...अन् मी संगीत महालात प्रवेश केला!
By Admin | Updated: December 7, 2015 01:11 IST2015-12-07T01:11:24+5:302015-12-07T01:11:24+5:30
स्वप्ने पाहणारा, विश्वास ठेवणारा व यशस्वी होणारा हे तीन शब्द गायक सुखविंदर सिंग याची ओळख करून देण्यासाठी पुरेसे आहेत.

...अन् मी संगीत महालात प्रवेश केला!
स्वप्ने पाहणारा, विश्वास ठेवणारा व यशस्वी होणारा हे तीन शब्द गायक सुखविंदर सिंग याची ओळख करून देण्यासाठी पुरेसे आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी तो संगीताच्या दुनियेत आला. सीएनएक्सशी मुलाखती दरम्यान सुखविंदर सिंगने आपल्या स्वप्न, प्रेम, पॅशनबाबत दिलखुलास चर्चा केली.
विश्वास देवाकडून मिळतो
सुखविंदरने तामिळ शिकण्याबाबत एक गोष्ट सांगितली. मला ए.आर. रहमानने एका तामिळ गीतासाठी बोलावले. मी त्या गाण्याचा कागद पाहिला व गांधीजींची आठवण झाली. गांधीजींना एका ब्रिटिश गव्हर्नरने संस्कृत वाचून दाखविण्याची विनंती केली, त्यांनी हे काम एका महिन्यानंतर होईल, असे सांगितले. या महिनाभर गांधीजींनी संस्कृतचा अभ्यास केला व गव्हर्नरला ते पत्र वाचून दाखविले. मीदेखील तसेच केले. मी सर्व काही विसरून एक महिनाभर तामिळ शिकत होतो. त्यानंतर मी ते गाणे वाचले व गायलेदेखील. सारांश- एखाद्या गोष्टीचा अनुभव नाही, म्हणून तिला नाकारू नये.
स्वप्न
एका रात्री मी स्वप्नात पांढरा महाल पाहिला. तो दुधापासून तयार करण्यात आला होता. मी स्वप्नात २0 वर्षांचा असल्याचे पाहिले. मी त्या महालात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होतो. मला जाग आली, थोडा वेळ मंद संगीताचा आनंद घेतला. मी केवळ संगीताचा आनंद घेत नव्हतो, तर ते गीत गुणगुणतही होतो. त्यावेळी मला असे वाटले की, मला माझे संगीत बोलावत होते. हाच माझ्या स्वप्नाचा अर्थ असावा.
विश्वास
ते स्वप्न पाहिल्यावर मी सातत्याने ते गीत गुणगुणत होतो. मी माझे स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर होतो, असे मला वाटायला लागले होते. मी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. किशोरवयात असताना खूप सराव केला. अचानक एक दिवस मला वाटले की, मी त्या महालात जाण्यास सक्षम आहे. ‘जय हो’ या गीतासाठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाल्यावर मात्र हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. याचा आपसात संबंध आहे तो असा.
शिकण्याची इच्छा
मी आतून शिकणारा व्यक्ती आहे. अन्य लोकांकडून ज्ञान मिळविण्याची संधी मी कधीच सोडत नाही. मी इंग्लंडमध्येदेखील अनेक सुफी संतासोबत भेट घेतली आहे. युक्रेन, कझाकिस्तान व रशियन ओपेरामधून ज्ञान मिळविले. भारतीय नाट्य संगीत त्या तुलनेत वेगळे आहे. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या संगीताच्या काही गोष्टी स्वीकारायला हव्यात. हे सत्य स्वीकारायला हवे. माझी शिकण्याची हीच पद्धत आहे. मला आठवत नाही की मी कुणा एका व्यक्तीकडून संगीत शिकलो असेल.