अनुष्का प्रेमाची विराट कबूली
By Admin | Updated: November 21, 2014 12:20 IST2014-11-21T11:24:15+5:302014-11-21T12:20:05+5:30
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत प्रेमसंबंध असल्याची जाहीर कबूली दिली आहे.

अनुष्का प्रेमाची विराट कबूली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत प्रेमसंबंध असल्याची जाहीर कबूली दिली आहे. 'आम्ही दोघे जर वारंवार एकत्र दिसत असू तर त्यासाठी वेगळे सांगण्याची गरज नाही, तुम्ही समजून घेतले पाहिजे' असे विधान करत विराटने अनुष्काशी प्रेमसंबंध असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली.
गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली आणि अनुष्का शर्मामध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा रंगली होती. एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांची भेट झाली होती. यानंतर दोघांचे सूत जुळल्याची चर्चा रंगली. इंग्लंड दौ-यात अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत गेल्याचे उघड झाले होते. न्यूझीलंड दौ-यातही हे दोघे हातात हात घालून फिरत असल्याचे एका छायाचित्रात कैद झाले होते. यानंतर नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात अनुष्का शर्मा विराटला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. या सामन्यात अर्धशतक ठोकल्यावर विराटने अनुष्काला फ्लाईंग किस दिले होते. मात्र या दोघांनीही याविषयावर कधीच जाहीरपणे भाष्य केले नव्हते.
विराट - अनुष्काच्या प्रेमसंबंधांवरुन गॉसिप्स रंगले असतानाच गुरुवारी एका कार्यक्रमात विराटने अनुष्का प्रेमाची कबूली दिली. अनुष्काविषयी विचारलेल्या प्रश्नावर विराट म्हणतो, आम्ही दोघे वारंवार एकत्र दिसत असू तर त्यासाठी तुम्ही समजून घ्यायला हवे. यासाठी तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. मात्र ही आमची खासगी बाब असून प्रसारमाध्यमांनी याविषयी वारंवार प्रश्न विचारु नये आणि आमच्या खासगी जीवनाचा आदर बाळगावा असे त्याने स्पष्ट केले.