करिना अर्जुनच्या ‘की अॅण्ड का’ चित्रपटाला सरासरी प्रतिसाद
By Admin | Updated: April 5, 2016 01:28 IST2016-04-05T01:28:08+5:302016-04-05T01:28:08+5:30
विवाहानंतर घरगुती जबाबदाऱ्या सांभाळणारा तरुण आणि तरुणी यांच्या नात्यातील कथानक सांगणाऱ्या ‘की अॅण्ड का’ या दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या चित्रपटाला सरासरी प्रतिसाद मिळत आहे

करिना अर्जुनच्या ‘की अॅण्ड का’ चित्रपटाला सरासरी प्रतिसाद
विवाहानंतर घरगुती जबाबदाऱ्या सांभाळणारा तरुण आणि तरुणी यांच्या नात्यातील कथानक सांगणाऱ्या ‘की अॅण्ड का’ या दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या चित्रपटाला सरासरी प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या वीकेंडला बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने २५ कोटींचा व्यवसाय केला आहे. प्रदर्शनाच्या दिवशी या चित्रपटाने ७.३० कोटी, शनिवारी ८.४१ कोटी आणि रविवारी ९.५२ कोटींचा व्यवसाय केला.
चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार महानगरात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अर्जुन कपूर आणि करिना कपूरचे हॉट सीन चित्रपटात आहेत. त्यामुळे तरुण प्रेक्षक वर्ग मिळत असला तरी कथानक दुबळे समजले जात आहे. ५५ कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर तोटाच होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पण, तोटा
नेमका किती होणार? ते पुढील आठवड्यात स्पष्ट होईल. पहिल्या आठवड्यात चित्रपट ३२ ते ३५ कोटींचा व्यवसाय करू शकतो असा अंदाज आहे.
यापूर्वीच्या चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर निर्माता जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसमला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. पहिल्या चार दिवसांत १६ कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात २२ कोटींपर्यंत मजल मारली आहे. अर्थात या चित्रपटाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
करण जोहर कंपनीच्या कौटुंबिक चित्रपटाचा कपूर अॅण्ड सन्सचा व्यवसाय ७० कोटींवर पोहोचला आहे. येत्या शुक्रवारी कोणताही मोठ्या बॅनरचा चित्रपट प्रदर्शित होत नाहीए. नाना पाटेकर, इरफान आणि प्रियंका चोप्रा यांचा डबिंग असलेला चित्रपट ‘मोगली की कहानी’ प्रदर्शित होत आहे. हा जंगलबुक हिंदी आणि इंग्रजीत येत आहे. महानगरात या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.