अशोक सराफ यांच्या "शेंटिमेंटल"चा ट्रेलर रिलीज
By Admin | Updated: June 19, 2017 12:12 IST2017-06-19T12:11:26+5:302017-06-19T12:12:38+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे बादशहा अशोक सराफ यांचा आगामी चित्रपट "शेंटिमेंटल"चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे

अशोक सराफ यांच्या "शेंटिमेंटल"चा ट्रेलर रिलीज
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे बादशहा अशोक सराफ यांचा आगामी चित्रपट "शेंटिमेंटल"चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अशोक सराफ पोलीस हवालदाराची भूमिका साकारणार आहेत. अशोक सराफ यांनी चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरुवातच पोलीस हवालदाराच्या भुमिकेने केली होती. यानंतर त्यांनी अनेकदा पोलिसाची भूमिका बजावली आहे."शेंटिमेंटल"च्या निमित्ताने पुन्हा एकदा अशोक सराफ प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलवरुन तरी चित्रपट एकदम धमाल असणार असं दिसत आहे.
अशोक सराफ यांचा नुकताच ४ जूनला वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेंटीमेंटल चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. ‘पोस्टर बॉईज’ आणि ‘पोस्टर गर्ल्स’ सारखे हिट चित्रपट देणारे लेखक-दिग्दर्शक समीर पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अशोक सराफ प्रमुख भूमिका साकारत आहेत.
अशोक सराफ यांनी १९७५ मध्ये त्यांच्या करियरची सुरुवात ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने झाली होती. या चित्रपटातील त्यांची हवालदारची भूमिका खूप गाजली होती आणि आज ४२ वर्षांनंतर ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटात ते हवालदाराच्या भूमिकेतून बढती घेऊन सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात ते प्रल्हाद घोडके ही भूमिका साकारणार आहेत.
गेली ४०-४५ वर्षं आपल्या चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
‘करप्ट अधिकारी आणि अट्टल गुन्हेगार मी एका नजरेत ओळखतो.’ असा अशोक सराफ यांचा डायलॉड ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 28 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.