लेखिका व समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांचा वाढदिवस
By Admin | Updated: August 5, 2016 10:48 IST2016-08-05T10:44:05+5:302016-08-05T10:48:23+5:30
मराठी भाषेतील स्त्रीवादी लेखिका व समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांचा आज (५ ऑगस्ट) वाढदिवस

लेखिका व समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांचा वाढदिवस
संजीव वेलणकर
पुणे, दि. ५ - मराठी भाषेतील स्त्रीवादी लेखिका व समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांचा आज ( ५ ऑगस्ट) वाढदिवस
मा.विजया राजाध्यक्ष यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात व एस्.एन्.डी.टी. विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. कथाकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजया राजाध्यक्ष यांनी ललित लेखनाला सुरवात केली ती मानिनीतील सदरातून. विजया राजाध्यक्ष यांनी पहिले सदर मानिनीमध्ये लिहिले. त्याचे नाव होते नित्य नवा दिस जागृतीचा. सहा दशकं अविरतपणे लेखन करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक विजया राज्याध्यक्ष यांची प्रामुख्यानं ओळख आहे ती कथालेखिका आणि समीक्षक म्हणून. १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अधांतर’ या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे तब्बल १९ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची कथा प्रामुख्यानं मध्यमवर्गीय परिवेषातलं स्त्रीजीवन चित्रित करण्यावर भर देते.
प्रसिद्ध लेखिका शशी देशपांडे यांची "द लॉंग सायलेन्स' ही कादंबरी व स्त्रीवादी ज्यू कवयित्री एरिका जॉंग यांचा "माय ग्रॅंडमदर ऑन माय शोल्डर' या लेखाचा संदर्भ घेत विजया राजाध्यक्ष यांनी स्त्री असणे हेच खरे आव्हान असल्याचे म्हटले आहे. स्त्रीने स्वतंत्र होणे म्हणजे पुरुषांचे न शोभणारे अनुकरण करणे नव्हे, तर आपल्याला आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांबद्दल बोलणे- लिहिणे, व्यक्त होणे, ते मौनात न जिरविणे म्हणजे खरी स्त्री असणे. मागच्या पिढीतील स्त्रियांचे सामर्थ्य हे मौन पाळण्यातच होते. त्याचा पगडा आजच्या स्त्रीवरही दिसतो. त्यावर मात करून स्वत्व जपले पाहिजे. मात्र कधी कधी मौनातूनच आत्मसंवादाची वाट सापडते, असे त्या एका लेखात म्हणतात.
स्वयंपाकातही एक सर्जनशील आनंद लपलेला असतो आणि याची जाणीव प्रत्येक स्त्रीला असते, म्हणूनच स्त्रीमुक्तीच्या काळातही पाककृतीवरील पुस्तकांची निर्मिती, खप वाढला. स्त्रियांना स्वयंपाक करणे ही मुक्ती वाटते. कारण त्यात स्वयं असतो, असे सांगत त्यांनी स्वतःच्या स्वयंपाकाविषयी अतिशय रंजकतेने लिहिले आहे.
आपल्या लिहिण्याच्या व न लिहिण्याच्या अनुभवांविषयी मा.विजया राजाध्यक्ष यांनी एका ठिकाणी लिहिले आहे. लेखिकापण मी घरात फारसे स्वीकारले नाही; पण इतर महिलांप्रमाणेच रुटीन सुरू असताना वाचन व लेखन मात्र सुटले नाही. एकदा त्यांना छोटासा अपघात झाला आणि लिहिणारा उजवा हातच निकामी झाला. त्या काळात आपल्याला लिहिता आलेच नाही तर, या शंकेने त्यांच्या मनात काहूर उमटले. एखाद्या कलावंताची मूळ शक्तीच नाहीशी झाली तर त्याची काय अवस्था होत असेल, याची जाणीव त्यांना त्या काळात झाली. आपल्या आयुष्यात एक शिशिर येऊन गेला, सुदैवाने त्याचे पुरागमन झाले नाही, मात्र तो अनुभव मोलाचा होता, असे त्या म्हणतात.
ललित लेखन हे लवचिक, मुक्त असते. कधी ती कथा असते, कधी प्रवासवर्णन, कधी व्यक्तिचित्र तर कधी समीक्षा. त्यामुळेच या वाटेने अजून जावेसे वाटते, या वाटेने जाताना मन नेहमीच ताजेतवाने राहिले, असे विजया राजाध्यक्ष म्हणतात. मराठी भाषेतील समीक्षक व ललितलेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे विजया राजाध्यक्ष यांचे ते पती होत.
लोकमत समूहातर्फे विजया राजाध्यक्ष यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.