अपघातानेच अभिनेत्री बनले
By Admin | Updated: March 27, 2017 05:09 IST2017-03-27T05:09:36+5:302017-03-27T05:09:36+5:30
आपण अपघाताने अभिनेत्री बनलो असून या क्षेत्रात नसते तर कदाचित शिक्षिका बनली असते हे विधान आहे अभिनेत्री नीती टेलर हिचं

अपघातानेच अभिनेत्री बनले
- Suvarna Jain -
आपण अपघाताने अभिनेत्री बनलो असून या क्षेत्रात नसते तर कदाचित शिक्षिका बनली असते हे विधान आहे अभिनेत्री नीती टेलर हिचं. छोट्या पडद्यावरील कैसी हैं ये यारीयाँ या मालिकेत नंदिनी ही भूमिका साकारत लोकप्रिय बनलेली अभिनेत्री म्हणजे नीती. छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून नीती घराघरातील ओळखीचा चेहरा बनली आहे. सध्या ती 'गुलाम' या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली आहे. याचनिमित्ताने तिच्याशी साधलेला हा संवाद.
गुलामसारख्या डेली सोपमध्ये काम करावं असं का वाटलं? तेसच या मालिकेतील भूमिकेसाठी दिशा परमारच्या जागी तुझी निवड झाली. याबाबत तुला काय म्हणायचे आहे ?
गुलाम ही एक पूर्ण वेगळी मालिका आहे. त्यामुळे हा वेगळा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे. मालिकेच्या शुटिंगचंही वेळापत्रक मोठं मोठं होतं आणि ठराविक वेळेत काम पूर्ण करण्याचाही दबाव होता. मात्र हे सगळं मी सध्या एन्जॉय करते आहे. इथल्या कामाची पद्धत खूप निराळी असून अपेक्षासुद्धा वेगळ्या आहेत. या सगळ्या गोष्टींची मी सवय करुन घेतेय. सुदैवाने लेखकाच्या कल्पनेतील व्यक्तीरेखा साकारत असताना त्याला माज्या सहकलाकारांकडूनही तितकाच पाठिंबा मिळत आहे. या मालिकेच्या निमित्ताने मिळालेली संधी माज्यासाठी खूप मोठी आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा हा क्षण आहे असे मला वाटते.या भूमिकेसाठी माज्याऐवजी दिशा परमारची निवड केली की नाही याबाबत मला कोणतंही भाष्य करायचं नाही. हे कोणत्याही कलाकाराबाबत होऊ शकतं. उद्याला माज्याबाबतीसुद्धा हे घडण्याची शक्यता आहे. माज्या जागी दुस-या एखाद्या कलाकाराला संधी मिळू शकते. यामुळे नैराश्य येणं हे स्वाभाविक आहे. मात्र त्यावेळी खचून जाऊ नये असे मला वाटते. कारण प्रत्येक व्यक्तीरेखेची एक मागणी असते. या मालिकेसाठी निर्मात्यांना एक निरागस चेहरा आणि नीडर अशी कलाकार हवी होती. कदाचित त्यामुळेच निमार्ता-दिग्दर्शकांनी या मालिकेसाठी माझी निवड केली असावी.
एखाद्या कलाकाराच्या जीवनात निर्माण झालेला वादंग तू कसा हाताळशील?
खरं सांगू का? अफवा आणि गॉसिप यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी मी सोशल मीडियापासून दूरच राहते. मात्र कधी कधी जेव्हा मला ते असह्य होते त्याचवेळी त्यावर प्रतिक्रिया देते. एरव्ही अशा अफवा आणि वादांना फुटकळ प्रसिद्धी मिळू नये म्हणून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे असे मला वाटते.
अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुला कुणापासून मिळाली ?
या क्षेत्रात एंट्री करण्यासाठी माझं प्रेरणास्थान तसं पाहिलं तर कुणीच नाही. मुंबईत मी फक्त शिकण्यासाठी आले होते, अभिनेत्री बनण्यासाठी नाही. या क्षेत्रात मी अपघाताने आले आणि अपघातानेच अभिनेत्री बनले एवढंच मी सांगू शकते.माझं काम हे अभिनय करणं आहे आणि त्याचा मी सध्या आनंद घेतेय.
तू अभिनेत्री बनली नसती तर? कोणते क्षेत्र प्रोफेशन म्हणून निवडले असते?
अभिनयाच्या क्षेत्रात मी अपघाताने आले हे तुम्हाला माहितीच आहे.त्यामुळे अभिनयात नसते तर कदाचित मी शिक्षिका बनले असते. कारण मला लहान मुलं खूप आवडतात. त्यामुळे त्यांना शिकवण्याचा आनंद घेण्यासाठी नक्कीच मी शिक्षिका बनली असते.
छोट्या पडद्यासोबतच रुपेरी पडद्यावर एंट्री मारण्याचं काही स्वप्न?
सध्या मी मालिका करते आहे. मालिकेत काम करण्याचा मी आनंद घेते आहे. मला तर फक्त मालिकांमध्येच काम करण्यात विशेष रस आहे. मालिकांमध्ये ब-याच संधी आहेत. त्यामुळे सध्या तरी सिनेमात काम करण्याचा कोणताही विचार नाही.