम्ही शॉर्टलिस्टेड आहात असा निरोप मिळाला. तसंच अमुक अमुक तारखा रिकाम्या ठेवा असंही त्यांनी सांगितलं. पुन्हा काही दिवसांनी फोन आला की, 'तुमची निवड झालेली नाही. त्यामुळे तारखा रिलीज करु शकता. तुमची ऑडिशन आमच्याकडे आहे त्यामुळे पुन्हा काही असेल तर आम्ही नक्की कळवू. हे मला खूप आवडलं. नाहीतर कोणी फोन करुन असं सांगत नाही. आपणच समजून घ्यायचं की आपल्याला फोन आला नाही म्हणजे आपलं झालेलं नाही. म्हणून मला ही ऑडिशन लक्षात राहिली."