‘दिया और बाती’च्या सेटवर ‘एक उनाड दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 02:11 IST2016-09-10T02:11:39+5:302016-09-10T02:11:39+5:30
छोट्या पडद्यावरील मालिका आणि त्यातील कलाकारांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललीय.

‘दिया और बाती’च्या सेटवर ‘एक उनाड दिवस’
छोट्या पडद्यावरील मालिका आणि त्यातील कलाकारांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललीय. या मालिका आणि त्यातील कलाकार यांचं रसिकांशी अतूट असे नाते बनते. हीच बाब लक्षात घेऊन ‘लोकमत सीएनएक्स’ने नुकतेच एका स्पर्धेचे आयोजन केले होते. छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘दिया और बाती’ या मालिकेशी संदर्भात एक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतून मालिकेशी संबंधित रसिकांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची योग्य उत्तर देणाऱ्या रसिकांना ‘दिया और बाती’ मालिकेच्या सेटवर जाण्याची आणि यातील कलाकारांना भेटण्याची संधी मिळणार होती. या स्पर्धेला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या निवडक रसिकांना या मालिकेच्या सेटवर जाण्याची संधी ‘लोकमत सीएनएक्स’ने उपलब्ध करून दिली.
या स्पर्धेत अचूक उत्तरे देत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना एक अनोखी सुवर्णसंधी लाभली. त्यांना बक्षीस म्हणून ‘दिया और बाती’ या मालिकेच्या सेटवर नेण्यात आलं. एरवी छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या मालिकेतील कलाकारांना प्रत्यक्ष जवळून पाहण्याची संधी या निमित्ताने या रसिकांना मिळाली होती.
मालिकेच्या सेटवर पोहोचताच अखेर तो क्षण आला. ‘दिया और बाती’ मालिकेतील प्रसिद्ध कलाकार आपल्या सगळ्यात मोठ्या रसिकांना भेटले. या रसिकांनी केवळ अचूक उत्तरे दिली नव्हती. तर ते या मालिकेवर आणि यातील कलाकारांवर किती प्रेम करतात याची ती पोचपावती होती. त्यामुळेच हा क्षण रसिकांसोबत या मालिकेतील कलाकारांसाठीही तितकाच खास होता. आपल्या आवडत्या कलाकारांसोबत भेटण्याचा, मालिकेचे चित्रीकरण कशाप्रकारे करण्यात येते या साऱ्या गोष्टी चाहत्यांनी अनुभवल्या. कलाकारांशी संवाद साधण्याचा अनोखा योग ‘सीएनएक्स’मुळे या रसिकांना लाभला होता. मग काय या कलाकारांसोबत बोलून त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न रसिकांनी केला. सध्या सेल्फीचा जमाना आहे. मग, आपल्या लाडक्या कलाकारांसोबत सेल्फी काढण्याची संधी हे रसिक कसे चुकवतील. या कलाकारांसोबत त्यांनी सेल्फी, फोटो काढले. त्यांचे आॅटोग्राफ घेऊन कलाकारांशी संवाद साधत हा क्षण कायम आयुष्यभर लक्षात राहील अशाप्रकारे पूर्ण दिवस रसिकांनी आनंदात घालवला. त्यामुळं ‘लोकमत सीएनएक्स’ने एक सगळ्यात मोठं गिफ्ट दिल्याची भावना या वेळी या रसिकांच्या मनात दाटून आल्या होत्या.