औरंगाबादकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा

By Admin | Updated: March 6, 2017 03:13 IST2017-03-06T03:13:20+5:302017-03-06T03:13:51+5:30

घोडा गाडीतून दाखल झालेले वर-वधू, अशा दिमाखदार विवाह सोहळ्याने गुरुवारी (दि. २) औरंगाबादकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले

Aurangabadkar's eye-trimming ceremony | औरंगाबादकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा

औरंगाबादकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा


औरंगाबाद : सोनेरी असा भव्य दिव्य राजवाड्याच्या प्रतिकृतीचा व्यासपीठ, फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतीषबाजी आणि आकर्षक अशा घोडा गाडीतून दाखल झालेले वर-वधू, अशा दिमाखदार विवाह सोहळ्याने गुरुवारी (दि. २) औरंगाबादकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. निमित्त होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आ. संतोष दानवे आणि प्रा. राजेश सरकटे यांची कन्या रेणू सरकटे यांच्या विवाह समारंभाचे. या शाही सोहळ्यास केंद्र व राज्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह राजकीय, कला, साहित्य, संगीत, चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटींनी हजेरी लावत वर-वधूस शुभेच्छा दिल्या. खा. दानवे यांचे राजकीय क्षेत्रात वजन तर त्याचे व्याही असलेले प्रा. राजेश सरकटे यांचे संगीत क्षेत्रात मोठे नाव. बीड बायपास रोडवरील जबिंदा लॉन्सवर हा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. गेल्या आठवडाभरापासून या विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती. व्यासपीठ जेवढे भव्य होते तेवढेच मुख्य प्रवेशद्वारही भव्य होते. ‘न भूतो न भविष्यति’ अशा सोहळ्याचे हजारो वऱ्हाडी साक्षीदार म्हणून उपस्थित राहिले. हा
सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावडेकर, भाजप ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांच्यासह केंद्र आणि राज्यातील बहुतांश मंत्र्यांनी उपस्थिती लावली. राज्यातील अनेक आमदार, खासदार, भाजपचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. याशिवाय खा. दानवे यांच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात विभागलेल्या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पाहुणेमंडळींनी मोठी वर्दळ दिसली.
>वऱ्हाडींसाठी जेवणाचा मेनूही शाही
या विवाह सोहळ्यात वऱ्हाडींसाठी ठेवण्यात आलेला जेवणाचा मेनूही शाही ठरला. ग्रामीण वऱ्हाडी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष मेनू ठेवण्यात आला होता. सुमारे २५ हजार ग्रामीण वऱ्हाडींसाठी आलू मटर, चणा मसाला, शेव, बुंदी, पुरी, चपाती, दाल फ्राय, जिरा राईस, चटणी असा मेनू होता. तर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी दालफ्राय, जिरा राइस, व्हेज मंचुरियन, रगडा, कश्मिरी पुलाव, आलू मटर, बैंगन मसाला, पनीर मसाला, तंदूर, भाकरी, ठेचा, विविध चायनीज पदार्थ, पाणीपुरी, रगडा, आईस्क्रीम असा खास मेनू होता. खा. दानवे आणि प्रा. सरकटे यांची लोकप्रियता पाहता हजारो वऱ्हाडींची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. त्यानुसार दुपारी दोन वाजेपासूनच जेवणाची सोय करण्यात आली होती.
>मान्यवरांची उपस्थिती 

राजकीय क्षेत्रातील व्यक्तींबरोबर अभिनेते आणि गायन क्षेत्रातील मान्यवरांनीही आवर्जून हजेरी लावली. यामध्ये हृदयनाथ मंगेशकर, गायिका उषा मंगेशकर, भारती मंगेशकर, कृष्णा मंगेशकर, साधना सरगम, अजित कडकडे, कार्तिकी गायकवाड उपस्थित होते. भाजपच्या प्रवक्त्या आणि फॅशन डिझायनिंगमधील मोठे नाव असलेल्या शायना एन. सी. तसेच अभिनेता विवेक ओबेरॉय यानेही समारंभास उपस्थिती लावून वर-वधूस शुभेच्छा दिल्या. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हजारोंच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी गायिका कार्तिकी गायकवाड यांनी स्वत: मंगलाष्टके म्हटली. मंगलाष्टक ांनंतर फटाक्यांच्या आतीषबाजीने संपूर्ण आकाश उजळून निघाले.

Web Title: Aurangabadkar's eye-trimming ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.